आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:क्षणभर विश्रांती...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलत्या सामाजिक-आर्थिक-राजकीय वातावरणात अनेक बाबतीत बदल झाला असला तरीदेखील समाजातील लिंगभाव आधारित भूमिका मात्र बदलल्या नाहीत. म्हणजेच ‘बायकी कामे’ व ‘पुरुषी कामे’ अशा काही धारणा आपण आजही वापरतो. किंबहुना त्या जगतोही. जसे मुलांचे संगोपन, स्वयंपाकपाणी, ज्येष्ठांची सेवा, घरगुती कामे ही सर्व स्त्रियांची कामे, तर घराबाहेरील कामे पुरुषांची अशी काहीशी वर्गवारी नकळतपणे आजही आहे. जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या सामाजिक-आर्थिक अवकाशात पोटापाण्याचे संघर्ष तीव्र होत असताना अनेक स्त्रिया नोकरी करतात. आता त्या ‘कमावत्या’ आहेत, पण म्हणून लिंगभाव भूमिका या बदललेल्या नाहीत. ही परिस्थिती केवळ घरकामापुरतीच नाही, तर सामाजिक नीतिमूल्यांची दुटप्पी विषम विभागणीदेखील आहे. जसे विधवांचे प्रश्न आजही आहेत. विधुर पुरुषाच्या विवाहाचे जेवढे मनावर घेऊन लवकरात लवकर विवाह केला जातो तितक्याच सहजतेने स्त्रियांच्या बाबतीत घडेलच असे सांगता येत नाही. पुरुष कायम ‘कर्ता’, ‘श्रेष्ठ’ व ‘प्रथम’ असतो. हे स्थान स्त्री कितीही कर्तव्यदक्ष असली, कर्तृत्ववान असली तरी तिला मिळत नाही. बेटी फ्रीडेन त्यांच्या ‘बियाँड जेंडर’ या पुस्तकात, लिंगभाव भूमिकांच्या पलीकडे आपण जगू शकतो का? असा प्रश्न उपिस्थत करतात व स्पष्ट करतात की, आपण अशा लिंगभेद पारित समसमान भूमिका जगलो तर समाजाचे, कुटुंबाचे स्वास्थ्य अधिक सुलभ, सहज होईल. परंतु या भूमिकांच्या परे जगणे आपल्याला सहज शक्य आहे का? इथे प्रत्येकीला सुगरण व्हायची भारी हौस. बियाँड जेंडर हे पुस्तक वाचताना मी माझ्या स्वभूमिकांच्या बाबतीत विषमतेचे अनेक कंगोरे उकलत गेले. कारण सुगरणीचा हा ताज मला क्षणभर विश्रांतीचा मोहताज बनवत होता. नित्यनेमाने सकाळी भाजी आणण्यासाठी मी गेले. सकाळी सगळ्या भाज्या ताज्या मिळतात या अट्टहासामुळे सकाळची वेळ मी कधीच चुकू देत नव्हते. पटापट भाजी घेऊन घरी यायचे होते. कारण भरपूर कामे वेळेत पूर्ण करायची आम्हा बायकांची सवयच. त्यात घोटभर चहा मिळाला तर मिळाला नाहीतर ‘चलती का नाम गाडी’ अशी आमची सवय. एके दिवशी मला पलीकडच्या कॉलनीतली ताई पण भाजी घेताना दिसली. जवळपास तिला पाहून सहा महिने झाले असतील. खूप दमलेली दिसली. काय चालले? विचारले. म्हणाली, ‘काही नाही सर्व ठीक आहे. काम काय आपले रोजचेच.’ घर आणि ऑफिस अशा दोन्ही कामांत ताई अगदी चोख भूमिका बजावत होती. म्हणून ती आमचा आदर्श होती. अचानक हात झटकत ‘आई गं’ म्हणाली. ‘अगं, काय झालं ताई?’ मी पटकन तिला विचारलं. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड कामाचा ताण स्पष्ट दिसत होता. ती म्हणाली, ‘काही नाही गं, घरची सर्वच कामे आणि ऑफिसचं काम करत करत फारच थकून गेल्यासारखं होतं.’ ‘पण त्यात काय एवढे? माझ्या घरची मीच सुगरण आहे. तुला तर माहिती आहे हे,’ असे म्हणत पुन्हा चेहऱ्यावर बळजबरीने हसू आणत म्हणाली, ‘चल, निघते आता. हातात पिशवीचे ओझे तिला जड व्हायला लागले. ती मला म्हणालीसुद्धा, ‘अगं, हल्ली फारच थकवा आल्यासारखा होतोय. अशक्तपणा आलाय. पण होईल बरं,’ असे म्हणत तिला तिच्या कामांची आठवण झाली आणि खूप कामं पडली... असे म्हणून ती घाईघाईने निघाली. पण मनात एक विचारचक्र चालू झालं. मी पण ‘सुगरण’ आहे माझ्या घरची. तसे सुगरण म्हणजे चांगलंच ना? घरकाम व स्वयंपाक अगदी व्यवस्थित करणाऱ्या स्त्रीला ही उपाधी कुटुंबाकडून आणि मग हळूहळू आपली आप्त मंडळी व ओळखीपाळखीचेदेखील देतात आणि ही ‘सुगरण’पणाची पदवी आम्हा बायकांसाठी जणू जीवनातील एक महत्तम कामगिरी असते. म्हणून ठीक आहे, सुगरण तर सुगरण. स्वतःला सुगरण म्हणवून घेण्यात मला फारच मोठेपणा वाटत होता. पण लगेच कालच्या आम्हा मैत्रिणींच्या दुपारच्या गप्पा आठवल्या. आठवड्यातून एकदा तरी कोणी ना कोणी घरची गाऱ्हाणी एेकवत होत्या. त्यात मीसुद्धा होतेच. कारण प्रत्येकीला कधी ना कधी वाटतच होते की, सकाळी कधीतरी उशिरा उठावं, आयता चहा घ्यावा, आयता नाष्टा, कपभर चहा, घरातलं कोणतंच काम न करता लगेच ऑफिस. संध्याकाळी पुन्हा आयता चहा हजर व्हावा. डोकं दुखलं तर पटकन कुणीतरी न म्हणता दाबून द्यावं, पण हे आता शक्य नव्हतेच. कारण हेच आम्ही लहानपणापासून शिकलेलो होतो. त्यातल्या त्यात आमच्या प्रत्येकीच्या घरातल्या आम्ही सुगरणच होतो. त्या दिवशी घरी जाऊन मी मात्र माझ्या ‘सुगरण’पणाविषयी चिडचिड करत होते. एक स्वप्नवत वाटावं अशी काहीसी मी अपेक्षा करत होते. जरा विचारमग्न होऊन मी ताईसहित इतर सर्व माझ्या मैत्रिणींकडे पाहत होते. तेव्हा त्या सर्व त्यांच्या त्यांच्या घरच्या ‘सुगरण’च होत्या. त्यांनाही अनेकदा चिडचिड करताना मी पाहिलं होतं, परंतु ‘सुगरण’पणाच्या साच्यात प्रत्येकीला अगदी फिट्ट बसायचे होते. ‘सुगरण’पणाचा ताज त्यांनी केव्हाच मिळवलेला होता, पण प्रत्येकीला असे कधीतरी सर्व काही आयते मिळावे असे वाटतच होते. हे सर्व आयते मिळण्याचं स्वप्न माझ्या एकटीचं मुळीच नव्हतं. बहुदा त्या सर्वांना असे वाटत असावे. कारण कितीदा तरी माझ्या मैत्रिणींनी वेगवेगळ्या पद्धतीने का होईना आपल्याला कधीतरी केवळ स्वतःसाठी निवांत वेळ मिळावा अशी अपेक्षा बाळगली होती. माझ्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर उठले. क्षणभर विश्रांतीच्या मोहताज असलेल्या असंख्य स्त्रिया मला दिसू लागल्या. स्वतःसाठी क्षणभर विश्रांती ही फारच मोठी गोष्ट तर नाही ना? असं काहीसं वाटलं. प्रत्येकीच्या घरात घरातील इतर मंडळी थोडा का होईना निवांत क्षण आपल्याला हवा तसा घालवताना दिसतात. मग चूल आणि मूल यांना पूरक असणारा सुगरणपणाचा ताज पितृसत्ताक संस्कृतीची एकांगी देणं वाटायला लागला.

डॉ. सविता बहिरट संपर्क : savitabahirat.e@gmail.com

बातम्या आणखी आहेत...