आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:जीवनमूल्यांच्या लढ्याचा नवा चेहरा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील राजेशाह्यामधले संकुचित स्वातंत्र्य, रूढींचा अतिसोस आणि बुरसटलेले विचार लपून राहिले नाहीत. हे धुडकावून लावले जातात तेंव्हा जगभरातील सामान्य जनतेस मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा आणि एकसंधतेचा संदेश जातो. गोरेपणाच्या अतिरेकी हव्यासाने पछाडलेल्या आणि राजेशाहीसमोर अकारण मान तुकवण्याच्या कणाहीन वृत्तीत भलाई मानणाऱ्या भारतीय मानसिकतेला यातून काही बोध घेता आला तर बरेच होईल.

या आठवड्यामध्ये एक विलक्षण घटना घडली तिची नोंद पाश्चिमात्य माध्यमांनी निवडक पद्धतीने घेतली तर अन्य काही देशात त्याबद्दल क्वचित चर्चा झडली. अमेरिकेच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या घोषणापत्राला (डिक्लेरेशन ऑफ इंन्डीपेंडन्स) अनन्यसाधारण महत्व आहे. थॉमस जेफरसन हा विचारवंत राजकारणी त्या घोषणापत्राचा जनक होय. अमेरिकेत असलेल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वसाहती आणि त्याआडून सुरु असलेलं शोषण यांच्याविरुद्ध जेफरसनने आवाज उठवला होता. लोकशाही, संघराज्यवाद, व्यक्तिगत अधिकारांचे रक्षण यांचा तो खंदा पुरस्कर्ता होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद देखील जेफरसनने भूषवले होते. अमेरिकेत त्याला जनकाची (फाउंडीग फादर) उपमा बहाल केली गेलीय. या थॉमस जेफरसनच्या पत्नीचे नाव होते मार्था वेल्स. तिला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली होती. ती वंशवेल यथावकाश वाढत राहिली. दरम्यान मिश्र वर्णीय संबंधातून जन्माला आलेली सॅली हेमिंग्ज नावाची एक गुलाम स्त्री जेफरसनच्या पदरी होती. या स्त्रीला त्याच्यापासून सहा अपत्ये झाली. सुरुवातीची काही दशके या अपत्यांना नाकारलं गेलं होतं ही वस्तुस्थिती होती. मात्र नंतरच्या पिढ्यात जैवशास्त्रीय आधारांच्या बळावर सॅली हेमिंग्जला झालेल्या अपत्यांचे पितृत्व थॉमस जेफरसनकडेच होते हे स्वीकारावे लागले. अर्थात उदारमतवादी आणि खुल्या विचारसरणीच्या कट्टर समर्थक असणाऱ्या अमेरिकन जनतेने खळखळ न करता हे सत्य स्वीकारले. मागील वर्षी विख्यात अमेरिकन छायाचित्रकार ड्र्यू गार्डनर यांनी काही ख्यातनाम व्यक्तींच्या स्मृतीघटकासह त्यांच्या नव्या पिढीची तसबीर पेश केली होती. याच शृंखलेतले एक पोर्ट्रेट होते थॉमस जेफरसनचे आणि त्याच्या सहाव्या पिढीतील नातवाचे. शेनॉन लेनिअर हा जेफरसनचा सहाव्या पिढीतला बंदा. त्याची वंशवेल ही सॅली हेमिंग्जच्या शृंखलेतील होती. थॉमस जेफरसनसारखी वेशभूषा केलेल्या शेनॉनचे पोर्ट्रेट खूप काही चर्चिले गेले नव्हते. काही निवडक पोर्टल्सवर याविषयी अल्पकालीन चर्चा झाली आणि विषय मागेही पडला. मात्र या आठवड्यातील टॉप ट्रेंडींग फोटोजमध्ये ही तसबीर आली तेंव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. याला पार्श्वभूमी होती ब्रिटिश राजपुत्र हॅरी आणि त्याची पत्नी सम्राज्ञी मेगन मार्कल यांनी केलेल्या खळबळजनक विधानांची. त्यामुळेच हा पोर्ट्रेटवजा फोटो इतका चर्चेत आला की त्याखालच्या कमेंट्सवरून वादविवाद झडू लागले. यात नेटिव्ह अमेरिकन विचारांच्या पुरस्कर्त्या लोकांनी कोणत्याही देशाचे प्रवासी वा परकीय नागरीक आमचा हिस्सा असूच शकत नाही या ट्रम्पवादी भूमिकेचा पुनरुच्चार केला तर उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्यांनी हीच खरी अमेरिकेची ओळख असल्याचं म्हटलं. कारण थॉमस जेफरसन श्वेतवर्णीय होते, सॅली हेमिंग्ज मिश्रवर्णीय होती तर शेनॉन लेनिअर हा देखील मिश्रवर्णीय शरीर लक्षणे असणारा आहे. त्याचं मूळ दक्षिण अमेरिकन आणि आफ्रिकन असं असल्याने त्यात समावेशकता दिसते. श्वेतवर्णीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्याने ब्रिटिश वसाहतवादाचे जोखड फेकून दिले होते त्याच्या नव्या पिढीचं तुलनात्मक वैचारिक उदात्तीकरण करण्यासाठी ब्रिटिश राजघराण्यातील राजपुत्र आणि स्नुषा यांचं सनसनाटी विधान पूरक ठरलं हे विशेष होय. नुकतीच काही दिवसापूर्वी राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्कल यांची मुलाखत विख्यात मुलाखतकारा ऑप्रा विन्फ्रे यांनी घेतली होती. ही इतकी खळबळजनक ठरली की अमेरिकन लोकांनी ऑप्रा विन्फ्रे शोच्या ऐतिहासिक लोकप्रियतेचे दाखले सोशल मीडियावर नव्याने दिले. ऑप्रा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत हॅरी आणि मेगन दांपत्याने ब्रिटिश राजघराण्यास अनुसरून वंशद्वेष, परंपरावाद, मानसिक आरोग्य आणि मीडिया या विषयांवर चर्चा केली. राजघराण्यासोबत राहताना आलेल्या अनुभवांबद्दल बोलताना मेगन यांचं विधान लक्षणीय आहे. राजघराण्यातील एका व्यक्तीकडून वर्णद्वेषमूलक टिप्पणी झाल्याचे हे विधान होते. या विधानाचा अर्थ जाणून घेण्यासाठी मेगनची पार्श्वभूमी जाणून घेणे इष्ट ठरते.

राजपुत्र हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. ब्रिटिश राजघराण्यातील पहिली मिश्र वर्णीय सदस्य असणारी मेगन ही कॅलिफोर्नियास्थित अभिनेत्री होती. लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणासाठी असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विंगसाठी मेगनने काम केलंय. स्त्री शिक्षण आणि मासिक पाळीशी निगडीत समज-गैरसमज यासारख्या विषयांवर तिने 'टाइम' मासिकात लिहिलंय. 2011 मध्ये चित्रपट निर्माते ट्रेवर एंजलसनसोबत मेगनचं लग्न झालं होतं. मात्र दोनच वर्षांत ते विभक्त झाले. त्यानंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचं प्रेम जुळलं. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचा शाही विवाह जगभरात गाजला. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जाऊ लागले. लग्नात मिळालेला तब्बल 63 कोटी रुपये किमतीचा आहेर या दांपत्याने परत केला होता. मेगन तिच्या मुक्त आणि सामाजिक उदारमतवादी विचारासाठी ओळखली जाते. गतवर्षी मेगनने न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'द लॉसेस वी शेअर' या मथळ्याखाली लिहलेल्या एका लेखात गर्भपात करावा लागल्याने आपल्याला दुसरे मुल गमवावे लागल्याची खंत व्यक्त केली होती. या लेखात आपल्या पतीची साथ किती महत्वाची आहे हे सांगताना राजघराण्यावर काही कटाक्षही टाकले होते. विशेष म्हणजे या लेखात करोनाकाळात झालेल्या दुःखद घटनांचे उल्लेख करताना पोलिसांच्या अमानुष मारहाणीत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर तिने तीव्र शब्दांत मत नोंदवलं होतं. यावरून लक्षात येतं की मेगनच्या जडणघडणीची मूस आणि ब्रिटीश राजघराण्यातील शाही व्यक्तींचे परंपरावादी कुळ अत्यंत भिन्न व विरोधी आहे. याची परिणती म्हणून जानेवारी 2020 मध्ये प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कल यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यान्वये त्यांचा पाहिला पुत्र आर्ची हा देखील ब्रिटीश राजघराण्याच्या हक्क आणि उपाध्यापासून दूर झाला. या दांपत्याने हा निर्णय घेण्यामागे यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मुक्त विचारधारेवर असणारे प्रेम कारणीभूत ठरते.

अशा या आगळ्यावेगळ्या पार्श्वभूमीच्या दांपत्यास दुसरे मूल झाले तेंव्हा त्याच्या जगभर बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र बातमीमागची मेख ऑप्रा विन्फ्रेच्या मुलाखतीत प्रकाशझोतात आली. यात हॅरी - मेगन यांनी ब्रिटीश राजघराण्यातील एका व्यक्तीने वंशद्वेषाची टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. "राजघराण्यातील एका व्यक्तीने त्यांच्या मुलाचा रंग किती काळा असेल" अशी विचारणा केल्याचं सांगत पुढे जाऊन मेगन म्हणाली की, "काही दिवस मला एकटं वाटत होतं. माझ्या जीवनात असं कधीच झालं नव्हतं. अनेक नियमांमध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. हॅरीसोबत असताना मी एकटेपण अनुभवत नव्हते. पण, त्यांना काही कामासाठी बाहेर जायचं असेल तर, मी खूप एकटी असायचे. मला अनेक गोष्टी करण्याची परवानगी नव्हती. बहुदा यामुळेच एकटेपणा वाढत होता," हे सांगताना मेगनने 'अनसर्वाइवेबल' हा शब्द वापरला होता. त्याचा अर्थ विषद करताना तिने सांगितलं की, "मला जिवंत रहायचं नव्हतं. हॅरीला या गोष्टी सांगण्यात मला संकोच वाटत होता. त्यांनी जीवनात बरंच काही गमावलं आहे. त्यामुळे हा भीतीदायक प्रश्न नेहमी माझ्या डोक्यात घर करून असायचा." या बेधडक मुलाखतीमुळे बकिंगहम पॅलेस वादाच्या भोवऱ्यात अडकला. चौफेर टीका होऊ लागताच राजघराण्याने त्रोटक प्रतिक्रिया देत म्हटलं की, "हॅरी-मेगन यांच्यासाठी मागील काही वर्षे किती आव्हानात्मक होती, हे ऐकून शाही कुटुंबाला खूप दुख: झालं. तसेच ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स यांनी राजघराण्यावर वंशद्वेषाचा केलेला आरोप चिंतेत टाकणारा आहे. या मुद्यावर कुटुंबात खासगी चर्चा केली जाईल." मात्र या खुलाशामुळे मूळ मुद्द्यास एकप्रकारे बळकटीच लाभली. ब्रिटिश राजघराणं हॅरी, मेगन आणि त्यांचा मुलगा आर्चीला सदैव प्रेम करत रहातील असाही खुलासा राजघराण्यास करावा लागला. राजघराणं वंशद्वेषी टिप्पणी विरोधात उभं राहिलं नाही याचं मेगनला दुःख झालं. मुलगा आर्चीला सुरक्षा आणि युवराज पदवी न मिळाल्याबद्दलही मेगनने प्रश्नचिन्ह लावले. 'मेगन गर्भवती असताना तिच्या मुलास किंवा मुलीस प्रिन्स किंवा प्रिन्सेसची पदवी देण्याबद्दलचे नियम बदलले गेले. हा हक्क ते हिरावून घेऊ शकत नाहीत. हा नियम मेगनचा मुलगा आर्चीसाठी बदलला आहे. मेगनचा प्रश्न होता तर असे का व्हावे ?' असा मेगनचा सवाल होता. या मुलाखतीत एक कटाक्ष मीडियावरही टाकला गेला. आपली आई डायना हिचा मृत्यू केवळ अतिउत्साही मीडियामुळे झाला याचे शल्य असल्याचे मत हॅरीनी मांडलं. डायनाच्या मृत्यूसमयी बारा वर्ष वय असणाऱ्या हॅरीनी एक दशक लष्करी सेवा बजावली आहे आणि आता हे कुटुंब समाजसेवेसाठी दक्ष आहे. या सर्व घडामोडी पाहू जाता ब्रिटीश राजघराणं किती खुज्या विचारांचं आहे हे स्पष्ट होतं. कधी काळी ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता त्यांच्या काळजात अजूनही किती विखार भरलेला आहे याचे हे दार्शनिक होय. याचा अर्थ राजघराण्यातील सगळ्याच व्यक्ती याच विचाराच्या आहेत असंही समजायचंही कारण नाही.

लिचेंनस्टीनचे राजपुत्र मॅक्समिलन आणि युवराज्ञी अँजेला ब्राऊन यांचाही असाच आंतरवर्णीय विवाह झाला होता. युरोपियन राजघराण्यात विवाह होणारी अँजेला ही पहिली आफ्रिकन युवती होती. आपल्याकडेही पतौडीचे नवाब असणाऱ्या मन्सूर अली खान यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी विवाह केला होता, त्यांचा मुलगा अभिनेता सैफअली याने करीना कपूरशी विवाह केला. सिक्कीमचे बारावे राजे (चोग्याल) पालडेन नामग्याल यांनी अमेरिकन युवती होप कुकशी केलेला विवाह चर्चित ठरला होता. थाई राजे भूमिबोल यांची कन्या राजकुमारी उबोल रत्ना हिचा विवाह देखील असाच होता. पीटर जेन्सन या अमेरिकन तरुणाशी तिने लग्न केलं होतं. डेन्मार्कचे युवराज ज्योशिम आणि जॉर्डनचे राजे हुसेन हे याच पंक्तीत येतात. यातले बरेचसे विवाह अखेरपर्यंत टिकले नाहीत. मात्र जो बेधडकपणा आणि खुलेपणा हॅरी - मेगन यांनी दाखवला तो अन्य कुणी दाखवला नाही हेही एक वास्तव आहे. जगभरातील राजेशाह्यामधले संकुचित स्वातंत्र्य, रूढींचा अतिसोस आणि बुरसटलेले विचार लपून राहिले नाहीत. हे धुडकावून लावले जातात तेंव्हा जगभरातील सामान्य जनतेस मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा आणि एकसंधतेचा संदेश जातो. लेखाच्या सुरुवातीस उल्लेखलेल्या जेफरसन आणि शेनॉन लेनिअरच्या पोट्रेटमध्ये यामुळेच खऱ्या अर्थाने विश्वाचे एकतत्व दडले आहे. जे मानवी जीवनमूल्यांसाठी महत्वाचे आहे. गोरेपणाच्या अतिरेकी हव्यासाने पछाडलेल्या आणि राजेशाहीसमोर अकारण मान तुकवण्याच्या कणाहीन वृत्तीत भलाई मानणाऱ्या भारतीय मानसिकतेला यातून काही बोध घेता आला तर बरेच होईल. राजेशाहीचे सर्व संकेत धुडकावून लावून भारतीय एकजिनसीपणाचे, सामाजिक समतेचे बीज रुजवणारे सयाजीराजे गायकवाड, शाहू महाराज यांचे विचार आणि आचरण इथे नकळत सुखावून जाते हेही नमूद केलं पाहिजे..

sameerbapu@gmail.com

बातम्या आणखी आहेत...