आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवं वर्ष सुरू झालं म्हणता म्हणता वर्षाचा दुसरा महिनाही उजाडला. नव्या वर्षाच्या पहिल्या काही दिवसांत, पहिल्या महिन्यात किती उत्साह असतो लोकांना! शुभेच्छांचा वर्षाव होतो, कवितांवर कविता रचल्या जातात, फॉरवर्ड केल्या जातात. कवितांचा नुसता पाऊस पडतो! अरे हो! कवितेवरून आठवलं. नव्या वर्षाच्या स्वागताला मीसुद्धा एक कविता केली होती, “नवीन वर्षाचा करू नवीन संकल्प, आळसाला नको विराम, पूर्ण किंवा स्वल्प, आयुष्याचे आनंदी दिवस आहेत किती अत्यल्प...’ नाही, पण याच्या पुढचं काही सुचेना. संकल्प` शब्द शेवटी घेतल्यामुळे यमकाचा घोळ झाला असणार. यांना विचारून बघितलं, पण “अगं, सोपं आहे, मोहिनी! “मॅंगो पल्प’ जुळतंय का बघ बरं!’ असं काहीतरी वाक्य फेकून हे निघून गेले. आता “मँगो पल्प’ कुठून जुळवणार? तरी कायाकल्प, विकल्प, प्रकल्प, असे बरेच शब्द आठवून बघितले, पण त्यातला एकही शब्द त्या वाक्यात बसेना. आमच्या रोहन आणि स्वातीसारखे हे शब्दही कधी हाताला लागायचे नाहीत. छे! डायरी लिहिता लिहिता हे कुठं भरकटले मी! तर, “संकल्प’.. प्रत्येकाचे नव्या वर्षाचे वेगवेगळे संकल्प असतातच. आमच्या घरातल्यांनीही मॉर्निंग वॉकचा संकल्प केला होता. ३१ डिसेंबरला रात्री बारा वाजल्यानंतर झोपताना सगळ्यांनी “सकाळी लवकर उठणारंच’, अशी गर्जना केली होती. पण, सकाळी गजर वाजून वाजून, कंटाळून उताणा पडला, तरी सगळे ढाराढूर. बायकांचे संकल्प मात्र घरातल्या इतरांच्या संकल्पावरच अवलंबून असतात. रोजच्या कामातून वेळ मिळाला, तर संकल्प. संकल्प कुठला करायचा, या समस्येपेक्षा उद्या “भाजी कुठली करायची’ ही समस्या त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. असो. जानेवारी महिना असाच गेला. पहिला महिना देवाला, असं समजून फेब्रुवारीत नव्याने काही सुरू करायचं ठरवलं होतं.
सकाळी सकाळीच शेजारच्या गॉसिपकाकू... सॉरी, विमलाकाकू घरात येऊन बसल्या. ‘तुला कळलं का गं, त्या अर्जुनचं आणि मलायकाचं फारसं पटत नाही म्हणे!’ त्यांनी नेहमीच्या आवडीचा विषय काढला. विमलाकाकूंना त्यांच्या मुलानं स्मार्टफोन घेऊन दिल्यापासून त्या सतत कुठल्या ना कुठल्या बातम्यांच्या लिंक ओपन करतात आणि त्या सगळ्या बातम्या खऱ्याच मानून रोज स्वतःला धक्के बसवून घेतात. “काकू, कोणाची डाळ कुठे शिजतेय, यापेक्षा आपल्या घरच्या कुकरमधली डाळ तीन शिट्ट्यांमध्ये शिजणार, की नंतर खलबत्त्यानं कुटावी लागणार, हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही का?’ हे वाक्य मी विमलाकाकूंच्या तोंडावर फेकून मारलं, तरीही त्या हटायला तयार नव्हत्या. वेबसाइटवरच्या खबरी संपल्यानंतर त्यांनी सोसायटीतल्या प्रत्येक घरातली कहाणी सांगायला सुरुवात केली, मग मात्र मला त्यांना थांबवावंच लागलं. “काकू, अहो तुमच्या अमृतासारखीच दिसणारी एक मुलगी परवा पार्कमध्ये एका मुलाच्या हातात हात घालून फिरताना दिसली.’ अशी पुडी मी सोडली आणि काकूंना एकदम त्यांनी गॅसवर ठेवलेल्या दुधाची आठवण झाली. त्या सटकल्या. “नव्या वर्षात जास्त तेलकट, बाहेरचं खायचं नाही,’ असाही एक संकल्प यांनी केला होता, पण तो जेमतेम पंधरा दिवस टिकला. आज संध्याकाळीच हे येताना कोपऱ्यावरच्या गाडीवरून चार वडापाव घेऊन आले. त्यांचं मन राखण्यासाठी मलाही ते खावेच लागले. बाकी कुठला विशेष संकल्प केला नसला, तरी एक मात्र ठरवलं होतं, यंदा डायरी लिहायची. आजपर्यंत डायरीत, कॅलेंडरवर फक्त दुधाचा आणि जमाखर्चाचा हिशेब लिहायची सवय. आता म्हटलं, आयुष्याचा जमाखर्च मांडून बघू. जमतंय हळूहळू. अडखळत, धडपडत का होईना, जमेल तशी डायरी लिहितेय. सध्या तरी मनातलं कागदावर उतरतंय. वर्षभर लिहायचा विचार आहे. ठरवलं तर जमेल. नक्कीच जमेल!
संपर्क : ९८८१०९८०७०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.