आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’च्या गोष्टी:नितळ डोळ्यांची नदी

प्रणव सखदेव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरा-बायको होणं सोप्पं असतं. तुलनेनं अवघड असतो तो आई-बाबा होण्याचा प्रवास. निसर्गाने दिलेलं आईपण बाई सहज पेलते, मात्र बाबा म्हणून घडण्याचा पुरुषाचा प्रवास वळणावळणाचा असतो. याच नाजूक प्रवासातल्या काही हळुवार थांब्यांविषयी सदराच्या आजच्या भागात...

सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण आयत्या वेळी कॉम्प्लिकेशन्स झाल्या आणि पोटातल्या बाळाच्या हृदयाची गती वेगाने वाढू लागली. त्यामुळे डॉक्टरीणबाई म्हणाल्या, तातडीने सिझेरियन करावं लागेल, दुसरा काही पर्याय नाही. माझ्यासमोर पोटातल्या बाळाचे ठोके मोजणाऱ्या यंत्रावर बीप... बीप... असा कर्कश्य, किंकाळी फोडल्यागत सतत वाढणारा आवाज कानात रुतून बसत होता. लगबगीने सिस्टर्स आल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मी आणि माझ्या जवळचे नातेवाईक आम्ही बाहेर हातात हात धरून उभे होतो. नॉर्मल डिलिव्हरी झाली तर मीही डिलिव्हरीच्या वेळेस सोबत असणार असं आम्ही ठरवलं होतं, पण आता मात्र माझे प्राण कंठाशी आले होते. डोळे डबडबले होते. घसा दाटून आला होता. ती जिवाला टोचणी लावणारी काही मिनिटं गेली असतील-नसतील तोच आतून बाळाचा टाहो फोडण्याचा आवाज आला! काही क्षणात सिस्टर सांगायला आल्या – मुलगी झाली! एकदम नॉर्मल आहे. अभिनंदन. मी विचारलं, आई कशीये? त्या म्हणाल्या, दोघी एकदम ओक्के!

माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येऊ लागलं. याआधीही अनेकदा माझ्या डोळ्यांतून पाणी आलं होतं, पण हे पाणी वेगळं होतं. पूर्णतः वेगळं – किती भावना वाहून आल्या होत्या त्या पाण्यात! अंतिमतः सगळं काही ठीक झाल्याचा आनंद, बाप झाल्याचं सुख, मुलगी झाल्यामुळे झालेला आणखीन वेगळा आनंद, आपल्यातून एका जिवाची निर्मिती होऊन तो जीव या जगात आलाय याची जगावेगळी अनुभूती...

काही वेळांतच पाळण्यात गुलाबी दुपटं, टोपडं घालून तिला आणण्यात आलं. इवलेले हात, डोक्यावर काळं-सोनेरी जावळ, उजळता वर्ण, लाल गाल आणि आकर्षून घेणारे इवलेसे डोळे. त्या ठिकाणी असलेल्या बल्बकडे टुकुटुकु पाहणारे. काय आहे हे, कुठे आलोत आपण... असा विचार करणारे. किती नितळ होते ते डोळे. ‘नदीसारखे नितळ.’ मी हळूच तिच्या कानापाशी जात म्हणालो- नितळ डोळ्यांची नदी आहेस तू माझी. तिच्या हातात बोट दिलं, तर तिने धरून ठेवलं.

तिचा पहिला स्पर्श मऊ, मुलायम सायीसारखा. आणि त्या स्पर्शाने ती होण्याआधीचा मी आणि ती झाल्यानंतरचा मी असे दोन मी अस्तित्वात आले. तिच्यासोबत जणू तिने मलाही बाप म्हणून जन्माला घातलं त्या स्पर्शातून. त्या स्पर्शाने असं काहीतरी बदललं माझ्यात की, मी मऊ, मृदू झालो. जणू काही जमिनीखालून एखादा झरा वाहत असावा, आपल्याला तो बरेच दिवस माहीतच नसावा आणि एक दिवस तो एखाद्या पाणक्याने दाखवावा तसं. तिच्या त्या स्पर्शाने मला माझ्यातल्या मायेच्या, पुरुषत्वात असलेल्या स्त्रीत्वाच्या झऱ्याला जागवलं. काय सुंदर अनुभूती होती ती! त्या दिवशी मी घरी आलो. कुलूप उघडून आत शिरलो, तर अंधार दाटला होता. त्याला सांगितलं, ती आली आहे. मग दिवा लावला. भिंती, टीव्ही, बुक शेल्फ, दरवाजे, फ्रिज, सगळ्या घराला सांगितलं की, ती आली आहे. मी हे त्यांना नव्हे, खरं तर मला समजण्यासाठी सांगत होतो – पुन्हा पुन्हा की, ती आली आहे. जसं पानांच्या देठातून कोवळं पान फुटतं ना तशी ती आली आहे. आपली मुलगी.

ये तुझं स्वागत आहे पोरी. या आमच्या लहानशा अवकाशात तुझं स्वागत आहे, जिथे तुझ्या पायरवाने जमिनीवर गोड शहारा उमटणार आहे. तुला पहिल्यांदा जेव्हा मांडीवर घेतलं तेव्हा काय भारी वाटलं होतं. एवढीशी, हाताएवढी होतीस तू. दुपट्ट्यात घट्ट गुंडाळलेली. छोटंसं फेफटं नाक, केस असलेलं कपाळ आणि कुत्र्याच्या पिल्लागत मिटलेले डोळे. तुला जितका जास्त स्पर्श होईल तेवढं चांगलं हे मी वाचलं होतं आधीच. त्यातून उबदार मायेची देवाणघेवाण होत असणार आपल्यात. त्यामुळे तुला अंघोळही आम्हीच घालायचो एकत्र मिळून. किती प्रतिसाद द्यायचीस तू. गाण्यांना, बोलण्याला, पाण्याला. अंघोळीआधी तेल वगैरे लावणं तर आपल्या दोघांचं आवडीचं! जणू तुला आधी कळायचंच आणि हातपाय हलवायला सुरुवात तुझी! हळूहळू मसाज करणं, हातापायांचे व्यायाम करणं, तुझ्या पक्ष्यांचा, फुलापानांचा गप्पा मारणं आणि त्यावर तुझं हातपाय हलवून (कधी कधी सू-शी करूनही!) प्रतिक्रिया देणं, खिदळणं. आपल्यात वेगळंच बाँडिंग तयार झालं. तू माझी मुलगी आणि मी तुझा बाबा हे नातं आहेच आपल्यात, पण त्याही पलीकडे आपण एकमेकांचे कोण आहोत? मला प्रश्न कायम पडतो. असं म्हणतात की, ताऱ्यांच्या राखेपासून निर्माण झालो आपण आणि मग असं होत होत एक जिवातून दुसरा जीव निर्माण झाला. अशी झाली सुरू जगरहाटी. जग हिच्या आधारानेच चालतं ते ठीकच, पण आपल्यात काहीतरी त्याहून पुढचं नातं, एक चिवट-जिवट धागा जोडला गेलाय. तू स्त्रीत्व घेऊन आलेलीस, मी पुरुषत्व घेऊन जन्मलेलो. पण एवढं ढोबळ, बायनरी नसावं सगळं. स्त्रीतत्त्वात पुरुषतत्त्व असणार आणि पुरुषतत्त्वात स्त्रीतत्त्व.

बातम्या आणखी आहेत...