आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रंथार्थ:माध्यमयात्रेतील माणसं...

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक-माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे यांचे साहित्य, संगीत. सिनेमा आदि क्षेत्रातील बुजुर्ग नामवंत साहित्यिक कलावंतांच्या विविध माध्यमांसाठी घेतलेल्या निवडक मुलाखतींचे "माध्यमयात्रेतील माणसं...' हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनतर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील शीर्षक लेखातील हा संपादित अंश...

माध्यम आणि लेखन क्षेत्रात मला वाटणाऱ्या मी केलेल्या कामगिरीचा वाटा हा छोटासा खारीचा आहे. या छोट्याशा प्रवासात मागे वळून पाहिल्यावर मला अनेक माणसं, व्यक्तिमत्व, प्रसंग,घटना नजरेसमोर तरळायला लागतात. कधी ती माणस प्रत्यक्षात भेटलेली असतात, त्यांचा स्नेह- मैत्री आणि मार्गदर्शन लाभलेले असतं तर कधी असंख्य उत्तुंग व्यक्तिमत्व पुस्तकातून, सिनेमा- नाटकातून, कथा कादंबऱ्यांतून भेटतात आणि माझ्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. दूरदर्शनच्या नोकरीमुळे मुंबईतील वास्तव्यात मला असंख्य प्रतिभावान कलावंत, लेखक, पत्रकार-संपादक कवी; विचारवंत, समाजसेवक, राजकारणी, गायक,संगीतकार अशी अनेक विविध क्षेत्रातली गुणी मित्र मंडळी भेटत गेली त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याशी मनसोक्त सुख संवाद झाला. माणसांचा एक सुंदर शक्तिमान जग पाहण्याची आणि माणसांना वाचण्याची ,त्यांना समजून घेण्याची मला संधी मिळाली. मुख्य म्हणजे ह्या गुणी आणि कर्तृत्वशाली मंडळींनी माझ्यातला लेखक कलावंत हेरला, त्याला प्रोसाहन दिलं.माझी मलाच नव्याने ओळख करून दिली. मी संपन्न आणि समृद्ध होत गेलो ,त्यांचे ऋण मला विसरता येणार नाही.

मुंबईत माझी कारकीर्द सुरु झाल्यानंतर एक दूरदर्शन-निर्माता आणि लेखक-पत्रकार या नात्याने साहित्य कला संगीत क्षेत्रातल्या असंख्य मोठ्या दिग्गज मंडळींच्या माझ्या ओळखी झाल्या. त्यांच्या गाठी भेटी होऊ लागल्या. मला आठवतंय त्या काळी मी कला नगरमधील साहित्य सहवास मध्ये राहणाऱ्या सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांच्याकडे जात असे. मी गेल्यावर काहीतरी खाणं नंतर चहा आणि मनमुराद साहित्यिक गप्पा चालत. इतकी मोठी कवयित्री माझ्यासारख्या उमेदवारी करणाऱ्या तरुणाशी खूप मायने संवाद साधत असे. माझ्या नवीन लेखनाविषयी, वाचनाविषयी त्या आस्थेने विचारपूस करीत असत. त्यांचं शालीन वागणं मनाला स्पर्शून जाई. साहित्य सहवासमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांच्या घरी मी अधून मधून जात असे. कॉलेजमध्ये असताना त्यांचे "तलावातलं चांदणं' वाचून मी त्यांच्या साहित्याच्या प्रेमात पडलो. त्यांची प्रवास वर्णन तर मला पुलंपेक्षा उजवी वाटायची. त्यामुळे त्यांचं खूप आकर्षण होतं. नाशिकला माझ्या लग्नाला ते प्रेमानं आवर्जून सपत्नीक आले होते, तेव्हा मला आश्चर्याचा गोड धक्का बसला होता. मी बोरिवलीला जिथे राहत होतो त्या श्रीकृष्ण नगरात माझ्या घराजवळ वीणा मासिकाचे संपादक लेखक उमाकांत ठोंबरे राहत असत. त्यांचा माझा विशेष स्नेह होता. त्यांच्या घरी साहित्यिक विषयावर छान गप्पा व्हायच्या. त्यांच्याकडे जयवंत दळवी, रमेश मंत्री, रवींद्र पिंगे, वसंत सरवटे आदी अनेक मोठी लेखक मंडळी यायची. या मंडळींच्या संध्याकाळच्या खास मैफिलीत मीही सामील व्हायचो. कधी कधी ठोमरे त्यांच्याकडील शॅम्पेनने छिडकलेल्या तंबाखूची खास सिगार मला ऑफर करायचे.त्यांना माणसांचा खूप लळा-जिव्हाळा होता. पुढे मी गोरेगावला राहायला आलो तिथे मी राहत असलेल्या पांडुरंग वाड मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक दया पवार राहायचे. स्टेशनला जाताना खांद्याला शबनम अडकून डुलत डुलत जाणाऱ्या दया पवार यांची जाता-येता रस्त्यात अधून मधून भेट व्हायची. रस्त्याच्या कडेला उभं राहून आमच्या साहित्यिक गप्पा व्हायच्या. अतिशय साधा माणूस ! साहित्य क्षेत्रातला कार्यकर्ता ! त्यांच्या पुस्तकाविषयी, कार्यक्रमाविषयी ,कार्यक्रमांच्या दौऱ्यां याविषयी ते भरभरून बोलायचे.

एके दिवशी, सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक- कादंबरीकार बाबूराव अर्नाळकर हे पांडुरंग वाडीत राहत असल्याची खबर लागली. शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांच्या कादंबऱ्यांतील काळा पहाड , धनंजय, छोटू आदी पात्रांनी झपाटून टाकले होते. त्यांना भेटायची उत्सुकता होती एके दिवशी मी त्यांच्या अचानक घरी धडकलो. त्यांच्या मुलीने मला बसायला सांगितले कॉटवर लुंगी बनियान मध्ये दाढीचे खुंट वाढलेले दृष्टी झालेले 85- 86 वर्षांचे बाबुराव बसले होते. मुलींने माझी ओळख करून देताच ते नमस्कार करून आतल्या खोलीत गेले. दहा पंधरा मिनिटे झाले तरी ते बाहेर येईनात. तेव्हा अस्वस्थ होऊन मी त्यांच्या मुलीला विचारले ती म्हणाली तुम्ही खास त्यांना भेटायला आलात म्हणून बाबा दाढी करायला आत गेलेत.थोड्यावेळाने गुळगुळीत दाढी केलेले, शर्ट पँट घातलेले, अपटूडेट असे बाबुराव प्रसन्न मुद्रेने बाहेर आले. अर्धा-पाऊण तास आमच्या छान गप्पा झाल्या. दृष्टी अधू झाल्यानं लिखाण थांबले याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. ते दिवस मंतरलेले होते. माझे आवडते लेखक श्री ना पेंडसे यांना भेटायला मी कधी तरी माटुंग्याला त्यांच्या घरी जात असे. त्यांच्या घरी गेल्यावर पेंडसे पती-पत्नी खूप प्रेमाने स्वागत करीत. त्यांना माझ्या टीव्हीच्या कार्यक्रमाचे कौतुक वाटे. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या या प्रतिभावान माणसाचा साधेपणा मला भारावून टाकी.

पत्रकारितेचे मला लहानपणापासून आकर्षण होतं. त्यामुळे मुंबईत आल्यावर टाइम्स ऑफ इंडिया’च्या ऑफिसमध्ये मी अधून मधून जात असे. तिथे माझी ओळख दिनकर गांगल, कुमार केतकर, जोसेफ अशा संपादक-लेखक-पत्रकार मंडळींची झाली. या मंडळींनी मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यावेळी मी महाराष्ट्र टाइम्सच्या रविवार पुरवणीसाठी रुपेरी संध्याकाळ नावाचे सदर लिहीत असे. सिनेसृष्टीतून निवृत्त झालेल्या सुलोचना, नाना पळशीकर, गजानन जागीरदार, मास्टर भगवान ,ललिता पवार आदी अनेक कलावंतांच्या मी घेतलेल्या मुलाखती त्यात प्रसिद्ध झाल्या. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्सचे साक्षेपी संपादक गोविंदराव तळवलकर यांनी मला छोटेसे प्रशस्तीपत्र ही दिलं होतं. अजूनही ते माझ्या संग्रही आहे

माझ्या "अमृतवेल' या कार्यक्रमात अनेक दिग्गज साहित्यिकांच्या मुलाखती मी प्रसारित केल्या. एकदा कवी मंगेश पाडगावकर यांना मी "श्रावण रंग' या कार्यक्रमात श्रावणाच्या कविता वाचायला आमंत्रित केले होते. पाडगावकर यांनी आपल्या खास शैलीत कविता गप्पा ऐकवत कार्यक्रम रंगवला. ध्वनीचित्रमुद्रण झाल्यावर मी त्यांना गाडीपर्यंत सोडवायला गेलो. तेव्हा माझा हात हातात घेऊन ते म्हणाले” रविराज ! अमृतवेल कार्यक्रम तुम्ही किती प्रेमाने करता हो ! मजा आली ! एकदा घरी या गप्पा मारायला ! अस आमंत्रण देऊन ते गाडीत बसले आणि काहीतरी आठवल्यासारखं करीत गाडीच्या खिडकीची काच खाली करीत, त्यांनी मला अतिशय निरागसपणे विचारलं “गंधे! तुम्ही सातच्या आधी येणाऱ्यापैकी आहात की सातनंतर येणाऱ्यापैकी?” कवी जसा प्रतिभावान असतो तसा तो मिश्कील ही असतो. साहित्यक्षेत्रातील शांत मृदू स्वभावाची दोन व्यक्तिमत्व म्हणजे नामवंत साहित्यिक रामदास भटकळ आणि मधु मंगेश कर्णिक. रामदास भटकळ यांनी विषयनुरूप माझ्या अमृतवेल कार्यक्रमात अनेक वेळेला हजेरी लावली. मला एखाद्या लेखकाविषयी, पुस्तकाविषयी काही माहिती हवी असल्यास, संदर्भ हवा असल्यास मी त्यांना फोन करत असे.रेकॉर्डिंगला येताना ते पॉप्युलरी नव्याने प्रसिद्ध झालेली पुस्तके माझ्यासाठी घेऊन येत. अर्ध्या तासाचं रेकॉर्डिंग झाल्यावर जाताना दूरदर्शनच्या इमारतीच्या पोर्च खाली अर्धा-अर्धा तास आम्ही उभे राहून गप्पा मारत असू.

पुलंशी तासभर झालेल्या दिलखुलास गप्पा हा एक अवर्णनीय आनंद होता. गप्पांच्या ओघात मी त्यांना माझ्या लेखनाविषयी सांगताच, एकदम आठवून ते उद्गारले “ अच्छा म्हणजे सत्यकथेत "भिरभिर' ही कथा लिहिणारे गंधे तुम्हीच का? हे वाक्य ऐकताच मी उडालो. पुलंनी आपली कथा वाचल्याचा गोड धक्का मला बसला होता. गप्पांच्या शेवटी न राहून मी त्यांना तुम्ही दूरदर्शनची नोकरी का सोडली असा थेट प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, दोन-तीन वर्ष मी खूप आवडीने काम केलं. नंतर मला असं जाणवायला लागलं की सरकारी नियमांमध्ये माझ्यातल्या कलावंतांचं स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागलं आहे. मुळात मी परफोर्मिग आर्टिस्ट आहे. माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायला मिळावं म्हणून मी नोकरी सोडली. जवळपास चार दशकांचा माध्यम आणि लेखन क्षेत्रातला प्रवास शेकडो कार्यक्रम असंख्य माणसे आणि घटना- प्रसंग, पुरस्कार, सत्कार समारंभ, जाहीर भाषणे, गुणी मंडळींचा मित्रांचा सहवास आणि स्नेह,देश-विदेशातील प्रवास अशा अनेकविध रंगीबेरंगी गोष्टींचा सुंदर कॅलिडोस्कोप माझ्या नजरेसमोरून सरकत आहे. त्यातील मनोहारी रंग पाहून माझं मलाच आश्चर्य वाटते. हे सारं आपण केलं की कुणी तरी आपल्याकडून करून घेतलं! आयुष्यातील आठवणींच्या चांदण्यात मी जेव्हा जेव्हा हरवतो तेव्हा माझ्या ओठांवर ना. धो. महानोर यांच्या कवितेतील ह्या ओळी येतात ... !! अशी कोणती पुण्याई येई फळाला !! चांदणे लगडून येई जोंधळ्याला...!! ravirajgandhe@gmail.com

बातम्या आणखी आहेत...