आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गझलेच्या गावात:​​​​​​​गझलेतील गझल...

14 दिवसांपूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

आपण नुकताच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला. पुढील आठवड्यात मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहोत. या पार्श्वभूमीवर विचार केला तर गझल हा खऱ्या अर्थानं मराठी भाषा समृद्ध करणारा काव्यप्रकार आहे. त्या अनुषंगानंच गझलेकडं पाहावं लागेल. जीवनाच्या वाटेवर गझल आपणास किती किती रंगांनी, ढंगानी, अंगांनी भेटते. मनाला पटते. भिडते. गझल शब्दसृष्टीचा पहिला हुंकार… गझल परतत्वस्पर्शाचा ओंकार… गझल मातीचा संस्कार… गझल आत्म्याचा उद्गार… गझल संवेदनांचा अविष्कार… गझल प्रीतीचा शृंगार… गझल स्पर्श तिचा हळुवार… गझल गात्रातील झंकार… गझल विजांचा पदर… गझल चांदण्यांचे अधर… गझल सुखाचे आगार… गझल डोळ्यातील धार… गझल घराउरातील आग… गझल चंद्रफुलांची बाग… गझल काय नाही ते विचारा! गझल धगधगता निखारा…गझल स्वप्नांचा सप्तरंगी पिसारा… गझल जगण्याचा सहारा…

गझल या आपल्या लाडक्या सखी विषयी मस्त गझला गुणगुणाया लागलो, मी तुझ्यासाठी लिहाया लागलो, असं म्हणत गझलकारांनी काय-काय नोंदवून, गोंदवून ठेवलंय. आशा निराशा, गुंता चिंता, मिलन विरह, द्वेष प्रेम, चीड भीड, सहवास, भास, उपहास... मानवी जीवनातील भावभावनांचा सगळा एकजिनसी अर्क गझलेच्या एकेक शेरातून टपकत राहातो. गझल अनुभवांचं समृद्ध दालनच रसिकांसमोर खुलं करते. हे नक्षत्राचं देणं ज्याला हवं ते त्यानं खुशाल लुटावं. अशी साद गझल घालत असते. हे गझलेचं औदार्यच. नामवंत गझलकारांनी 'गझल' या शब्दाची शेरातून सुरेख गुंफण करत विविधरंगी फुलांचा गुलदस्ता आपल्याला पेश केलाय.

प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुरेश भटांनी सद्भावना व्यक्त करताना शेरांच्या माळेत गझल हा शब्द चपखलपणे ओवलाय. एका दिग्गजानं दुसऱ्या दिग्गजाविषयी अभिव्यक्त केलेली ही सदिच्छा लाखमोलाची आहे. अंत:करणात स्नेहाचा खळाळता झरा असल्याशिवाय सद् भावनेची बरसात होत नाही. ही भटांची दर्यादिली. ज्यात आभाळमाया दाटलेली होती गझलेतून जगणं जिवंत करणारे भटसाहेब आशाबाईंबद्दल लिहितात.

तुज बघून हटल्यामागे आलेल्या वादळ वाटा सुखरूप तुझ्या गीतांचे, गझलांचे गलबत राहो!

गझल ही संवादाची भाषा आहे. ती सहज सोपी असायला हवी. संवाद नैसर्गिक व्हायला हवा. अर्थहीन दुर्बोधता, नुसता शब्दांचा काथ्याकूट, छाटकेपणा, नटवेपणा गझलेला रुचत नाही. रसिकांनाही पचत नाही. मौन आशयाला अनुरूप शब्द देत त्याला बोलकं करता आलं की सुबोध संवाद घडत जातो. मोजक्या नि:संग्दिध शब्दांतून उमलणारी अशी गझल दीर्घकाळ ओठांवर रेंगाळत राहाते. रसिक गुणगुणत राहातात. इतकेच नव्हे तर आकाशही त्याचा अदब करतो. एवढी परिणामकारकता त्यात असते. साधी, सरळ गझल यशाची ग्वाही देत असते. हे पक्क ठाऊक असणाऱ्या वा.न. सरदेसाई यांना हे तंत्र चांगल्यातऱ्हेनं साधलय.

मी गझल गुणगुणत माझी रस्त्याने चालत होतो आकाश मज पुढे तेव्हा अदबीने नमले होते!

ज्याला गझलेचा पूर्णवेळ ध्यास लागलेला असतो तोच गझलेत 'जिगर का खून' मिसळून लिहित असतो. गझलेमध्ये केवळ छंद पुरेसा नसतो तर त्यात थोडी आसवे अन् रक्तही असावे लागतेच. तरच सोसणं, जगणं-मरणं सगळं काही गझलेतून प्रकट होत जातं. शायर जीवनाची कहाणी शेरांतून सांगत राहातो. खोट्या चेहऱ्यांच्या जगात गझलकाराला अनेक पातळ्यांवर जगावं लागतं. त्याचं वैयक्तिक दुःख तर असतंच. पण जगानं भेट दिलेल्या जखमांना मनाच्या ओंजळीत घ्यावंच लागतं. कारण गझल हा काही 'स्वान्त सुखाय' प्रकार नाही. यात प्रखर सामाजिक भान बाळगावं लागतं. जगाच्या जखमा जिवाशी खेळ मांडणाऱ्या असल्या तरी त्याला सुगंधी जखमा समजून त्या फुलाप्रमाणे गझलांमध्ये गुंफाव्या लागतात. मग गझलही दरवळायला लागते. असे पुष्प खावर आपल्या पुढ्यात ठेवतात.

जगाने भेट ज्या जखमा दिल्या 'खावर' मला गुंफिल्या पुष्पापरी त्या माझिया गझलांत मी!

शेराच्या दोन ओळींमध्ये अवघे भावविश्व उभे करण्याची शक्ती असते. गझलेचं हे सामर्थ्यशाली रूप देवही जाणून असतो. गझल हा मुळात भावनिक काव्यप्रकार आहे. जिथं भाव इथं देव हे ठरलेलं समीकरण. देव भावाचा भुकेला असतो. असंही म्हटलं जातं. 'मनी नाही भाव देवा मला पाव' असं नाही घडत. गझलेतला भाव देवालाही आकर्षित करत असावं म्हणून देव गझलेवर प्रसन्न झाला असावा. गझलेतलं मुग्ध, स्निग्ध चांदणं इथून तिथून सगळ्यांनाच प्रफुल्लित करतं. उजळून टाकतं. याला देवही अपवाद असण्याचं कारण नाही. कवीनं गझल लिहावी म्हणून तो त्याला पृथ्वीवरती पाठवतो. देवालाही भुरळ पाडण्याची विराट शक्ती गझलेच्या ठायी असते. याचा अनुभव प्रदीप निफाडकर यांनी दोन ओळीत म्हणजे एका शेरात मांडलंय.

देवास कधी मी म्हटले 'मज पाठव पृथ्वीवरती' मी गझल लिहावी म्हणून त्यांनेच ढकलले होते

जगण्यापासून गझलेला अलग करताच नाही येत. जगण्याची प्रतिबिंबं गझलेत उमटतात. जगानं दिलेले आयुष्याचे सगळे रंग गझलेमध्ये उतरतात. माणूस एकटा कधी असतो? सुख दुःखाची सावली निरंतर त्याच्याशी पाठशिवणीचा खेळ खेळत असते. गझलकाराच्या विचारांची खळबळ, भावनेची घालमेल अन् गझलेशी असलेलं जगण्याचं नातं हे सारं काही गझलेतून अविष्कृत होणं अपरिहार्य ठरतं. गझलेच्या एकेक शेरातून गझलकाराचं आत्मचरित्र उलघडत जातं. अंतरीचे धावे, स्वभावे बाहेरी! तशी अंतरातली तगमग, अगतिकता गझलेतून बाहेर पडू लागते. दिलीप पांढरपट्टे यांच्या शेरातून याचेच प्रत्यंतर येते.

दाटले हृदयात ते ते शब्द होऊन उमटले गझल माझी वेगळे का बोलली आहे कुठे!

गझलेचं सख्य मूलतः अंतर्बाह्य सौंदर्याशी असते. गझलेच्या आकृतिबंधात जशी खूबसुरती असते. तशीच तिच्या अंतरंगातही असतेच असते. सच्च्या प्रेमाचं, सौंदर्याचं, कलात्मकवृत्तीचं दुसरं नाव म्हणजे गझल. विश्वातल्या मांगल्यावर, साफल्यावर गझलकार निष्ठा ठेऊन असतो. गझलेत गझलकाराच्या रक्ताचा रंग मिसळलेला असतो. मग अशी कलाकृती ही वैयक्तिक मिळकत नाही राहात. ती वैश्विक होऊन जाते. गझलकार एक गझल लिहितो म्हणजे तो एकापरीनं ताजमहल बांधत असतो. धन:शाम धेंडे आपल्या शेरातून याचाच तर निर्वाळा देतात.

जेव्हा लिहितो एक गझल मी जणू बांधतो ताजमहल मी!

दार ठोठावत येणारी गझल झंजावातासारखीच असते. तिला सामोरं जाणं भाग असतं. ही खडतर वाट एकदा का पार केली की पुढे दिसते ते गझलेचे अंगण ! अनावर इच्छाच गझलकारास इथंपर्यंत घेऊन येते. आकाशाची सोबतही असते. कित्येकांना ताजमहल बघण्याचं भारी वेडं असतं. पण गझलकारास गझलेचे अंगण प्रिय असते. गझलकार गझलेच्या नाळेशी बांधलेला असतो. या अंगणात त्याला कळतं गझल जन्मते कशी, काळजाच्या गाभ्यातून बाहेर कशी येते. प्रसववेदना काय असते. गझल आसवांतून कशी झरते. हळुवार मनाच्या तळ्यात तरंग कसे उठतात. ही सर्जनाची प्रक्रिया गझलेच्या अंगणात घडत असते. शब्दांना आशयाचं वैभव इथंच प्राप्त होत असतं. शब्दांच्या पल्याड जाणं हेच तर गझलकाराचं लक्ष्य असतं. कलीम खान यांचा शेरही त्या वाटेनंच जाणारा आहे.

शब्दांपल्याड जाणे, असतेच लक्ष्य माझे पण पाय बांधलेले, गझलांगणात माझ्या

गझल जशी अविष्काराच्या आंदोलनाची भाषा आहे तसंच ती कोमल हृदयाच्या स्पंदनाचीही भाषा आहे. 'तो आणि ती' मधील संवादाला गझलेसारखी दुसरी भाषा नाही. त्याला मोती माणके लगडलेली असतात. त्यात लडिवाळपणा, मोकळेपणा, उत्कटता, निरागसता, नजाकत सगळं काही आहे. एक दुसऱ्याला शब्दातून समजून घेणं ही असतं. सुनंदा पाटील यांनी हीच मागणी लाडक्या गझलेजवळ केलीय.

गझलेजवळी आले काही घेण्यासाठी नकोस अडवू कधी लाडके शब्दासाठी

गझल आपणास रोज अफलातून कल्पनांची, चमत्कृतींची, नवी जादू दाखवत असते. आपण अंतर्बाह्य भारून जातो. तिच्या प्रेमात पडतो. तिचे होऊन जातो. ती आपली होऊन जाते. म्हणून तर गझलकारांनी तिला नानाविध उपमा अलंकारांनी मढवलयं, सजवलयं, ती रुपाची राणी कुणाला बरं नकोशी होईल? contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...