आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागीता यथार्थ ज्या एक सिंगल पॅरेंट (एकल पालक) आहे, त्यांनी फेसबुकवर बाथरूममध्ये कमोडवर बसलेला स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर गीताच्या विरोधात अनेकांनी रान उठवून त्यांना अवार्च्य शब्दात शिवीगाळ करून अशा पद्धतीने फोटो टाकायची गरज काय इथपासून ते नाना विविध प्रकारचे सल्ले दिले. हा विषय केवळ त्या एका फोटोपुरता मर्यादित नाही तर समाजात आजही बुरसटलेल्या विचारांचा बाजार किती बिनदिक्कतपणे मांडला जातोय त्याचा हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी एखादी महिला जेव्हा चौकट तोडू पाहते, त्यावेळी तिच्यावर असेच आघात केले जातात.
" हा फोटो टाकण्यामागे माझे फार काही नियोजन नव्हते. एका क्षणी तो विचार मनात आला आणि मी ते केलं. ते अशासाठी की, माझा मुलगा यथार्थ फक्त साडेचार वर्षाचा आहे. मी सिंगल मदर आहे. मी टॉयलेट मध्ये असताना त्याने दरवाजा बाहेरून बंद करू नये किंवा त्यावेळी त्याला काही झालं, तो पडलाबिडला तर मला माहित व्हावं म्हणून या सुरक्षिततेच्या भावनेपोटी मी बेडरूम किंवा टॉयलेटचा दरवाजा कधीही बंद करत नाही. मात्र त्यादिवशी यथार्थने मी कमोडवर बसलेली असताना माझा फोटो काढला तेव्हा माझ्या मनात विचार आला की सगळ्याच सिंगल मदरसोबत असं होत असावं का...? त्यांनाही एक मिनिटासाठीहीही प्रायव्हसी जगता येत नसाव का...? अशा प्रश्नांनी मला घेरलं, ते जाणून घ्यावसं वाटले आणि मी तो फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यावर काही नेटकऱ्यांनी केवळ शब्दांत मांडता आलं नसतं का असा सल्ला दिला. पण मला वाटतं एक फोटो हजार शब्दांचे काम करतो आणि तुम्ही आता ते पाहातच आहात...'' - गीता यथार्थ.
गीता यथार्थ ज्या एक सिंगल पॅरेंट (एकल पालक) आहे, त्यांनी फेसबुकवर बाथरूममध्ये कमोडवर बसलेला स्वत:चा एक फोटो शेअर केला आणि त्यानंतर गीताच्या विरोधात अनेकांनी रान उठवून त्यांना अवार्च्य शब्दात शिवीगाळ करून अशा पद्धतीने फोटो टाकायची गरज काय इथपासून ते नाना विविध प्रकारचे सल्ले दिले. तर त्याचवेळी त्यांच्या समर्थनार्थ काही नेटकऱ्यांनी खिंड लढवून त्यांच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. हा विषय केवळ त्या एका फोटोपुरता मर्यादित नाही तर समाजात आजही बुरसटलेल्या विचारांचा बाजार किती बिनदिक्कतपणे मांडला जातोय त्याचा हा प्रश्न आहे. प्रत्येकवेळी एखादी महिला जेव्हा चौकट तोडू पाहते, तिला जे वाटतंय ते बोलू पाहते त्यावेळी तिच्यावर असेच आघात केले जातात.
ट्रोलिंगला उत्तर देताना गीता म्हणते की, एखाद्या स्त्रीला ती आई आहे असं म्हणणं हे फार उदात्त वाटतं. पण तिला ती भूमिका निभावताना कशाकशाला तोंड द्यावं लागतं हे पाहणं गरजेचे असते. तिच्या आईच्या भूमिकेला ग्लोरिफाय करणं योग्य नाही असं मला वाटतं. माझ्या या फोटोवर खुप वादळ उठलं. अनेकांनी अत्यंत हीन भाषेत कॉमेंट्स लिहिल्या. पण हा फोटो अश्लील नाही, त्यात नग्नता नाही.
गीता जे म्हणतेय त्यात खरोखरच तथ्य आहे. जो फोटो त्यांनी टाकलाय तो आक्षेपार्ह आहे असे काहीजणांना वाटत आहे तर याफोटो मध्ये कुठल्याही प्रकारची अश्लीलता नाही असे काही जणांचे म्हणणे आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात सगळ्यांनाच आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तो या घटनेतही लागू होतो. मात्र आपल्याकडे बहुतांश ठिकाणी कित्येक दशकांपासून घर सांभाळणाऱ्या 'आई' च्या कामाला काहीच दर्जा, मोल, कामाचा मोबदला असे काहीच दिले जात नाही. हे तिचे कामच आहे असा शिक्का मारत आले आहेत.
आईची महती सांगण्यासाठी इतिहासचे दाखले देण्याची गरज नाही. या भूतलावर जो मनुष्यप्राणी आहे त्याच्या आयुष्यात आई हा अविभाज्य घटक आहे. त्यातही सध्या सिंगल पॅरेंट असतील तर त्यांची तारेवरची कसरत असते. नोकरी व्यवसाय संभाळून, घर आणि मूल यांचा संभाळ करणे अशी दुहेरी जबाबदारी त्या सांभाळत असतात. त्यात लहान मूल असेल तर मानसिक आणि भावनिक पातळीवरील कालवाकालव ही प्रत्येकाची वेगळी असते. आई कुठेही गेली तरी तिचे मन त्या बाळाभोवतीच असते. हातातलं काम संपवून तिला त्या बाळाच्या भेटीची ओढ लागलेली असते. एकदा का ती घरी पोहचली की संपूर्ण वेळ ती त्याच बाळासाठी दिलेला असतो. आपण बाहेर काम करत असल्यामुळे मुलाला जास्त वेळ देत नसल्याची दुबळेपणाची भावना तिच्या मनात घर करून असते. मात्र सिंगल पॅरेंट असल्याने चरितार्थ चालविण्यासाठी अनेकांना नोकरी व्यवसाय करावाच लागतो. सिंगल पॅरेंटचं आयुष्य हे इतरांपेक्षा नक्कीच वेगळं असतं. प्रामुख्याने त्यांना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो, त्यातूनच मार्ग काढत आपला मार्ग त्या सुकर करीत असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये ह्या खूप वेगळ्या असतात. काही सिंगल पॅरेंट ह्या रोजच्या कसरतीत एवढं काही गुरफटून गेलेले असतात की त्यांना स्वतःसाठी वेळच नसतो. त्यांनाही मन आहे, ते त्यांना कुठेतरी मोकळं करायचं असतं, ओरडून सांगायचं असतं पण अनेकवेळा असं घडतंच असे नाही. समाज काय बोलेल या भावनेतून त्या कधीच व्यक्त होत नाही. त्या कोंदटलेल्या मनात अनेक गोड-कडू भावना साठवून त्या दिवस काढत असतात. ह्या दुट्टपी आणि सोयीनुसार भूमिका घेणाऱ्या समाजाला ' फाट्यावर' मारणाऱ्या काही असतात. त्यातूनच मग गीता यथार्थसारख्या महिला या पूर्ण ताकतीने वेगळी मात्र अचूक भूमिका मांडतात आणि त्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात.
गीता यथार्थ यांनी त्याच्या फेसबुक अकाउंटवर त्या भारतीय माहिती आणि प्रसारण खात्यात काम करतात असे नमूद केले आहे. त्यांनी फेसबुकवर सिंगल पॅरेंट कोणत्या आव्हानांचा सामना करीत आपले दैनंदिन आयुष्य व्यस्थित करत असतात त्याच दिनचर्येतील एक फोटो फेसबुकवर शेअर केला. या फोटोवरून काही लोकांनी त्यांना कमेंटच्या माध्यमातून झोडपून काढण्याचे काम केले आहे. मात्र त्यावेळी गीतासुद्धा त्याच ताकदीने कमेंट्सला जशास तसे उत्तरे देताना पाहायला मिळतात. त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी सिंगल पॅरेंट कशा पद्धतीने मुलांचा सांभाळ करीत असतात असा लहानसा मात्र महत्त्वपूर्ण मुद्दा त्यांनी मांडला आहे. त्यावर समाजमाध्यमातून एवढी आगपाखड का करताय ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणालाच मिळत नाही.
मुंबई येथील मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंदडा सांगतात कि, "अतिकाळजीतून असे प्रकार घडू शकतात, त्यात सिंगल पॅरेंट असल्याने त्यांना आपल्या लहान मुलांविषयी चिंता वाटणे साहजिकच आहे. त्यांनी त्यांचा हा फोटो प्रतिकात्मक म्हणून टाकला असावा. अनेक सिंगल पॅरेंट असतात त्यांना त्याच्याविषयी या फोटोतून भावना व्यक्त कराव्याशा वाटू शकतात. फोटोबाबत तर प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. काहीना या मध्ये अश्लीलता वाटणार नाही तर काहींना ती वाटूही शकेल. यामध्ये चूक बरोबर असा विषय नसतो तर एखाद्या विषयांवर मत व्यक्त करण्याचा त्या मातेचा अधिकार आहे. तो ती कशा पद्धतीने व्यक्त करते यावर अनेक चर्चा रंगू शकतात. शास्त्रीय भाषेत त्या आईला एन्झायटी असू शकते... आपल्या लहान मुलांविषयी काळजी वाटू शकते. त्यांना वाटू शकते कि सिंगल पॅरेंट असणाऱ्या महिलांचे आयुष्य खडतर असते, तर हे मांडलेलं त्यांचं मत आहे यात काही वावगे नाही."
अगदी काही महिन्यांपूर्वी, अभिनेत्री वनिता खरातने कॅलेंडरसाठी केलेले 'न्यूड फोटोशूट' चर्चेचा विषय ठरले. "लोकांना शरीर दिसते, सौंदर्य दिसत नाही,' असे सांगत तिने केलेले हे फोटोशूट इतर 'प्लस साइज' मॉडेलसाठी आदर्श ठरले. त्यावेळीही सोशल मीडियावर असाच गदारोळ उडाला होता. वास्तविक तो एक बॉडी पॉझिटिव्हीटी' मूव्हमेंटचा भाग होता. कोणत्याही मृगजळाला बळी न पडता स्वत:ला आहे तसे स्वीकारण्यात शहाणपण आहे, असा संदेश बॉडी पॉझिटिव्हीटी माध्यमातून दिला जातोय. तुमच्या शरीराचा आकार कसाही असो किंवा वजन कितीही असो, तुम्हाला त्याचा अभिमान असायला हवा, त्यात आनंदी असायला हवे. स्वत:वर प्रेम केले पाहिजे आणि त्यासाठी 'साइज'चे काहीही देणे-घेणे नसते. तुमच्या आनंदाची, समाधानाची आणि कम्फर्ट व्यक्तिमत्त्वाची व्याख्या तुमचे वजन नक्कीच ठरवू शकत नाही. हा मागचा उद्देश आहे. वनिताने असा "आऊट ऑफ द बॉक्स' जाऊन विचार मांडला आणि तिला विखारी समाजव्यवस्थेला सामोरे जावे लागले.
दक्षिणेच्या राजकारणात उतरलेले अभिनेते कमल हसन यांनी त्यांच्या जाहिरनाम्यामध्ये गृहिणींना मासिक वेतन देण्याची घोषणा केली आणि समाजमाध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली. गृहिणी घरात राबतात, अनेक कामं करतात. मात्र, त्या कष्टाची दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे त्यांना ओळख मिळावी, त्यांचं सशक्तीकरण व्हावं, यासाठी हा मोबदला देणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही फक्त राजकीय घोषणा आहे की नाही हे तर नंतर कळेलच परंतू जे समाज चौकटीच्या बाहेरचं आहे, प्रस्थापित व्यवस्थेला छेद देणारे आहे ते लोकांच्या पचनी पडत नाही हेच यानिमित्ताने पुन्हा दिसून आले.
गीता यथार्थ यांनी त्यांच्या या छोट्याश्या कृतीतून सिंगल पॅरेंटच्या जीवनातील दाहकता समाजमाध्यमांवर मांडण्याचा प्रयत्न केला. आयुष्यभर निर्भीड पणे लढणाऱ्या या सिंगल पॅरेंटना मदतीचा हात देता आला नाही किंवा त्यांचे कौतुक केले नाही तरी चालेल मात्र किमान त्यांना दुखऱ्या शब्दांनी ओरबाडू नका. गीता यथार्थ यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट ही त्यांना स्वतःला बरे वाटावे या एका हेतूने केली नसून अनेक सिंगल पॅरेंटला दिलासा मिळावा या जनहितार्थ हेतूने केली असेल तर स्वागत करावयास काय हरकत आहे.
santoshandhale.mmm@gmail.com
संपर्क - ९८७०४९०६०३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.