आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Sanjay Awate Special Article | Hindustani Bhau Article Sanjay Awate | Divya Marathi In A New Form In The New Year! State Editor Sanjay Awate

काळ कठीण आहे.:नव्या वर्षात दिव्य मराठी नव्या रूपात! - राज्य संपादक संजय आवटे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुमच्या मुलांनी अशा ‘हिंदुस्थानी भाऊ’चं अनुयायी होऊ नये, अशी इच्छा असेल, तर आधी तुम्ही वाचायला हवं. बोलायला हवं. घरात हे वातावरण तयार व्हायला हवं.

‘हिंदुस्थानी भाऊ’ या इन्स्टा हँडलवर १४ लाख अनुयायी असणाऱ्या, विकास पाठक नावाच्या वाह्यात माणसाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परवा इतकं भडकवलं की पोरं रस्त्यावर आली. ऑनलाइन परीक्षेची मागणी करू लागली. ‘हिंदुस्थानी भाऊ’मुळं पोरं चेकाळली आहेत, कारण तीच भाषा आपण या “हिंदुस्थानी’ पोरांच्या ओठात दिली आहे. त्या भाषेला तुम्हीच मुख्य प्रवाह केले आहे. अशी भाषा वापरणाऱ्यांना तुम्हीच सत्तास्थानी बसवले आहे. या पोरांचा नेता ‘हिंदुस्थानी भाऊ’ आहे, यासाठी तुम्ही त्यांना अपराधी कसे मानणार? याला जबाबदार आपण आहोत. कोणी विचारच करू नये, अशी व्यवस्था आपण जन्माला घातली आहे.

चर्चाच करायची नाही, असं आपण ठरवलेलं आहे. जो चर्चा करेल, तो देशद्रोही. जो मान हलवेल, तो देशभक्त, अशी नवी व्याख्या आहे. त्यामुळं होयबांची सध्या चलती आहे. “लष्कर ए तोयबा’पेक्षा या “लष्कर ए होयबा’ची भीती आम्हाला जास्त वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना संसदेत सादर केली, तेव्हा त्यांचं २५ नोव्हेंबर १९४९ चं गाजलेलं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात, तुम्ही एकदा मुद्दा मांडलात आणि तो मला पटला नाही, तर तुमचा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लावेन. पण, मला मान्य नसलेला तुमचा मुद्दाही तुम्हाला मांडता यावा, यासाठी जिवाची बाजी लावेन.

तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपलाचि वाद आपणाशी पण, ही स्पेस आहे कुठे? वेगळा मुद्दा मांडला की त्याचा दाभोलकर होतो. गोविंद पानसरे होतो. गौरी लंकेशचा खून होतो. कलबुर्गींचा खून होतो. मग, नयनतारा सहगल यांच्यासारख्या म्हातारीची भीती वाटते. मग, भीती वाटते जावेद अख्तर यांचीही.

असा हा काळ आहे. नकार देणं सोपं नाही. विरोध करणं सोपं नाही. ही वेळ का येऊन ठेपली? कशी येऊन ठेपली? जागतिकीकरण आल्यानंतर दबलेल्या समूहांना आवाज मिळाला. नव्या अस्मिता तयार झाल्या. द्विध्रुवीय जग बहुध्रुवीय झाले. म्हणून तर, बर्लिनची भिंत कोसळली आणि १९८९ नंतर पुढची अडीच दशके भारतात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय राजकारणाची जागा व्यापली. म्हणून तर अमेरिकेत बराक ओबामांसारखा बहुसांस्कृतिक ओळख असणारा तरूण अध्यक्ष झाला. पण, ओबामांच्या देशात डोनाल्ड ट्रम्प आले. गांधींच्या देशात असत्याचे प्रयोग सुरू झाले. जागतिकीकरणाच्या खुलेपणानेच नवी बंदिस्तता जन्माला घातली. एकसुरी, एकसाची अशा एकसंधतेची कल्पना जन्माला येऊ लागली. एक ठळक सूर आणि त्याला विरोध करणारा दुसरा ठळक सूर याच्या दरम्यानचे सगळे आवाज संपू लागले. सपाटीकरण वेगाने सुरू झाले. जग पुन्हा एकध्रुवीय झाले. बर्लिनच्या कोसळलेल्या भिंती पुन्हा उभ्या राहिल्या. ‘बर्लिन ते ब्रेक्झिट’ असा हा कालखंड आहे.

माहितीच्या महामारीला कोरोनाच्या महामारीची आता साथ मिळाली आहे. माणसं एकमेकांपासून दूर जाऊ लागली आहेत. डिजिटल जगाची मातृभाषाच विखार ही आहे. भंजाळलेपण ही नव्या जगाची प्रकृती आहे. वाढलेली विषमता कोरोनाने वाढवत नेली आहे. माणसं निराश, एकाकी झाली आहेत आणि मीडिया नावाच्या उत्तेजक द्रव्यानं त्यांच्यात भयंकर कृत्रिम तरतरी आणली आहे.

‘व्हर्च्युअल शत्रू’ असल्याशिवाय हल्ली पोरांना खेळही खेळता येत नाहीत. एकीकडं बाजारानं आयपीएलसारख्या सामन्यांमधून देशांच्या सीमारेषा संपवून टाकल्या. पण, मोबाइलवरच्या गेममध्ये मात्र शत्रू असल्याशिवाय, त्याला धाडधाड गोळ्या घातल्याशिवाय पोरांना चैन पडेना झाली. असाच व्हर्च्युअल शत्रू समाजकारणात- राजकारणात- रोजच्या वावरण्यातही हवा असतो. मग स्थलांतरितांच्याच जोरावर वाढलेल्या अमेरिकेसारख्या देशालाही “बाहेरच्यां’ची भीती वाटू लागते. ही भीती दाखवून प्रगतीची स्वप्नं दाखवली जातात. डिजिटल जगात पोरं मग्न असतानाच, बिचारे स्थलांतरित मजूर आपल्या देशात रेल्वेखाली चिरडले जातात. या डिजिटल नशेनं वास्तवापासून दूर जाता येतं, पण जेव्हा ते समोर येतं तेव्हा आत्मघाताशिवाय दुसरा मार्ग नसतो.

विरोधी सूर नकोच, अशा या व्यवस्थेत “भक्त’ तयार होतात. ते विरोधी सूर संपवू पाहातात. त्यांना विरोध करणारेही मग त्यांच्याच भाषेत बोलू लागतात. राजकारण अशा वळणावर जातं की कोणी प्रशांत किशोर सत्तेची गणितं बदलू शकतो. भारतातल्या सर्वसामान्य माणसाला प्रजासत्ताकानं “नागरिक’ केलं. निवडणुकांच्या राजकारणानं त्यांना “व्होटबँक’ करून टाकलं. जागतिकीकरणानं त्यांना ‘बाजारपेठ’ केलं. आणि, या डिजिटल जगानं माणसांचं रूपांतर फक्त “डेटा’मध्ये करून टाकलं आहे. अशा या जगात “आउट ऑफ साइट’ असलेली माणसं टाचा घासून मरताहेत आणि श्रीमंतांच्या तिजोरीत रोज नवी भर पडते आहे.

अशा या काळात “हिंदुस्थानी भाऊ’ जन्माला येत असतो. तुमच्या मुलांनी अशा ‘हिंदुस्थानी भाऊ’चं अनुयायी होऊ नये, अशी इच्छा असेल, तर आधी तुम्ही वाचायला हवं. बोलायला हवं. घरात हे वातावरण तयार व्हायला हवं.

“दिव्य मराठी’चा प्रयत्नच हा आहे, तुमच्या कक्षा रूंद करण्याचा. बंद दरवाजे उघडण्याचा. विचारी जग घडवण्याचा. म्हणून, आता “दिव्य मराठी’ येतो आहे - नव्या रूपात. नवे वाचनीय, विचारप्रवर्तक स्तंभ घेऊन आम्ही येत आहोत. आता तर, तुमच्या घरात ‘दिव्य मराठी’ येणं अपरिहार्य आहे. भवतालातल्या अंधाराला हटवणारी हीच पणती आहे!

बातम्या आणखी आहेत...