आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अघळपघळ:वर्णद्वेष त्यांचा... वर्णद्वेष आमचा!

सचिन परब7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेळ आपल्या जगण्याचा भाग असतो. जगण्यातल्या गोष्टी खेळात येणारच. मग वर्ण ऑस्ट्रेलियातला असो की भारतातला. तो खेळात येतोच. पण भारतासाठी वर्ण वेगळा आहे आणि ऑस्ट्रेलियासाठी वेगळा. दोन्हीकडच्या द्वेषासाठी आपल्याकडे फक्त शब्द सारखा आहे.

गोष्ट गेल्याच रविवारची, १० जानेवारीची. सिडनीच्या मैदानात भारताची टीम ऑस्ट्रेलियाला ढासू ठसन देत होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या इनिंगमधली ८६वी ओवर होती. मोहम्मद सिराज अम्पायरच्या दिशेने चालत येताना दिसला. कॅप्टन अजिंक्य रहाणेने प्रेक्षकांमधलं एक टोळकं वर्णद्वेषी शेरेबाजी करत असल्याची तक्रार केली. आदल्या दिवशीही सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनाही अशाच शिवीगाळीला तोंड द्यावं लागलं होतं.

मॅच १० मिनिटं थांबवण्यात आली. पोलिसांनी सहा जणांना स्टेडियमच्या बाहेर हाकलवलं. चौकशीतून समोर आलं की ते टोळकं भारतीय खेळाडूंना ब्राऊन डॉग आणि बिग मंकी असं चिडवत होतं. त्याविरोधात भारतातून निषेध व्यक्त झालाच. पण तितकाच निषेध आणि दिलगिरी ऑस्ट्रेलियाने एक देश म्हणून, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघटना म्हणून, बहुसंख्य खेळाडूंनी व्यक्तीशः आणि संघ म्हणून व्यक्त केलीय. हे ऑस्ट्रेलियासाठी एक यजमान म्हणून शोभणारं होतं.

वर्णद्वेष क्रिकेटला नवा नाही. मुळात हा खेळ प्रामुख्याने ब्रिटिश वसाहतींपुरता मर्यादित. त्यामुळे त्या गुलामगिरीतून पाझरणाऱ्या अवगुणांचा वारसाही हा खेळ चालवतो. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्या क्रिकेटच्या इतिहासात वर्णद्वेषाच्या अनेक घटना आहेत. पण आपल्या हरभजन सिंगवरही त्याचा आरोप झालाय. वेस्ट इंडिजच्या डॅरेन सामीनेही आयपीएलदरम्यान ड्रेसिंग रूममधे कालू म्हटलं जात असल्याची तक्रार केलीय. अर्थात वेस्ट इंडिजचे कृष्णवर्णीय खेळाडूही एकेकाळी भारतीय वंशाच्या खेळाडूंना कुली म्हणून हिणवत.

भारतातही वसाहतकाळात क्रिकेटला राजेरजवाडे आणि ब्राह्मणांनी उचलून धरलं कारण क्रिकेटमधे फूटबॉल आणि हॉकीसारखा एकमेकांना स्पर्श करावा लागत नाही. त्यामुळे क्रिकेटमधे स्पर्शावर टिकलेला त्यांचा तथाकथित धर्म बुडत नव्हता. तोच `महान` वारसा असल्यामुळे भारत कसोटी खेळू लागल्यानंतर साठ वर्षांनी पहिला दलित खेळाडू टीम इंडियाचा भाग बनला. तो म्हणजे आपला विनोद कांबळी. त्यानंतर कर्नाटकचा डोडा गणेश. दोन वर्षांपूर्वी इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकलीत मांडलेल्या अभ्यासानुसार तोवरच्या २८९ कसोटीपटूंपैकी फक्त चार जण दलित होते.

आज आयपीएलमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातल्या टॅलेंटला संधी मिळतेय. पण त्यातही दलित, आदिवासी, ओबीसी सोडाच पण बहुसंख्याक शेतकरी जातींची मुलंही संख्येने कमीच आहेत. अर्थात त्यांची संख्या आधीच्या तुलनेत वाढते आहेच. सहाजिकच भविष्यात क्रिकेटमधे त्यांचंच राज्य असणार आहे. पण उद्या ही बहुजन मुलं मैदान गाजवत असतील, तेव्हा क्रिकेटचं ग्लॅमर आतासारखंच असेल, वाढलं असेल की जाणीवपूर्वक संपवलं जाईल, हे पाहायला फार वाट बघावी लागणार नाही.

खेळ आपल्या जगण्याचा भाग असतो. जगण्यातल्या गोष्टी खेळात येणारच. मग वर्ण ऑस्ट्रेलियातला असो की भारतातला. तो खेळात येतोच. पण भारतासाठी वर्ण वेगळा आहे आणि ऑस्ट्रेलियासाठी वेगळा. दोन्हीकडच्या द्वेषासाठी आपल्याकडे फक्त शब्द सारखा आहे. अर्थात ऑस्ट्रेलियाला वर्ण हा शब्द माहीत असण्याचंही कारण नाही. आपण ज्याला वर्णद्वेष म्हणतो ते त्यांच्यासाठी रेसिस्ट होतं. एरव्ही आपण इंग्रजीतल्या रेसला वंश म्हणतो. त्यामुळे दंगली, संघर्ष, आंदोलन, श्रेष्ठत्व याविषयी रेसिस्टसाठी वांशिक असाही शब्द आहेच. पण सर्रास वापरला जाणारे शब्द वर्ण, वर्णभेद, वर्णद्वेष किंवा वर्णवाद. माणसांच्या गोऱ्या काळ्या रंगांसाठी गौरवर्ण, कृष्णवर्ण असे शब्द वापरात होतेच. त्यातून माणसाच्या कातडीचा रंग या अर्थाने वर्ण हा शब्द आला असावा.

पण भारतात वर्ण या शब्दाला फक्त कातडीचा रंग यापेक्षाही खूप वेगळा अर्थ आहे. आपली थोर्थोर भारतीय संस्कृती वर्ण या गोष्टीवरच उभी असल्याचं अनेक थोर्थोर अभ्यासकांचं म्हणणं आहे. प्राचीन वगैरे काळी भारतात चार वर्ण होते म्हणे. `चातुर्वर्ण्य` हीच आपल्या संस्कृतीची ओळख हजारो वर्षं सांगितली गेलीय. ती उतरंड आहे. सर्वात श्रेष्ठ ब्राह्मण वर. त्याखाली क्षत्रिय. त्याखाली वैश्य. आणि सगळ्यात तळाला शूद्र. या वर्णव्यवस्थेने भारतीय समाजात कायमस्वरूपी भेदाच्या भिंती उभ्या केल्या. बहुसंख्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचे हक्कच हिरावून घेतले.

गुण आणि कर्मानुसार कुणालाही आपला वर्ण ठरवता यायला हवा, असं सांगणाऱ्या श्रीकृष्णांपासून आजच्या टेक्नॉलॉजीपर्यंत वर्णव्यवस्थेच्या भिंती उलथवण्याचे प्रयत्न झाले. पण त्यामुळे काही चिरे निखळले इतकेच. प्रत्येक वेळेस हादरे बसले, तेव्हा वर्णद्वेषाने डिट्टो या पोकेमॉनपेक्षाही वेगाने रूप बदललेले दिसले. भेद तसेच राहिले. जाती या वर्णव्यवस्थेतून जन्माला आल्यात की नाही, याविषयी दोन्ही बाजूंनी खूप अकॅडमिक चर्चा झालीय. पण आजही एखाद्या जातीचं नाव पहिल्यांदा ऐकल्यावर समोरचा सहज विचारतो, म्हणजे कोण? त्याला या प्रश्नातून इतकंच विचारायचं असतं की तुमची जात चार वर्णांपैकी कोणत्या रकान्यात बसते.

कायद्याने अस्पृश्यता संपवता येऊ शकते. जातभेदाला अटकाव करता येतो. पण वर्णभेदाचं काय करणार? कारण वर्ण ही गोष्ट दाखवताच येत नाही. ती फक्त पुस्तकांत किंवा फार तर प्राचीन इतिहासातली गोष्ट म्हणूनच सापडते. वास्तवात दिसतात फक्त दुष्परिणाम. बाकीच्या जगातल्या वर्णभेदाचं तपशीलात डॉक्युमेंटेशन झालंय. पण भारतातला वर्णभेद तर अमूर्त आहे. त्यामुळे त्याची गचांडीही धरता येत नाही.

उलट आज वर्णव्यवस्थेभोवती आरती ओवाळण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यासाठी आध्यात्मिक धर्मगुरू, इतिहासकार, विद्वान आणि ललित लेखकांचीही लाईन लागलीय. कधीकाळी पारतंत्र्यात असताना भारतीयांचं खच्चीकरण करण्यासाठी पाश्चिमात्य भारताच्या प्रत्येक गोष्टीला हीन ठरवत होते. त्याला उत्तर म्हणून तेव्हा परंपरेतल्या प्रत्येक गोष्टीचे गोडवे गायले जात होते. पण आता देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षं उलटलीत. आजही आपण एक देश म्हणून उभं राहण्यातच आडकाठी आणणाऱ्या वर्णव्यवस्थेसारख्या संकल्पनेला प्राचीन भारतीय समाजशास्त्र म्हणून गौरवणार असू तर कठीण आहे. देशातल्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त लोकसंख्या जिच्या खिजगणतीतही नव्हती, ती व्यवस्था म्हणे परिपूर्ण होती!

भारतीय खेळाडूंना कुत्रा किंवा माकड म्हटल्याने ऑस्ट्रेलियासारखा आडदांड देशही माफी मागतो. वर्णद्वेषावरूनच अमेरिकेत मोठं आंदोलन होतं. ते एका राष्ट्राध्यक्षाला पायउतार करून बहुसंख्यवादाला आटोक्यात आणलं जातं. आणि आमच्याकडे एक स्वतःला साध्वी म्हणवणाऱ्या प्रज्ञा सिंग नावाच्या खासदार खुलेआम विचारतात, `ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटलं तर काही वाटत नाही, मग शूद्रांनाच शूद्र म्हटलं तर का वाईट वाटावं?` त्यावर कुणालाही काहीही वाटत नाही.

इतरांचं ठीक आहे, पण `शूद्रवंशी जन्मलो। म्हणोनी दंभे मोकलिलो।।` असं सांगणाऱ्या तुकोबारायांच्या महाराष्ट्राने तरी त्याचं उत्तर द्यायला हवं होतं. एकटे तुकोबाच नाही तर सगळी वारकरी संतपरंपराच आपलं शूद्रपण अभिमानाने मिरवत वर्णअभिमान विसरण्याचा उपदेश करत होती. तुकोबांच्या आधी तीनेकशे वर्षं नामदेवराय प्रश्न विचारत होते, `तुम कहां के बम्मन। हम कहां के सूद।।` संत सावता माळी सांगत होते, `भली केली हीन जाती। नाही वाढली महंती।।` संत शेख महंमद म्हणत होते, `बरवा केलों मुसलमान। नाही विटाळी आठवण।।` संत जनाई सांगत होत्या, `स्त्रीजन्म म्हणवूनी न व्हावे उदास`. वर्णव्यवस्थेने सेवेला हीन ठरवून ते काम शूद्रांना दिलं. त्याच सेवेला संतांनी सर्वोच्च स्थान दिलं. मूठभरांना सर्वोच्च स्थान देणाऱ्या वर्णव्यवस्थेचा पिरॅमिड त्यांनी उलटा केला होता.

म्हणूनच क्रिकेटच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात तिथल्या वर्णद्वेषाच्या विरोधातली जागृती दिसत असताना इथल्या वर्णद्वेषाविषयी तुकोबारायांच्या महाराष्ट्राची उदासीनता जास्त अस्वस्थ करते.

ssparab@gmail.com

बातम्या आणखी आहेत...