आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Remember Life saving 'ABC's' During Road Accidents| Article By Dr. Chandrakant Lahiriya

आरोग्य:रस्ते अपघातावेळी लक्षात ठेवा जीव वाचवणारी ‘एबीसी’

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील एकूण वाहनांपैकी भारताचा वाटा फक्त एक टक्का आहे, पण रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या एकूण जागतिक मृत्यूंपैकी दहा टक्के मृत्यू आपल्या देशात होतात. भारतात दररोज सुमारे १,२०० ते १,८०० रस्ते अपघात होतात, असा अंदाज आहे. त्यामध्ये ४०० ते ६०० लोकांना जीव गमावावा लागतो. यातील अनेक अपघात आणि मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर होणारे अपघात कसे रोखता येतील यावर बरीच चर्चा होत आहे. आज त्यात होणारे मृत्यू कसे टाळता येतील याबद्दल बोलूया.

बहुतांश मृत्यू गंभीर दुखापतीमुळे होतात, असा रस्ते अपघातांबाबत गैरसमज आहे. वास्तविकता अशी आहे की, रस्ते अपघातातील मृत्यू हा दुखापतींपेक्षा श्वासनलिकेतील अडथळ्यामुळे किंवा अति रक्तस्रावामुळे होतो. रस्त्यावरील अपघातानंतरची पहिली साठ मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात, त्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात. या काळात पीडिताला प्राथमिक उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो. कोणत्याही अपघातात रुग्णवाहिकेला कॉल करणे ही रुग्णाला रुग्णालयात नेण्याची पहिली पायरी असते. बरेचदा लोक हेदेखील करतात. पण, दुसरा गैरसमज असा आहे की, अशा अपघातात सामान्य माणूस दुसरे काही करू शकत नाही. अपघातस्थळी उपस्थित असलेले आणि रस्त्यावरून जाणारे लोक रुग्णवाहिका येण्यापूर्वी गंभीर जखमींना प्रथमोपचार देऊ शकतात. अग्निशमन दल येण्यापूर्वीच आग विझवण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे तिथे उपस्थित लोक करतात, त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांना पडलेल्यांना मदत करता येते. कोणत्याही अपघातात शरीराला इजा होण्याची शक्यता असल्यास पीडित व्यक्तीला मदत करण्यासाठी ए-बी-सी लक्षात ठेवा. ए म्हणजे एअर-वे (श्वासनलिका); बी म्हणजे ब्रीदिंग किंवा श्वास सुरू ठेवणे आणि सी म्हणजे सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. आजूबाजूच्या लोकांनी या तिघांकडे लक्ष दिल्यास पीडिताचा जीव वाचू शकतो. पीडिताचा श्वासोच्छ्वास किंवा हृदयाचे ठोके थांबले असल्यास सीपीआरदेखील देता येतो.

पीडित व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरू असल्यास काय करावे हे समजून घेऊया. पहिली गोष्ट, पीडिताला जमिनीवर किंवा पाठीवर इतर आधार देऊन झोपवा. त्याची मान वाकडी किंवा श्वासनलिकेत अडथळा नसल्याची खात्री करा. दुसरे, व्यक्तीला घेरू नका आणि पुरेशी हवा व ऑक्सिजन आसपास येऊ द्या. रुग्णाची मान कलू नये, याची विशेष काळजी घ्या. त्याच्या छातीवर कोणतेही वजन किंवा दबाव नाही याची खात्री करा. श्वासोच्छ्वासाच्या गतीवर लक्ष ठेवा आणि आवश्यक असल्यास हाताने पंखा किंवा इतर साधनांनी वारा घाला. तिसरे म्हणजे, कोठूनही रक्तस्राव होत नाही ना ते तपासा. तसे असल्यास रक्तस्राव थांबवण्यासाठी पावले उचला, उदा. जखमेभोवती पट्टी बांधणे किंवा जखम थेट दाबून धरणे.

तसेच हाड तुटल्याची शंका असल्यास तो भाग हलणार नाही याची काळजी घ्या. कापड किंवा लाकूड इत्यादीने ते स्थिर करा. पीडिताचा हात किंवा पाय पकडून खेचण्याचा प्रयत्न करू नका. पीडिताला बसण्यास भाग पाडू नका. खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही देण्याचा प्रयत्न करू नका, ते फुप्फुसात जाऊन नुकसान होऊ शकते. पीडिताचा श्वास सुरू नसेल तर ज्याला सीपीआर देणे येते तो ते देऊन त्याचा श्वास सुरू करू शकतो. श्वास थांबलेल्या प्रत्येक शंभर लोकांपैकी तीन ते पाच लोकांचा श्वास व हृदयाचे ठोके सीपीआरने सुरू होऊ शकते. ही एक जीवन वाचवणारी पद्धत आहे आणि अनेक देशांमध्ये बहुतेक नागरिक ती शिकतात, जेणेकरून ते एखाद्या गरजूला मदत करू शकतील. भारतातही शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये एबीसी आणि सीपीआर शिकवले जावे.

रस्ते अपघातांत जखमी किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही केवळ आकडेवारी नाही, तर त्याचे अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि मानसिक परिणाम आहेत, ते दीर्घकाळ टिकतात. रस्ते अपघात आणि त्यांचे परिणाम बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतात. जनतेने वेळीच केलेली मदत लोकांचे प्राण वाचवू शकते. प्रत्येक व्यक्ती, संपूर्ण समाज आणि सरकारने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची गरज आहे. तुमचा छोटासा प्रयत्न एखाद्याचा जीव वाचवू शकतो. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

डॉ. चंद्रकांत लहारिया प्रख्यात डाॅक्टर c.lahariya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...