आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लोकसमूहाचं रूपांतर मेंढराच्या कळपात झालं की दुसरं काय घडणार? कुठं राहिली लोकशाही लोकांची... उदयास येती घराणी नेत्यांची... आचारसंहितेचे त्यांना वावडे… निघतात लोकशाहीचे धिंडवडे... लोकशाहीचा अर्थ म्हणजे मतदान... नेता निवडण्यात आम्हीच नादान... लोकशाहीत त्यांच्याच हाती सत्ता... गल्ली ते दिल्ली त्यांचीच मालमत्ता... नावापुरता येतो लोकशाहीदिन... उभा दरबारी न्यायासाठी दीन... हे राष्ट्र पुढाऱ्यांना दिलं आंदणं... लोकशाहीच्या नावानं चांगभलं...
पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर सव्वीस जानेवारीला संविधान अस्तित्वात आलं. आपण लोकशाही स्वीकारली. लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी एकत्रित येऊन मतदानानं स्थापन करण्यात आलेली शासनप्रणाली म्हणजेच लोकशाही, असं आपण वर्षानुवर्षे ऐकत आलोय. पण या लोकशाहीत सर्वसामान्य लोकाचं कल्याण होतं का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मन विष्षण करणारं येतं. तेव्हा लोकांच्या डोळ्यात किती स्वप्नं होती. त्याच्या आशा-आकांक्षाना किती धुमारे फुटत होते. आता याचा हिशेब कोण मांडणार? लोकसमूहाचं रूपांतर मेंढराच्या कळपात झालं की दुसरं काय घडणार? कुठं राहिली लोकशाही लोकांची... उदयास येती घराणी नेत्यांची... आचारसंहितेचे त्यांना वावडे… निघतात लोकशाहीचे धिंडवडे... लोकशाहीचा अर्थ म्हणजे मतदान... नेता निवडण्यात आम्हीच नादान... लोकशाहीत त्यांच्याच हाती सत्ता... गल्ली ते दिल्ली त्यांचीच मालमत्ता... नावापुरता येतो लोकशाहीदिन... उभा दरबारी न्यायासाठी दीन... हे राष्ट्र पुढाऱ्यांना दिलं आंदणं... लोकशाहीच्या नावानं चांगभलं... असं म्हणण्याखेरीज लोकांच्या हाती काय असतं?
महात्मा गांधींनी लोकशाहीचं संवर्धन करणाऱ्या रामराज्याची संकल्पना मांडली होती. त्यालाच हरताळ फासला जातोय. कित्येकांची जीवनपुष्पे उमलण्यापूर्वीच कोमेजून किंवा कुस्करून टाकणारी एक भयानक विचारधारा समाजजीवनात रुजू पाहातेय. लोकशाहीचा समतोल ढासळणारी व्यक्ती अन् समाजाला संमोहनात ठेवणारी प्रवृत्ती वेगानं फोफावत चाललीय.भ्रष्टतेची, वितुष्टतेची जागोजागी साचणारी घाण, मनाला काचणारी आहे. लोकशाहीच्या नैतिकमूल्यांची होत चाललेली ही बरबादी कवीमनाला प्रचंड चीड आणणारी असते. समाजजीवनाची सर्वच प्रकारची स्वच्छता व्हावी म्हणून अभियान राबविलेल्या बापूनांच उद्देशून सुरेश भट विचारतात.
झोपला घाणीत माझा देश हा बापू
मी कशासाठी फुलांचे गीत आलापू?
देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल सात दशकं लोटली तरी सामान्य लोकांच्या जीवनमानात तसूभरही फरक नाही पडला. राजकीय नेत्यांनी मताच्या अधिकारानं लोकशाहीला वेठीस धरलं. आपल्याच जातीचा नेता निवडून यावा यासाठी समाजास जातीयवादाकडं वळविलं दुसऱ्या जाती धर्माचा विखारी प्रचार करून नेत्यांनी सत्ताकेंद्रे काबीज केली. त्यांचं जगणं आलिशान झालं. बहुसंख्य लोक मात्र अभावग्रस्ततेत, अत्यंत हलाखीत नाल्याच्या बाजूला झोपडपट्टीत जगत असतात. नेते मात्र सत्तेच्या कैफात लालबत्तीतून सुसाट धावत असतात. सामान्य लोकांचं परिवर्तन झालंच नाही. त्याचं दुःख, उपेक्षा वाढतच गेली. अखेर स्वातंत्र्यानं त्यांना काय दिलं? याचा हिशेब मांडणार केव्हा? असा सवाल मंगेश पाडगावकर उपस्थित करतात.
जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा?
जाब उंच प्रसादांचा मागणार केव्हा?
इथल्या मातीवर आस्थापूर्वक प्रेम करणाऱ्या, देशाशी इमान राखत रक्त सांडून नेत्यांनीच तर ब्रिटिशांच्या शृंखलेत आडकलेलं हे स्वातंत्र्य खेचून आणलं न्याय, बंधुता समतेसाठी देशात लोकशाही प्रस्थापित केली. लोकांना निर्भयपणे मतदान करण्याचा हक्क दिलं. त्याच्या नंतरची पिढी मात्र देशाचं वाटोळं करणारी मलईखाऊ अप्पलपोटी निघाली. स्वार्थ अन् अनाचार वाढत गेला. "इन्कलाब जिंदाबाद' या प्रेरणादायी नाऱ्याचं, महात्मा गांधीजींच्या महान तत्वाचं सोयीस्करपणे विसर पडत गेला. पूर्वीच्या ध्येयवादी नेत्यांचा आदर्श लोप पावत गेला. लोकशाहीची मूल्यं पायदळी तुडवणं सुरू झालं वारसाहक्कानं सत्तेच्या खुर्च्या मिळविलेल्या कर्तव्यशून्य पिढीसमोर स्वतंत्र देशात लोकांच्या जगण्याचं मातेरं होऊ लागलं. हा खेद नित्य खदखदतोय. याचा संताप प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय.
खेचून आणली जे स्वातंत्र्य, लोकशाही
त्यांची पिढी अशी का, बनली पुचाट आता?
निवडणुकीचा हंगाम आला की, चौका-चौकातून सभांना, भाषणांना ऊत येतो. भाडोत्री गर्दी अफाट होते. तीच ती भाषणं, तेच ते आरोप-प्रत्यारोप झडू लागतात. आपलाच पक्ष कसा लोकांचा कैवारी आहे. आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या कल्याणाचा खजिना कसा उघडणार आहे, अशी वारेमाप आश्वासनं देणं सुरू असतं. उन्हातान्हात बसलेल्या लोकांना भर दुपारच्या जेवणाची भ्रांत पडलेली असते. त्यांची पोटं पाठीला लागलेली असतात. त्याकडं मात्र ढेरपोट्या नेत्यांचं यत्किंचितही लक्ष जात नाही. नेते निघून जातात नित्यनेमानं याच पद्धतीनं लोकशाहीच्या गोंडस नावाखाली निवडणुकीचा खेळ खेळला जातोय. बिच्चारी जनता मात्र पाण्यासाठी तहानलेली, अन्नासाठी आसुसलेलीच. या शोकांतिकेकडं मन्मथ बेलुरे यांनी लक्ष वेधलंय.
चौकात भाषणाला गर्दी अफाट होती
बसले उन्हात त्यांची पोटे खपाट होती?
इथं सत्तेभोवती भ्रष्टतेचे कडे पडलेले असते. सत्तेचा वापर लोकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी करायचा असतो. हेच मुळी नेत्यांना ठाऊक नसतं. लोकांच्या दुःखाशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं. निवडणुकीच्या प्रचार सभांमधून लोकांना दिलेली सर्वांगीण उत्कर्षाची आश्वासनंही ते लगेच विसरुन जातात. अगदी साध्यासुध्या कामांसाठी लोक त्यांच्या दाराशी हेलपाटे मारून मारून हैराण होऊन जातात. पण नेत्यांना लोकांसाठी वेळ असतोच कुठे, गेंड्याच्या कातडीला काही जाणवत नसतं. सत्तेची खुर्ची म्हणजे त्यांना चोहीकडून चरण्याचे कुरणच वाटते. हा लोकांचा मोठा विश्वासघात असतो. ही भ्रष्टाचाराची कीडच देशाला पोखरणारी असते. या भ्रष्टतेच्या खुर्चीलाही वैताग आलेला असतो. खुर्चीचा हा वैताग घनश्याम धेंडे यांनी त्यांच्या शेरातून व्यक्त केलाय.
मंत्रालयास खुर्ची वैतागुनी म्हणाली
प्रत्येक भ्रष्ट मंत्री माझ्याच का कपाळी?
"लोकांचा, लोकांसाठी सन्मार्ग लोकशाहीचा' असं राज्यघटना सांगते. परंतु नेत्यांच्या वागणुकीतून तसं कुठंच पाहावयास नाही मिळत. लोकांच्या हिताचा सारासार विचार करून शासकीय योजनांची आखणी करण्यात आलेली असते. तथापि अशा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होताना नाही दिसत. या योजनेला मधल्यामध्येच फस्त करून आपली तुंबडी भरून घेणारे दलाल ठायी-ठायी ठाण मांडून असतात. त्यामुळे या योजना प्रत्यक्षात गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीत. मढ्याच्या टाळूवरील लोणी ओरपण्याचाच हा प्रकार असतो. ही लोकशाहीची शोकांतिकाच ठरते. नेत्यांच्या स्वार्थीपणाला काहीच धरबंध नाही. ते येणाऱ्या सात पिढ्यांच्या कल्याणाची सोय करून ठेवतात. त्यासाठी भलेही देश विकावा लागला तरी त्यांची तयारी असते. नेत्यांचीही लुच्चेगिरी लोकांनी वेळीच समजून घ्यायला हवी असा सल्ला रमेश सरकाटे देतात.
करून विधवा लोकशाही देश विकती हेच लुच्चे
कोण येथे राव आहे, घ्या तुम्ही समजून आता
लोकांना आता त्राताच उरलेला नाही. सत्ता नेहमीच लोकांची पिळवणूक करत आलीये. नेत्यांच्या खोटारडेपणाचा, दुटप्पी धोरणाचा लोकांना पावलोपावली प्रत्यय येतोय. 'मुकी बिचारी कुणीही हाका' अशी लोकांची अवस्था होऊन जाते. स्वार्थाच्या बजबजपुरीत आता पूर्वीसारखी सिंहासनाची शान कोठे राहिलीय. लोकांना लोकशाहीची फळे जर चाखायला मिळत नसतील तर अशा लोकशाहीचा उपयोग काय? सिंहासनाची होत चाललेली अप्रतिष्ठा भारती पोतदार यांनी यांच्या शेरातून समोर आणलीय.
चालली चोहीकडे स्वार्थी धुमाळी
शान कोठे राहिली सिंहासनाची
राजकारण म्हणजे अमाप धन कमविण्याचं क्षेत्र .असं राजकारण्यांना वाटतं. गल्ली ते दिल्ली त्यांची सुबत्ता, त्यांचीच मालमत्ता. सामान्य लोक मात्र भुकेकंगाल. गझलकारांनी त्यांच्या दांभिकपणावर, भामटेगिरीवर, लुच्चेगिरीवर काही शेरातून कोरडे ओढले आहेत. संविधानानं दिलेलं समतेचं बोलं, लोकांचा मोल नेते जाणून घेणार आहेत की नाही. हा लोकशाही समोर खरा प्रश्न आहे.
sabirsolapuri@gmail.com
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.