आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकल्पना करा की, २०२४ च्या अमेरिकन निवडणुकांनंतर एखाद्या दिवशी तुम्ही जागे व्हाल आणि डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अध्यक्ष झाले आहेत व त्यांनी मायकेल फ्लिन यांना संरक्षणमंत्री, रुडी गिलियानी यांना अॅटर्नी जनरल आणि मेर्जोरी टेलर ग्रीन यांना व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या केल्याचे आढळले तर? तुम्ही म्हणाल, हे होऊ शकत नाही. मी म्हणेन, पुन्हा विचार करा, कारण इस्रायलमध्ये असेच घडले आहे. मी पूर्वी असेही म्हटले होते की, इस्रायलच्या राजकारणात जे घडते ते पाश्चात्त्य राजकारणावर भाकीत असते. मला आशा आहे की, इस्रायलमध्ये जून २०२१ मध्ये सत्तेवर आलेले राष्ट्रीय एकता सरकार पाश्चात्त्य देशांमधील दोन राजकीय पक्षांमधील सहकार्य आणि सौहार्दाच्या संस्कृतीला प्रेरणा देईल. पण अरेरे, ते सरकार पडले आणि त्याच्या जागी कट्टर उजव्या विचारसरणीचे सरकार आले. पाश्चिमात्य देशांसाठी येणाऱ्या काळाचे हे लक्षण असेल तर देवच आपला वाली आहे. बेंजामिन नेतन्याहू इस्रायलमध्ये पुन्हा सत्तेवर आल्यावर जी युती स्थापन झाली ती अकल्पनीय आहे. हे कट्टरपंथी-परंपरावाद्यांपासून अति-राष्ट्रवाद्यांपर्यंत आहे. काही वर्णद्वेषी आणि अरबविरोधी कट्टर उजवेदेखील आहेत, जे एकेकाळी इस्रायली मुख्य प्रवाहात दुर्लक्षित होते. त्यांच्या मदतीशिवाय नेतान्याहू युती करू शकले नसते. त्यापैकी काही कॅबिनेट मंत्रीही होऊ शकतात. आता जगासमोर प्रश्न आहे की, अशा इस्रायलला पाठिंबा द्यायचा की नाही? अमेरिकेच्या कॉलेज कॅम्पसमध्ये गर्दी करणारे इस्रायल समर्थक विद्यार्थी या बदललेल्या परिस्थितीमुळे विचलित होऊ शकतात. त्यामुळे इस्रायलच्या अरब मित्र राष्ट्रांचीही कोंडी होणार आहे. जे अमेरिकन मुत्सद्दी इस्रायलला ज्यू-लोकशाही आहे आणि अमेरिकन मूल्यांवर चालणारे आहे, असे सांगून बचाव करत ते आता त्याला अब्जावधी डॉलर्स पाठवायला तयार होतील का? ज्या मित्रपक्षांनी नेतान्याहूंना पुन्हा सत्तेवर आणले आहे त्यांचा इस्रायलच्या अरब नागरिकांवर विश्वास नाही, त्यांना न्यायिक नियुक्त्यांवर पूर्ण नियंत्रण हवे आहे, त्यांना असे वाटते की, ज्यू वसाहती वाढवल्या पाहिजेत, जेणेकरून पॅलेस्टिनींसाठी वेस्ट बँकमध्ये एक इंचही शिल्लक राहू नये, ते नेतान्याहूंविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या खटले रोखू इच्छितात आणि त्यांच्या हृदयात एलजीबीटीक्यू हक्कांसाठी काहीही जागा नाही. आम्ही इटामार बेन-ग्वीरसारख्या नेत्यांबाबत बोलत आहोत, त्यांना २००७ मध्ये इस्रायली कोर्टाने वर्णद्वेष आणि यहुदी दहशतवादाचे समर्थन केल्याबद्दल दोषी ठरवले होते. बेन-ग्वीर यांच्या ज्यू पॉवर पार्टीशिवाय नेतान्याहू यांची युती होऊ शकली नसती. रिलिजियस झिओनिझम पक्षाचे नेते बेझालील स्मॉर्टिच यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा पक्ष आज इस्रायलमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. स्मॉर्टिच यांनी एकदा सुचवले की, इस्रायली रुग्णालयांच्या प्रसूती वॉर्डमध्ये ज्यू महिलांना अरब स्त्रियांपासून वेगळे ठेवले पाहिजे. ते वेस्ट-बँकवर इस्रायलच्या संपूर्ण ताब्याचे कट्टर समर्थक आहेत आणि पॅलेस्टिनी हिंसाचाराचा मुकाबला करण्यासाठी स्वीकारलेल्या कोणत्याही पद्धतीला यहुदी दहशतवाद म्हणता येणार नाही, असेही ते म्हणतात. नेतन्याहू यांना अनेक वर्षांपासून निवडणुका जिंकण्यासाठी अशा घटकांनी पाठिंबा दिला आहे-उदा. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत व्हाइट नॅशनॅलिझम म्हणतात तसे-परंतु, नेतन्याहू यांनी यापूर्वी कधीही बेन-ग्वीरसारख्या कट्टरपंथी घटकांचा स्वीकार केला नव्हता. नेतान्याहू यांच्याच लिकुड पक्षाचे सहकारी यामुळे अस्वस्थ आहेत. हे चिंताजनक आहे, कारण अनेक दशकांपासून पॅलेस्टिनी कधीही ज्यू राष्ट्र स्वीकारणार नाहीत आणि इस्रायलला स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणतीही लष्करी कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे इस्रायली उजवे मानत आले आहेत. पण, आता हा समज इतका विकृत झाला आहे की, प्रत्येक इस्रायली अरबाला संभाव्य दहशतवादी मानले जाते. लक्षात ठेवा, इस्रायलमध्ये २१ टक्के अरब लोकसंख्या राहते आणि विशेषतः त्यांच्या वैद्यकीय व्यवस्थेत अरब मोठ्या संख्येने आहेत. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, आता देशाबाहेरील शत्रूंऐवजी देशातील शत्रूंवर लक्ष केंद्रित केले जात आहे. या सगळ्याचा परिणाम अमेरिका-इस्रायल संबंधांवर होणार हे नक्की. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
थॉमस एल. फ्रीडमन तीन वेळचे पुलित्झर अवॉर्ड विजेते व ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे स्तंभलेखक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.