आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवं कोरं...:"तूर्तास तरी...'  अनेकार्थक्षमतेचे प्रहसन

एका वर्षापूर्वीलेखक: सुनील हेतकर
  • कॉपी लिंक

'तूर्तास तरी...' या कवितासंग्रहाच्या आकलनानंतर बुद्धभूषण साळवे या कवीवर झालेले विज्ञानवादी, मानवतावादी संस्कार लक्षात येतात. शिवाय, कवितेतील सर्वहारा माणसाच्या शोषणाचे संदर्भ अनुभवले तर या कवीचे वैश्विकतेशी बंध जुळलेले आहेत, हे प्रत्ययास येते. प्रत्येक शब्दागणिक अस्वस्थ करणाऱ्या या कवीची कविता निश्चितच अंतर्मुख करणारी आहे, तेव्हा जपतच ही कविता वाचली पाहिजे, अनुभवली पाहिजे.

बाजार' काव्यसंग्रहाने वाचकांना अंतर्मुख केल्यानंतर बुद्धभूषण साळवे या कवीने, आपला दुसरा कवितासंग्रह 'तूर्तास तरी...' च्या उपलब्धीने वाचकांच्या संवेदनशील मनाला विचारप्रेरीत केले आहे. नाशिकच्या क्रांतिभूमीवर पावलाचे ठसे उमटवीत असताना कवीला जीवघेण्या व्यवस्थेने प्रचंड अस्वस्थ केले. शहरातल्या लोंबकळत्या झोपडपट्टया, टिचभर पोटासाठी कामगारवर्गाची होणारी धावपळ, लोकलमधील गचके खात जगणारी माणसे, जागतिकीकरणाने त्रस्त झालेला माणूस, इच्छा नसताना लपून-छपून देहविक्री करणाऱ्या मुली अशा अनेक शोषित माणसांवर व समस्यांवर हा कवी ठिकठिकाणी अस्वस्थ होऊन लिहिता झालेला आहे. मानवी जीवनात दुःख आहे आणि दुःखमुक्तीसाठी संघर्ष हा अविभाज्य भाग आहे. भारतीय पृष्ठभागावर सामाजिक दुःखाचा पट मोठा आहे, या सामाजिक दुःखात मानवी शोषण आहे. जातीयतेतून येणारे निम्नस्तरीय जातीतील लोकांचे शोषण, वर्गलढ्यातून अनुभवास येणारे कामगार वर्गाचे शोषण, रूढी परंपरा, अवैज्ञानिकतेतून होणारे पददलित व स्त्रीवर्गाचे शोषण, भांडवलशाहीच्या मार्गाने प्रत्ययास येणारे सर्वसामान्याचे शोषण, सत्तापिपासूंनी केलेले नागरिकांचे शोषण अव्याहत सु्रू आहे. या शोषणाविरोधात हस्तक्षेप करणे व उपाययोजन सूचित करणे हे कवीचे कर्तव्य असते. शोषण आणि त्याविरोधातील लढा ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे म्हणून बुद्धभूषण साळवेंची कविता अपूर्ण संघर्षाला तूर्तास तरी स्थगिती देता येणार नाही, असे सुचित करते. समग्र कवितासंग्रहाच्या आकलनानंतर या कवीवर झालेले विज्ञानवादी, मानवतावादी संस्कार लक्षात येतात. शिवाय, कवितेतील सर्वहारा माणसाच्या शोषणाचे संदर्भ अनुभवले तर या कवीचे वैश्विकतेशी बंध जुळलेले आहेत, हे प्रत्ययास येते. प्रत्येक शब्दागणिक अस्वस्थ करणाऱ्या या कवीची कविता निश्चितच अंतर्मुख करणारी आहे, तेव्हा जपतच ही कविता वाचली पाहिजे, अनुभवली पाहिजे. माणूस आपल्या जीवनात अनंत बरेवाईट अनुभव घेत जगत असतो. हे अनुभव भवतालातील विशेषतः कुटुंबाचे व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे असतात. कवी हा प्रथम माणूस असतो. त्यामुळे तो त्याच्या बालपणापासूनच्या गाठीशी बांधलेल्या अनुभवांना काव्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. सामान्य माणसापेक्षा अनुभवांना स्वीकारण्याची सम्यक दृष्टी कवीमध्ये अधिक असते. बुद्धभूषण साळवे यांची अनुभवसृष्टी लोकविलक्षण स्वरुपाची असून त्यांची कविता अधिकतर अनुभव स्वीकारण्यातून पुढे आलेली प्रत्ययास येते. थोडक्यात, एखादा अनुभव निरपेक्षपणे स्वीकारणे, त्यातील संवेदनांचे व्यवस्थापन करणे आणि ते समुचित शब्दांत अधोरेखित करणे होय. हे संवेदनांचे व्यवस्थापन बुद्धभूषण साळवेंच्या कवितेत दृग्गोचर होते. बुद्धभूषण साळवे यांच्या ‘तूर्तास तरी...’ या कवितासंग्रहात एकूण सत्तेसाळीस कविता आहेत. यापैकी बहुतेक कवितांत अल्पाक्षरत्व प्रत्ययास येते. आधुनिक कवितेत अधिकतर दीर्घता आढळून येत असताना बुद्धभूषण साळवेंची कमी आकारातील कविता नेमक्या शब्दांत आशय स्पष्ट करते, हे या कवितेचं वैशिष्ट्य आहे. तिला दीर्घतेचं वावडं आहे, असा अर्थ कुणी घेऊ नये. ‘तूर्तास तरी...’ या कवितेत दीर्घ कविता आढळून येत असली तरी ती पसरत नाही व वाचकांचा अंतही पहात नाही. जो अनुभव मांडावयाचा आहे, तो कमी शब्दांत, बुद्धभूषण साळवेंची कविता अनावश्यक तपशील टाळून संपृक्त रुप व्यक्त करते. काही कवितांत अर्थाच्या विविध शक्यता निर्माण केल्या गेल्या आहेत. कवितांचा भाषिक आकार लहान असला तरी जीवनाशयाच्या व्यापकपणाचा प्रत्यय देणाऱ्या या कविता आहेत. कवीचे जीवनाचे आकलन जितके व्यापक असेल, व्यापकतेत सखोलता असेल तेव्हा कवीची रचना तात्कालिकतेच्या पलीकडे जाऊन चिरंतनता व वैश्विकतेचा वेध घेते. यामुळे जीवनातील खोल अन्वयार्थ शोधण्याची क्षमता ‘तूर्तास तरी...’ या कवितेत पुरेपूर असल्याची खात्री पटते. कवीमध्ये असणारी चिंतनशीलता, कल्पनाशक्ती यामुळे जीवनव्यवहाराचा सखोल आकलनाचा अनुभव या कविता देतात. वर्तमान धकधकीचे, भयावहतेचे व अनिश्चित स्वरुपाचे असून दृष्ट प्रवृतींचे, धर्मांध शक्तीचे प्राबल्य वाढले आहे. माणसं काहीचं बोलत नाहीत असं नाही तर त्यांनी बोलूच नये अशी परिस्थिती निर्माण केली जातेय. जो तो विकलांग करणार्या परिस्थितीच्या दडपणाखाली भयभीत होऊन जगतो आहे. लोकशाहीप्रणित देशात भितीदायक वातावरण असणे लोकशाही हिताचे नसून समग्र मानवतेच्या दृष्टीने अहितकारक आहे. या वातावरण निर्मितीला सत्तापिपासू जबाबदार आहेत. लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्याऐवजी सत्तापिपासू सत्ताधाऱ्यांनी स्वार्थ साधला. देशापेक्षा पक्ष मोठा मानला. पक्षस्वार्थाला बगल देऊन बहुजन हितायसाठी सम्यक कर्म केली असती तर माणूस आपल्याच सावलीला घाबरत आहे ही वर्तमान स्थिती दिसली नसती. सावधपणा बाळगतच घराबाहेर पडावे लागत आहे कारण कवीच्या माण्सं (पृ.१९) या कवितेतील सगळेच दिवस नसतात एकसारखे या पंक्तीप्रमाणे वर्तमान आहे. समुद्र म्हटला की विविध आव्हाने समोर येतात. त्या आव्हानांना पार करून इच्छित स्थळी पोहोचल्यावर आगळे समाधान मिळते. मराठी कवितेत समुद्र या प्रतिमेचे उपयोजन अनेक कवींनी केलेले प्रत्ययास येते. या प्रतिमेतून भिन्न भिन्न भावाशय प्रकट होतो. कवी बुद्धभूषण साळवेंच्या 'तूर्तास तरी' या काव्यसंग्रहात समुद्र ही प्रतिमा अनेकांगानी आलेली असून यातील भावाशय कवितेच्या एकूणच आकृतीबंधात एकरूप झालेल्याचा प्रत्यय येतो. नाशकातले कवी कुसुमाग्रज यांच्या 'कोलबंसाचे गर्वगीत' या कवितेत आलेला समुद्र कोलंबसाला ध्येयाच्या आड आलेला समुद्र वाटतो. कवी बुद्धभूषण साळवेंनी हा 'भाडोत्री समुद्र' (पृ. २०) या कवितेत अंधारात गुदमरलेला समुद्र उपयोजिला असला तरी तो सर्वांगातून उफाळत येणारा आहे. अंधार म्हणजे व्यवस्थेने लादलेले जीवन. या व्यवस्थेला परिवर्तीत करायचे असेल तर अंतर्बाह्य उफाळून येण्याशिवाय पर्याय नाही. मानवी जीवन प्रकाशमय हवे असताना ते अधिकच अंधाराच्या खोल गर्तेत घेऊन जात आहे. दिवसागणिक वाढत जाणाऱ्या महागाईने माणूस त्रस्त झाला आहे. माणूस हतबलतेत जगत आहे. जीवननौका पैलतिरी कशी घेऊन जायची या विवंचनेत आहे. अशा हतबलतेच्या पृष्ठावर कवी प्रकाशगीत गाणारी कविता लिहून माणसाला संघर्षरत रहाण्यास प्रवृत्त करतो तद्वत तो भाषेच्या रसायनाला आग लावायला तुला जमेल का? हे तपासून पहाण्याचे सूचनही करतो. कवीला केवळ हस्तक्षेप करून भागत नाही तर उपाययोजनही सूचवावे लागते. आंबेडकरी विश्र्वातील अनेक अवलियात कवी बुद्धभूषण साळवे सामील झाला आहे. तेव्हा तो हस्तक्षेप करून थांबत नाही तर समुचित उपाययोजनही सुचवितो. सुलेखनाच्या माध्यमातून कवी स्वत:तली कला जोपासत असला तरी त्याचा आतला आवाज अस्वस्थ आहे. शब्दांच्या सहाय्याने कवितेतून व कुंचल्याच्या सहकार्याने चित्रातून तो अस्वस्थपणाचा उर्जस्वल आविष्कार कागदावर उतरवतो. अनेक हंगाम गेले, कित्येक पिढ्या संपल्या तरी दुर्लक्षित समाज, त्याचा माणूस म्हणून जगण्याचा संघर्ष संपलेला नाही. हा संघर्ष संपवायचा असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही हे कवीला ज्ञात आहे. दुर्लक्षित समाजासाठी, त्याच्या मानसिक विकासासाठी बुद्धाचा तत्त्वविचार व्हायरस झालेल्या शोषक व्यवस्थेवर एकमेव लस (vaccine) बनू इच्छिते. या उपायातून कवी समाजाच्या उन्नतीचे स्वप्न पाहतो. माणसाला प्रकाशमान करीत सामांन्याच्या दुःखाकडे करुणार्द्रतेने पहाता आले पाहिजे, हे कवीला ज्ञात आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान माणसाला दुःखमुक्ती देऊ शकते यावर कवीचा विश्वास आहे. 'माझ्या मनातील बुद्ध होण्याइतपत जगेन मी' या पंक्तीतून (पृ. ४४) याचा प्रत्यय येतो. बुद्धभूषण साळवेंची 'तूर्तास तरी...' ही कविता आशयाच्या अंगाने महत्त्वपूर्ण ठरली असून ती वैविधतेबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण स्वरुपाची आहे. कवितेत अधिकतर समाजनिष्ठ आशयाची मांडणी समरसून अनुभवयास मिळते. प्रतिमांच्या अतिरेकात ही कविता अडकली नसली तरी कवितेत ज्या प्रतिमा प्रस्तुत झाल्या आहेत त्यातून भावानुभवाच्या व्यामिश्रतेची प्रचिती येते. 'तूर्तास तरी...' या कवितेतून प्रत्ययास येणारा जीवन जाणिवांचा आविष्कार निश्चितच मानवी मनाला नवचेतना देणारा आहे. कवितेतील आशयाला, आंबेडकरी तत्त्वज्ञानाची विचारदृष्टी मूल्यात्मक कशी बनविते याचे प्रत्यंतर या कवितासंग्रहात येते. आशय आणि विचारदृष्टीतील अभिव्यक्ती यांच्यातील समतोलपणामुळे ‘तूर्तास तरी...’ हा कवितासंग्रह वाचनिय व तत्त्वनिष्ठ ठरला आहे.

तूर्तास तरी...(कवितासंग्रह) कवी : बुद्धभूषण साळवे प्रकाशन : ठसा प्रकाशन, नाशिक पृ. ८८ मूल्य: १५०/-

बातम्या आणखी आहेत...