आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिर्झापूरपासून अवघ्या दहा किलोमीटरवरच्या जसोवर गावात राहणारी सानिया मिर्झा. गावातल्या शाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मिर्झापूरला आली. आपलं शिक्षण ितनं हिंदी माध्यमातून पूर्ण केलं. या शिक्षणादरम्यानच सानियाने भारताची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदीची मुलाखत वाचली होती. ती मुलाखत बघितल्यापासूनच सानियाच्या मनात आपणही फायटर पायलट होण्याच्या स्वप्नाचे अंकुर फुटले होते. त्यामुळे बारावीची परीक्षा झाल्यानंतर लगेच तिने मिर्झापूर इथल्या कोचिंग क्लासेसमध्ये एनडीएची तयारी सुरू केली होती. सानियाचे वडील- शाहिद अली यांनीही मुलीच्या या स्वप्नाला भक्कम पाठिंबा दिला आणि दुसऱ्याच प्रयत्नात सानिया एनडीएच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. एनडीएच्या पहिल्या प्रयत्नातील अपयशानंतर सानिया निराश झाली होती. पण, पुन्हा नव्या जोमाने तिने अभ्यासाला सुरूवात केली. स्वत:च्या अभ्यासातल्या कमतरतांवर तिने लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच तिच्या दुसऱ्या प्रयत्नांना यश आले. फायटर पायलट होण्याचं स्वप्नं पाहिलेल्या सानियाला विज्ञान विषयात रुची आहे. लहानपणापासून तिला अभियंता व्हायचे होते, मात्र, अवनी चतुर्वेदींची मुलाखत बघितल्यावर आपण फायटर पायलट होण्याचे निश्चित केले, असे ती सांगते. अवनी या सानियाच्या प्रेरणास्त्रोत आहेत. प्रत्येक मुलीने शिकावे. आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे, स्वत:ची आणि आपल्या आई-वडिलांची स्वप्नं साकार करावीत, असं सानियाला वाटतं. मुस्लिम समाजात मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण तुलनेने कमी आहे. शिवाय, आई-वडिलांनी जमवलेला पैसा त्यांना मुलीच्या लग्नात खर्च करावा लागतो. पण, आर्थिक परिस्थिती बेताचीच असणाऱ्या सानियाच्या पालकांनी मुलीसाठी साठवलेला सगळा पैसा तिचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी खर्च केला. सानियाच्या आई-वडिलांनी तिच्या पायलट बनण्याच्या स्वप्नात मोलाचे योगदान दिले. त्यांनी तिच्यावर कोणताही दबाव येऊ दिला नाही. ‘सानियाने आई-वडील म्हणून केवळ आमचीच मान उंचावली नाही, तर संपूर्ण गावची मान उंचावल्यामुळे आपल्या मुलीचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो,’ असे सानियाचे आई-वडील सांगतात. छोट्याशा गावातल्या सानियाने गगनभरारी घेत केवळ स्वत:चे स्वप्नच साकार केले नाही, तर आपल्यासारख्याच इतर मुलींसाठीही आदर्श निर्माण करून एक चांगला मार्ग दाखवला आहे. काहीतरी बनण्याची जिद्द, त्यासाठी परिश्रम घेण्याची, स्वत:तील कमतरता कमी करुन बलस्थाने सक्षम करण्याची तयारी यामुळे यशाला गवसणी घालता येत, हेच सानियाने दाखवून दिले. तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
टीम मधुरिमा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.