आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिकलेल्या मुली शेती करत नाहीत आणि मुलींना शेतकरी नवराही नको असतो, असं म्हणतात. पण असं काही नाही. माझ्या माहेरी शेती होती आणि योगायोगाने मला सासरही शेतकरी कुटुंब असलेलं मिळालं. माझं शिक्षण पदवीपर्यंत झालं आहे. मी मनात आणलं असतं तर नोकरी करु शकले असते. पण, घरातच शेती असताना नोकरी का करायची, असा विचार करुन मी शेती करायची ठरवलं. मला सासरकडून पाठिंबाही मिळाला. माझ्यासोबत माझ्या जाऊबाई, सासूबाईही शेती करण्यासाठी सज्ज झाल्या. आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग केला. कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, नाशिक, पुणे, कोकण येथील शिकलेल्या मुली, सुना शेती आणि प्रक्रिया उद्योग उभारून आपला ठसा उमटवत आहेत, मग अापण तरी का मागं राहायचं असा विचार करुन आम्ही शेती करण्याचा निर्धार केला.
आमचं एकत्र कुटुंब आहे. आमच्याजवळ १२ एकर जमिनीचा तुकडा आहे. यावर आम्ही परंपरागत शेती करत होतो. पण, नंतर काही वाचन, काही माहितीच्या आधाराने आम्ही या परंपरागत शेतीला फाटा देऊन फळबाग लागवड केली आहे. यात आम्ही सीताफळ, पेरू सारख्या फळांचे चांगले उत्पादन घेत आहोत. या फळांना बाजारात चांगली मागणीदेखील आहे. आमच्या बागेतील फळांचा दर्जा खूप चांगला असल्यामुळं त्याला बाजारभावही चांगला मिळत आहे आणि आम्हाला नफाही होत आहे. आमच्या घरातील पुरुष मंडळी आमच्या सोबत असल्यामुळे काम करण्यात खूप आनंदही मिळतो. मला तरी असं वाटतं की, मुलींनी शेती करायला काहीच हरकत नाही. थोडे ज्ञान आणि मेहनत करण्याची इच्छा असेल, तर शेतीतूनही खूप फायदा मिळू शकतो. फक्त निसर्गाने साथ द्यायला पाहिजे. दुसऱ्यांकडे नोकरी करण्यापेक्षा आपली जमीन कसून त्यातून पीक काढणं कधीही चांगलं, असं माझं ठाम मत आहे.
छाया योगेश कातबने
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.