आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय नागरिक आणि महिला म्हणून माझ्या मूलभूत हक्कांचा उपभोग घेताना मूलभूत कर्तव्यांचीही जाण असणे मला तितकेच महत्त्वाचे वाटते. प्रत्येक नागरिकाची कर्तव्यपरायणता आणि जबाबदारी यावर लोकशाहीचे यश अवलंबून आहे. यासाठी नागरिकांना हक्काबरोबर कर्तव्यांची जाणीव करून देण्याची जबाबदारी केवळ घटनेची नसून प्रत्येक व्यक्तीची आहे. प्रजासत्ताक भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेताना प्रत्येक व्यक्तीला अशीही काही कर्तव्य बजावता आली पाहिजेत, ज्यांचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेत नाही. नैतिक जबाबदारी म्हणून अशी कर्तव्ये पार पाडल्यास नक्कीच भविष्यात येणाऱ्या संकटांवर आपण मात करू शकतो. एक महिला म्हणून कौटुंबिक, व्यावसायिक जीवन जगताना कर्तव्यांची जाणीव ठेवून प्रजासत्ताकाच्या संकल्पनेला आयुष्यात उतरवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते. महिलांच्या हक्कासाठी आजपर्यंत जो संघर्ष संपूर्ण समाजाकडून केला गेला, त्याच समाजासाठी माझे काही देणे आहे, ही धारणा मनात ठेवली तर नक्कीच आपली समाजासाठी असलेली कर्तव्य बजावण कठीण राहणार नाही. मागील तेरा वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करताना भारताची एक सुजाण नागरिक म्हणून आलेल्या अनुभवांमधून मला काही कर्तव्यांची नोंद इथे आवर्जून करावीशी वाटतेय. विद्यार्थी आणि शिक्षण यांची सांगड घालताना विद्यार्थिनींना शैक्षणिक मार्गदर्शन, समुपदेशन करून योग्य मार्ग दाखवण्याचा मी प्रयत्न केला. या विद्यार्थ्यांचे आपणही पालक आहोत, ही जाणीव नेहमी मनात ठेवून आपले काम अविरत सुरू ठेवत एक नैतिक कर्तव्य पार पाडल्याचाही मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, निर्णयक्षमता, सकारात्मकता, नेतृत्वक्षमता हे गुण रुजवणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे मला वाटते. एक सुजाण नागरिक घडवण्यात असलेला माझा खारीचा वाटा मोलाचा आहे आणि हे प्रयत्न असेच सुरू ठेवण्याचा मानस प्रजासत्ताक दिनानिमित्त मी व्यक्त करते...
डॉ. रिहाना फेरोज सय्यद (सहायक प्राध्यापक)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.