आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Ravindra Pandharinath Madhurima Special Article Divya Marathi | Valentine Day Special Article Ravindra Pandharinath Ye Mohabbat Zindabad | Marathi News

‘परग्रहा’वरून पत्र:ऐ मोहब्बत झिंदाबाद !

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपली परंपरा काम हा पुरुषार्थ मानणारी, मंदिरात शृंगारिक शिल्पे कोरणारी आहे. भीम-हिडिंबा, अर्जुन-चित्रांगदा यांसारख्या आंतरवर्णीय-आंतरवंशीय लग्नाचे स्वागत करणाऱ्या समृद्ध परंपरेचा आपण भाग आहोत. त्यामुळे जात-धर्माच्या नावाखाली प्रेमिकांची हत्या करणाऱ्या सैराट संस्कृती (?) ला आपलं म्हणायचं का, याचा विचार आपण करायला हवा.

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रेमाच्या मधुमासाच्या शुभेच्छा! वसंत लागलाय हे विसरलात का? कालच ‘व्हॅलेंटाइन डे’ झाला आणि काही दिवसांपूर्वी वसंत पंचमी. कोरोनाकाळात संचारबंदी, जमावबंदी, शाळाबंदी इ. अनेक गोष्टींवर बंदी असली तरी प्रेम करण्यावर आणि ते व्यक्त करण्यावर अजूनपर्यंत तरी कोणी बंदी घातली नाही. कोणी तसा प्रयत्न केलाच तर तो यशस्वी होणार नाही, असा मानवाचा इतिहास सांगतो. कारण प्रेम हा सर्व मानवी संबंधांचा, व्यवहारांचा मूलभूत आधार आहे. त्यातही स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचं महत्त्वच आगळं. सारी महाकाव्यं, पुराणं, आख्यायिका-इतिहास, कथा-कादंबऱ्या आणि आख्यानं स्त्री-पुरुषांच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहेत. निसर्गात – आसमंतातही हे प्रेम भरून वाहताना आपल्याला दिसतं (अर्थात आपण आपल्या व्हर्च्युअल रिअॅलिटीतून डोकं वर काढलं तर). आपण ह्या पत्रांतून स्त्री-पुरुष नात्यातले वेगवेगळे पदर आणि त्यातील पेच उलगडून पाहणार असलो, त्यात लपलेल्या शोषण व विषमतेची चर्चा करणार असलो, तरी आपण प्रेमाच्या विरोधात नाही. प्रेम कोणीही करावं, कोणत्याही वयात करावं. मात्र त्याची अभिव्यक्ती करताना किंवा त्यापूर्वी ते प्रेम आहे की आपली मालकी हक्काची भावना, त्यात काय दडलं आहे - समोरच्या व्यक्तीबद्दलचा आदर की तिच्याकडून काही वसूल करण्याची किंवा हिसकावण्याची आपली भावना, एवढं तपासून पाहावं, बस्स !

मी हे म्हणतो आहे तेवढ्यात समोरून एक काका-काकू आले व माझ्याशी भांडायलाच लागले की. विशेषतः काकू ऐकायलाच तयार नव्हत्या. त्यांची लंबी स्टोरी शॉर्टमध्ये सांगायची तर हे व्हॅलेंटाइन डे वगैरे परकीय संस्कृतीतील फॅड आहे. आपल्या संस्कृतीत ह्या गोष्टी बसत नाहीत. त्यामुळे तरुणवर्ग बहकतो. वाया जातो. त्याचं अभ्यासावरील लक्ष उडतं. तुमच्यासारखे (म्हणजे माझ्यासारखे) लोकच जर बाजारू संस्कृतीचा पुरस्कार करत आपल्या संस्कृतीच्या विरोधात काम करायला लागले तर ते बरोबर नाही.

मी काकूंना म्हटलं – “काकू, मीही तुमच्यासारखा बाजारू संस्कृतीच्या विरोधात आहे. प्रेम व्यक्त करायचं म्हणजे प्लास्टिकचं हृदय, चॉकलेट, इंग्रजीत लिहिलेलं ग्रीटिंग कार्ड विकत घेऊन देणं ही एकदम ढोबळ आणि फालतू कल्पना आहे. सर्वांनी एकाच पद्धतीनं प्रेम व्यक्त करणं हे चूकच. कोणाला आपल्या ‘श्रीवल्ली’सोबत खांदा झुकवून तिरपी तिरपी पावलं टाकत नाचायला आवडेल, तर कोणी त्याच्या/तिच्या नजरेत नजर गुंफून ‘ये मोह मोह के धागे’ गुणगुणत शांत बसेल. समजा, कोणी आपल्या प्रिय व्यक्तीच्या केसात गजरा माळून किंवा त्याच्या/तिच्या हातावर मेंदी रंगवून, कविता लिहून प्रेम व्यक्त केलं, तर त्याला तुमची हरकत नाही ना?” काकू थोड्या विचारात पडल्या, पण म्हणाल्या, “ठीक आहे.” मग सावरून म्हणाल्या, “पण म्हणजे काय वाट्टेल ते नाही करायचं.” “उदाहरणार्थ मिठी मारणं” - मी “हो” “नवरा-बायको असतील तर?” “त्याला हरकत नाही. पण आजकाल ते बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड आणि लिव्ह इनसारखी थेरं चालतात, ती बंद व्हायला हवी. आमच्या हिंदू संस्कृतीत ह्या दिवशी मातृ-पितृवंदन दिन सांगितला आहे.” “कोणत्या ग्रंथात हे लिहिलंय, सांगता का? कारण आईवडिलांना विशिष्ट दिवशीच नमस्कार करावा असं कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही.” “आमच्या धर्मात ही प्रेमाची थेरं गोष्टी बसत नाहीत, एवढं ध्यानात ठेवा.” “काकू, हिंदू धर्माप्रमाणे वसंत पंचमी साजरी करायला तुमची हरकत नाही ना? पूर्वीच्या काळी म्हणे वसंत पंचमी सगळीकडे जोरात साजरी व्हायची. तरुण-तरुणी झाडाला झुले बांधून झोके घेत, फुलांच्या अलंकारांनी देह सजवीत. सोबत वनविहार, जलविहार करीत. सारा वसंत ऋतू हा प्रेमाचा उत्सव मानला जाई. गाथा सप्तशतीसारख्या जुन्या प्राकृत ग्रंथात तेव्हाच्या लोकजीवनातील मोकळ्या वातावरणाचं मोठं सुंदर वर्णन आहे. त्यातला बाप आपल्या मुलाला सांगतो –

“मुला,भरदुपारी गावाबाहेरील टेकडीवर मैत्रिणीसोबत बोलत बसलास. पण संध्याकाळ झाली की सावल्या लांबत थेट गावाच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचतात, हे ध्यानात ठेव. जा, पुढच्या वेळी असा पकडला जाऊ नकोस.”अर्थात ह्याहून शृंगारिकही बरंच आहे. तुम्ही वाचलं असेल ना?” काकू, केव्हा गायब झाल्या कळलंच नाही. तर दोस्तहो, मुद्दा हा आहे की स्त्री-पुरुष दोघांनाही परस्परांसोबत प्रेमाने, आदराने आणि आनंदाने राहता यावं हाच साऱ्या समाजरचनेचा, संस्कृतीचा गाभा आहे, असायला हवा. पाकिस्तान-बांगलादेशसह अख्ख्या भारतीय उपखंडात पसरलेली आपली संस्कृती. हीर-रांझा, राधा-कृष्ण यांची पूजा करणारी. मीरा व अक्का महादेवी यांना परमभक्त मानणारी. गझल-कव्वाली-विराण्या ह्यांतून प्रेमाचा राग आलापणारी. हीर-रांझा ह्यांचा धर्म किंवा जात ह्यांची कोणी चौकशी केली होती? आजही (आता पाकिस्तानात असणाऱ्या) ‘जंग’ गावात हीर-रांझाचा एकत्रित मकबरा (कबर) आहे. त्याच्या शेजारच्या झाडावर चुनरी बांधली तर आपल्या प्रेमाचं माणूस आपल्याला मिळतं अशी प्रेमिकांची श्रद्धा आहे. ते झाड चुनऱ्यांनी भरून गेलं आहे. आपण कृष्णासोबत सत्यभामा किंवा रुक्मिणीची पूजा करीत नाही, तर राधेची करतो. त्यांच्या प्रेमाची हजारो काव्यं प्राचीन धर्मग्रंथांपासून हिंदी सिनेमाच्या गाण्यांपर्यंत विखुरलेली आहेत. राजस्थानातील मीरा, कर्नाटकातली रंगनायकी अंदाळ यांनी कृष्णालाच परम पुरुष व पती मानलं. महाराष्ट्रातील कान्होबाईने हे स्थान विठ्ठलाला दिलं, तर कर्नाटकातील अक्का महादेवीने शिवाला. ह्या सर्वांना आपण श्रेष्ठ संत मानलं आणि त्यांच्या प्रेमाला भक्तीची सर्वश्रेष्ठ साधना.

आपली परंपरा काम हा पुरुषार्थ मानणारी, मंदिरात शृंगारिक शिल्पे कोरणारी आहे. भीम-हिडिंबा, अर्जुन-चित्रांगदा ह्यांसारख्या आंतरवर्णीय-आंतरवंशीय लग्नाचे स्वागत करणाऱ्या समृद्ध परंपरेचा आपण भाग आहोत. त्यामुळे जात-धर्माच्या नावाखाली प्रेमिकांची हत्या करणाऱ्या सैराट संस्कृती (?) ला आपण आपलं म्हणायचं का, ह्याचा विचार करायला हवा.

आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती करताना किंवा त्यापूर्वी ते प्रेम आहे की आपली मालकी हक्काची भावना, त्यात काय दडलंय,समोरच्या व्यक्तीबद्दलचा आदर की तिच्याकडून काही वसूल करण्याची, हिसकावण्याची आपली भावना एवढं तपासून पाहावं, बस्स !

रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ
संपर्क : ९८३३३४६५३४

बातम्या आणखी आहेत...