आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतवचने आणि वर्तमान:शरणु शरणार्थी...

चन्नवीर भद्रेश्वरमठ5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

को रोनाग्रस्त विषण्णतेच्या दोन वर्षानंतर आपण वर्षभर ‘संतवचने आणि वर्तमान’ या सदरातून संतांच्या रचनांतील समकालीन अन्वयार्थ शोधण्याचा प्रयत्न केला. बाराव्या शतकात दक्षिण भारताच्या मोठ्या प्रदेशावर उमटलेल्या महात्मा बसवण्णा आणि समकालीन शरणांच्या पाऊलखुणा अमीट आहेत. आजही विवेकाच्या वाटेवर निघणाऱ्या प्रत्येकासाठी त्या मार्गदर्शक आहेत. शरण आणि संत माझ्या-तुमच्यासारखी हाडामांसाची माणसं होती. ते देव अथवा दैवी अवतार नव्हते. देवत्वाला पोहोचलेली माणसं होती ती. आपण मात्र त्यांचं माणूसपण विसरून दैवतीकरण करताना, काळाच्या कित्येक वर्षे पुढे असलेल्या त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष केलं. महापुरुषांच्या चरित्रामध्ये, त्यांच्या वचनांमध्ये कल्पनाविलास घुसवण्यात आले. चमत्कारी घटना पेरण्यात आल्या. परिणामी जो विचार मुख्य प्रवाह असायला हवा, त्या विचाराची, त्या वारशाची जाणीवपूर्वक आठवण करून देण्याची वेळ कधी नव्हे इतकी अनिवार्य झाली. गोदावरी ते कावेरीच्या खोऱ्याला शरण परंपरेचा वारसा लाभला आहे. या भूमीने नेहमीच समष्टीचा विचार सांगितला. महात्मा बसवण्णा हे केवळ बाराव्या शतकातील नाही, तर युगायुगाचे नायक आहेत. शरण चळवळीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शरणांनी अनुभव मंटपाची स्थापना केली. अनुभव मंटपातील सगळेच शरण एकमेकांप्रति प्रचंड आदर असलेले आहेत. इथे प्रत्येकाचा स्वतंत्र इतिहास आहे. बसवण्णांना त्यांनी नेता म्हणून स्वीकारले आहे. व्यवस्थेने नाकारलेल्यांना, शूद्रत्वात पिचलेल्यांना बसवण्णांनी हृदयाशी घेतले. आपल्या सावलीचाही विटाळ असल्याने देहाचे ओझे घेऊन जगणाऱ्या, चेहराच नसलेल्या देहांना चेहरा दिला. हाच वारसा वारकरी संतांनी पुढे नेल्याचे दिसते. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचार परंपरेचे मानदंड मानले जाणारे राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या विभूतींच्या रूपाने हा प्रवाह अखंडपणे वाहत राहिला. महात्मा बसवण्णा हे दक्षिण भारतातील पुरोगामी विचाराचे प्रारंभ बिंदू आहेत. म्हणूनच त्यांचा ‘बीज बसवेश्वर’ अशा शब्दांत गौरव केला जातो. मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे, आजोबांकडून नातवंडांनी परंपरा पुढे चालवावी, अशी कालसापेक्ष मांडणी शरणांच्या वचनांतून आणि वारकरी संतांच्या अभंगातून झाल्याचे जाणवते. ‘संतवचने आणि वर्तमान’ या सदरात शरण व संतांच्या जीवनाकडे समकालीन संदर्भात पाहण्याचा प्रयत्न केला. कारण आजचे जग तंत्रज्ञानाच्या कवेत आहे. “माणूस चंद्रावर गेला’ ही घटना आता जुनी झाली असून आपण मंगळ ग्रहावर दावा करत आहोत. मोबाइलच्या स्क्रीनवर जगच आपल्या हातात आले आहे. आपल्याला हवी असलेली माहिती अनेक पर्यायांसह “गुगल’ आपल्यासमोर ठेवत आहे. त्यामुळे संतांशी संबंधित पुराणातील, आख्यायिकांतील आणि चमत्कारांतील संदर्भांचा, कथांचा वर्तमानाशी सुसंगत अर्थ लावण्याचा प्रयत्न या सदरातून केला. हेे करताना पुराणांपेक्षाही त्यांची स्वत:ची वचने, त्यांचा उल्लेख असलेल्या समकालीन शरणांची वचने, शिलालेख, लोककथा, आख्यायिका असा क्रम निश्चित केला. “कानातून कोणीही जन्म घेऊ शकत नाही’ अशी बसवण्णांनी मांडलेली स्पष्ट भूमिका काळाच्या कितीतरी पुढची आहे. ती पूर्णपणे विज्ञानवादी आहे. विवेकवादी आहे. त्यामुळे या चरित्रनायकांचा अभ्यास करताना समकालीन उत्सुकतेतून प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर्क मांडण्यात आले. शरण श्रेष्ठ मरूळशंकरदेव अफगाणिस्तानवरून कल्याणला आले होते. कल्याण आजोळ असलेल्या नामदेवरायांनी पंजाबसह अफगाणिस्तानपर्यंत भागवत पताका फडकावली. म्हणूनच बसवपत्नी निलम्मा- निलांबिका यांच्या चरित्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई भेटल्या. हरळय्या आणि मधुवय्या यांना हत्तीच्या पायाला बांधून फरफटत नेत सार्वजनिकरीत्या झालेल्या निर्घृण खुनात स्वत:ला सुळावर खिळे ठोकले जात असताना, ‘देवा, त्यांना माफ कर, आपण काय करतोय हेच त्यांना माहीत नाही,’ असे म्हणणारे प्रभू येशू भेटले. एका माथेफिरूने गोळी झाडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडूनही वर्षानुवर्षे जिवंतच असलेला मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्माही भेटला. अनुभव मंटपाच्या आगीत भस्मसात झालेल्या वचनांच्या गट्ट्यात इंद्रायणीत बुडवूनही तरारून वर आलेली तुकोबारायांची गाथा भेटली. अमुगे देवय्यांचे गाठुडे डोक्यावर घेऊन जाणारे शिवय्या, चोखोबांची गुरे राखणाऱ्या विठुमाऊलीत दिसले. रानात शेळ्या राखणाऱ्या गोल्लाळेशांना शेळ्यांच्या लेंड्यात ईश्वर दिसला, तसाच संतश्रेष्ठ सावतोबांना कांदा, मुळ्यात देव दिसला. ज्ञानोबाराय जसे रेड्याच्या मुखातून वेद वदवतात, तसे हाविनाळ कल्लय्यांच्या कुत्र्याच्या मुखातून वेदपठण झालेले असते. अशी अनेक साम्यस्थळे आणि पुनरावृत्ती शरण परंपरा व वारकरी संतपरंपरेत दिसली. नामदेवराय, तुकाराम महाराजांच्या अभंगांत महात्मा बसवण्णा आणि शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या वचनांमध्ये विलक्षण साम्य आढळून येते. दुसरीकडे, एकनाथ महाराजांची भारूडे अल्लमप्रभुदेव आणि इतर शरणांच्या कूट वचनांशी नाते सांगतात. अल्लमप्रभूंची मंदिरे दूर मराठवाड्यातही आहेत. शरणांची स्मारके संपूर्ण देशात सापडतात. अशी साम्यस्थळे हजारोंच्या संख्येने आपल्या झोळीत येतील. आपण त्या दिशेने प्रामाणिक प्रयत्न केले इतकेच. सदरासाठी लिहिताना वर्षभरात स्वत:च्या आकलनांचा आणि जाणिवांचाही विस्तार झाल्याचे जाणवले. कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये १९६० नंतर भाषेवरून सीमा आखल्या गेल्या. मात्र, त्यापूर्वी हा प्रदेश एकच होता. महात्मा बसवण्णा आणि शरण याच भूमीचे नायक आहेत. शरणांच्या रचना कन्नडमध्ये आणि संताच्या रचना मराठीत असल्याने भाषिक निकषावरून ते अनुक्रमे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या वाट्याला गेले. मात्र, संस्कृतीच्या एकसंधतेमुळे त्यांचा स्वतंत्र विचार करता येणार नाही. म्हणूनच बऱ्याच वेळा संतांच्या अभंगाच्या तुलनेत वचनांचे संदर्भ अधिक आले. कल्याणयुगाती शरणांचा पट मांडणे आणि संतपरंपरंचा अनुबंध शोधणे, हेच या सदराचे प्रयोजन होते.

संपर्क : channavir@gmail.com

बातम्या आणखी आहेत...