आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजधानी दिल्लीतील एका पत्नीने पतीचे तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले. वेळ मिळेल तसे ते तुकडे दूर जंगलात फेकून दिले. एका माथेफिरूने लिव्ह इन पार्टनरचे ३६ तुकडे केले. फ्रिजमध्ये मुंडके ठेवून तो रोज त्याची अवहेलना करत असे. मुंबईतील एका महिलेने पतीला जेवणातून रोज विष देऊन संपवले. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने ‘शेताला पाणी देण्यासाठी जा’ म्हणून सांगणाऱ्या पत्नीचे डोके धडावेगळे करून गावभर धिंगाणा घातला. गेल्या काही दिवसांतील या बातम्या आहेत. गाव-वेळ वेगळी. आर्थिक स्तर वेगळा. शैक्षणिक पार्श्वभूमी वेगळी. जीवनपध्दतीही वेगळी. मात्र जोडीदाराप्रति कमालीचे क्रौर्य हा यातील समान धागा आहे. जोडीदाराशी वागताना इतक्या क्रूरतेने माणूस वागूच कसा शकतो? अशा घटनांच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत जोडीदारासोबतच्या वागण्याबद्दल. त्याच्या अपेक्षाबद्दल. त्यातील निकोपतेबद्दल. स्वर्गात बांधल्या जाणाऱ्या गाठीच्या सहजीवनाचा शरणांच्या वचनांच्या आधारे अर्थ शोधण्याचा हा प्रयत्न आहे.
एका अहवालानुसार भारतात विवाहितांच्या घटस्फोटांचे पूर्वी हजारात १ असे असलेले प्रमाण आता हजारात १३ एवढे जास्त झालेले आहे. २७ टक्के विवाहित महिलांना नवऱ्याच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. यापैकी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल होण्याचे प्रमाण हे अगदी नगण्य आहे. उर्वरित महिला आयुष्यभर पतीचा अत्याचार सहन करतात. पतीपेक्षा पत्नीचा पगार जास्त असणे, पती-पत्नीत संवादाचा अभाव, एकमेकांसाठी अपुरा वेळ, कुटुंबातील इतर व्यक्तीसोबत वाद अशा अनेक कारणांमुळे घटस्फोट होतात. नाते अधिकच दूषित झाल्याने घातपात घडतो.
पती आणि पत्नी संसाराची दोन चाकं असतात. संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी दोघांची जबाबदारी महत्त्वाची आहे. संवादाचा आभाव, माझे ऐकलेच पाहिजे अशी हटवादी भूमिका किंवा धाकात ठेवण्याचा प्रयत्न, अविश्वास, असूया, अहंकार, संशय आणि तुच्छ लेखण्याची भावना या आणि अशा बाबींमुळे संसारात वितुष्ट येते. मतभेदाची मुळं मनभेदापर्यंत जातात. मग दोघे वेगळे होतात. सन्मानाने वेगळे होणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बहुतेक वेळा यात आरोप-प्रत्यारोप, मारहाण आणि कोर्टबाजीच्या जखमा शरीर आणि मनावर होतात. भळभळणाऱ्या जखमांसह वेगळे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु केवळ वेगळं होता येत नसल्याने मनाविरुद्ध नातं टिकवून एकत्र राहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यांच्या नात्यात दुरावा असतो. तरीही ते एकाच घरात दोन स्वतंत्र घरं करून असतात.
अर्थकारणाची भूमिका नातं टिकवून ठेवण्यात महत्त्वाची असली तरी ते एकमेव कारण नाही. नाती विस्कटण्यात वा टिकून राहण्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी सर्वात मोठं कारण म्हणजे परस्परांबद्दल असलेला सन्मान-आदरभाव. प्रेम आहेच. मी प्रेमाइतकेच किंबहुना त्यापेक्षा अधिक आदरभाव महत्त्वाचे मानतो. त्याला सन्मान देणे म्हणू. परस्परांप्रति आदरभाव नसेल तर प्रेमाच्या दाव्याला अर्थ राहत नाही. तीच कथा विश्वासाची. आदरभाव जर संसाराची इमारत असेल तर परस्पर विश्वास त्या इमारतीचा पाया आहे. परस्परांप्रति असलेल्या आदरभावाला महात्मा बसवण्णा आणि शरणांनी भक्ती हा शब्द प्रयोजला आहे. महात्मा बसवण्णा आपल्या एका वचनांत म्हणतात, पतीला जेवण वाढताना पत्नीच्या मनात राग अथवा तिरस्काराची भावना असेल तर तो प्रसाद होणार नाही. आपण घरात रोज जे शिजवतो, ते ईश्वराचा प्रसादच होय. त्यामुळे शिव्या देत अवहेलना करत जर आपण किचनमध्ये वावरत असू ते कूडलसंगमदेवाला रुचणार नाही. हाच आशय ज्येष्ठ शरण विणकर दासिमय्या यांच्या वचनांतून व्यक्त होतो. ते म्हणतात, पती आणि पत्नी यांची एकदिलाने केलेली भक्ती ईश्वराला प्रिय असते. पती आणि पत्नी यांची एकदिलाने न केलेली भक्ती अमृतामध्ये विष कालवण्याप्रमाणे पाहा रामनाथ. जोडीदाराशी एकरूपतेला दासिमय्यांनी प्राधान्य दिलं आहे. यामध्ये जोडीदाराला स्वीकारणं अभिप्रेत आहे. दुसरीकडे संसारात वितुष्ट येण्याचे मुख्य कारण संशयाचे भूत असल्याचे योगियांचे योगी अल्लमप्रभू यांनी म्हटलंय. संशयाबद्दल ते एका वचनात सांगतात,
वाहणाऱ्या नदीला अंगभर पाय, आगीच्या भडक्याला अंगभर हात घोंगावणाऱ्या वादळाला अंगभर तोंड गुहेश्वरा लिंगमयी असलेले तुमचे शरण सुखी आहेत.
संतांनी संशयाला भूत-पिशाच्य म्हटले असताना अल्लमप्रभुदेवांनी नदी, वारा आणि आगीच्या प्रलयंकारी रूपाशी सांगड घातली आहे. लग्नापूर्वी आणि काही वेळा लग्नानंतरही जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवली जाते व लग्नानंतर ती पूर्ण होत नसल्याचे दिसून आल्यानंतर मनात असंतुष्टता राहते. त्यातून राग, चिडचिडेपणा वाढतो. नैराश्य येतं. पुढे पुढे नकारात्मकता टोकदार होते. परिणामी काही तरी अघटित घडते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जोडीदाराच्या विवेकी निवडीचा आग्रह धरला आहे. त्यासाठी त्यांनी काही सूत्रंही सांगितली आहेत. ते विवेकी पंचसूत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक लग्नेच्छुक तरुण- तरुणीने जोडीदाराची निवड करताना मने जुळतात का पाहावे. रंग-रूप- उंचीपेक्षा भावनिक, संसार व सहजीवनातील फरक, जबाबदारी पेलण्याची क्षमता, सवयी, व्यसने, आवडीनिवडी, स्वभाव, भविष्यातील आव्हाने याविषयी सजगता निर्माण करावी. बौद्धिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासावी. प्रेम व आकर्षण यातील फरक समजून घ्यायला हवा. लिव्ह इन असो वा लव्ह मॅरेज. पालक व मुलांचा दोघांचाही सहभाग घेऊनच त्या नात्याला अंतिम स्वरूप द्यावे. पालकांचा हस्तक्षेपाच्या तक्रारी अलीकडच्या काळात अधिक असतात. आर्थिक नियोजन आणि अपेक्षांची चर्चा न होणं, मुलांचे नियोजन, मूल जन्माला घालायचे हाच मुद्दा अलीकडे कळीचा ठरत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर निकोप सहजीवनासाठी परस्परांना मदत करणे, इतरांशी तुलना न करता अॅक्सेेप्टन्स वाढवणे, कृतिशील वागण्यातून विश्वास व्यक्त करणे आणि शरणांनी व्यक्त केलेला नात्यातील आदरभाव महत्त्वाचा वाटतो.
चन्नवीर भद्रेश्वरमठ संपर्क : channavir@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.