आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाज-संस्कृती:‘उठेगा अनल् हक का नारा’

2 महिन्यांपूर्वीलेखक: सरफराज अहमद
  • कॉपी लिंक

फैज अहमद फैज यांनी लिहीलेली ‘हम देखेंगे’ ही कविता अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. विशेषतः त्यातील ‘अनल हक’ या संकल्पनेमागे विवेकवादाचा सत्ता आणि धर्ममुखंडांशी झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे. फैज यांनी वापरलेल्या ‘अनल हक’ चा इतिहास ९ व्या शतकापासून सुरु होतो. ‘अनल हक’ ही संकल्पना धर्मद्रोही असल्याचा आरोप सत्तेच्या समर्थकांकडून तेंव्हापासून होत आहे.

फैज अहमद फैज यांनी लिहीलेली ‘हम देखेंगे’ ही कविता अनेक दृष्टींनी ऐतिहासिक आहे. विशेषतः त्यातील ‘अनल हक’ या संकल्पनेमागे विवेकवादाचा सत्ता आणि धर्ममुखंडांशी झालेल्या संघर्षाचा इतिहास आहे. ‘अनल हक’ ही संकल्पना मांडणाऱ्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या काहींना सत्तेकडून मृत्युंदड देण्यात आला. तर अनेकांना प्राणांतीक यातना देऊन छळण्यात आले. फैज यांनी वापरलेल्या ‘अनल हक’ चा इतिहास ९ व्या शतकापासून सुरु होतो. ‘अनल हक’ ही संकल्पना धर्मद्रोही असल्याचा आरोप सत्तेच्या समर्थकांकडून तेंव्हापासून होत आहे.

इस्लामने इश्वराला सर्वश्रेष्ठ सर्जक मानले आहे. इश्वर हे अंतिम सत्य असल्याची श्रध्दा इस्लामचा मुलाधार मानली जाते. अल्लाह समान सर्जनाची क्षमता आणि त्याच्यासारखे अंतिम सत्य जगात काहीच नाही, असे बहुतांश मुसलमान मानतात. अनेक सुफी पंथांनी ‘इश्वरी सत्य आणि सामान्य सत्य’ या संकल्पनेची पुनर्व्याख्या केली आहे. दहाव्या शतकाच्या सुरुवातीस सुफी मन्सूर बीन हल्लाजने स्वतःच्या विचारांना ‘अनल हक’ संबोधले आणि मोठा वाद उभा राहिला. ‘अनल हक’ याचा अर्थ सन्मानित सत्य अथवा मी बोललो ते सत्य आहे, असा होता. त्याच्या टिकाकारांनी ‘अंतिम सत्य’ हे फक्त इश्वरीवाणीतून प्रकटले आहे आणि हल्लाजने त्याच्या विचारांना इश्वरी वाणीच्या समकक्ष ठरवल्याचा दावा केला. हल्लाजच्या राज्यावरील टिकेने त्रासलेल्या अमीरांनीही खलिफांकडे त्याच्या तक्रारी केल्या. मन्सूर बीन हल्लाज धर्मद्रोही असल्याची आवई उठवली. मन्सूरला न्यायालयात खेचण्यात आले. अखेर त्याला फाशीची शिक्षा झाली. न्यायशास्त्री आणि धर्मशास्त्रींशी घातलेला वादही त्याच्या अंगवळणी पडला. राज्याच्या अंमलबजावणीची दिशा सरंजामी असू नये म्हणून त्याने अनेक कविता लिहील्या होत्या. त्या कविता त्याला राजद्रोही ठरवण्यासाठी पुरेशा ठरल्या. म्हणूनच इतिहासकार सुलैमान नद्वी म्हणतात, ‘मन्सूर हा धर्माचा नव्हे तर राज्याचा गुन्हेगार होता. त्याला उलेमांच्या शाईने नव्हे तर राज्याच्या तलवारीने सत्तेच्या अहंकारासाठी बळी दिले.’ नद्वी काहीही म्हणोत, मन्सूरला धर्मद्रोही मानणाऱ्यांचा गट आजही तितकाच प्रबळ आहे. सत्तेच्याविरोधात भूमिका मांडण्याची किंमत मन्सूर बीन हल्लाजने प्राण देऊन चुकवली. आणि त्याच्या भूमिकांना ती आजही चुकवावी लागतेय. त्यातून मन्सूर बीन हल्लाज उलेमांच्या एका गटात निषिध्द विचारांच्या कक्षेत राहिला. तर दुसरा गट ज्यामध्ये शेख अबु बकर शिबली, दाता गंज बक्ष, शेख फरिदुद्दीन अतार, इमाम गजाली, जलालुद्दीन रुमी यांचा समावेश होतो, त्याला इस्लामी तत्वज्ञानाचा सच्चा अन्वयर्थक ठरवतोय.

भारतातही मन्सूरच्या समर्थन आणि विरोधाचे दोन विचारप्रवाह मध्ययुगीन काळापासून आहेत. दिल्लीचे प्रख्यात सुफी हजरत निजामुद्दीन औलीया यांनीही मन्सूरच्या विरोधात फतवा दिला होता. मध्ययुगीन काळात ज्याच्या राज्याच्या अंमलबजावणीच्या भूमिका सर्वाधिक वादग्रस्त ठरल्या त्या औरंगजेबाच्या काळातही ‘अनल हक’ चा वाद पुन्हा उभा राहिला. सुफी सरमदला औरंगजेबने मृत्यूदंड दिला. त्याने ‘अनल हक’ या संकल्पनेचे समर्थन केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. हा सुफी सरमद दारा शुकोहचा अतिशय घनिष्ठ मित्र होता. त्याने इस्लामी सत्याच्या संकल्पनेवर रुबायांमध्ये चर्चा केली आहे. (रुबाई - रेख्तामधील काव्य प्रकार) सरमद हा आत्मविकासाच्या संकल्पनेवर आधारीत सुफी साधनेची मांडणी करत होता. त्याने सत्याच्या शोधासाठी अनेक प्रयत्न केले होते. शरीरावरील वस्त्रांचाही त्याग केला होता. काही काळ साध्या लंगोटशिवाय तो कसलेच वस्त्र घालत नसे. ज्यावेळी तो दिल्लीला आला त्यावेळी दारा शुकोह त्याच्या भेटीसाठी गेला. या नंग्या फकिराच्या मागे दारा सारखा राजपुत्र फिरायचा. दिल्लीचे राजकारण बदलले आणि ‘अनल हक’ ची पाठराखण करणारा हा सुफी सरमद आणि दारा दोघांनाही औरंगजेबाने मृत्युदंड दिला. या सरमदविषयी भारतात अनेक वाद आहेत. मुसलमानांमध्ये सरमदला यहुदी, काफीर म्हणणारा एक गट आजही त्याची निंदा करण्यात धन्यता मानतो. दुसऱ्या गटाकडून त्याला ‘सरमद शहीद’ म्हणून संबोधले जाते.

‘अनल हक’ विषयी काही चर्चा मध्ययुगीन काळात औरंगजेबाच्यानंतरही झाली. शाह वलीउल्लाह यांच्या काळातही या चर्चेला तोंड फुटले. पण राजकारणाच्या दिशा बदलल्या होत्या. सत्ता ‘अनल हक’ची दखल घेण्याइतकी संवेदशनशील नव्हती. त्यामुळे वाद टळला, असे म्हणता येईल. भारतात सातत्याने मन्सूरच्या विचारांची चर्चा ही मोठे आव्हान ठरली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘अनल् हक’ आणि मन्सुरने पुन्हा उर्दू साहित्याच्या मुख्य प्रवाहाला व्यापून टाकले. यावेळी कारण ठरले, उर्दूचे महाकवी इकबाल. भारतात इस्लामी ज्ञानविश्वातील ‘अनल हक’ची कोंडी फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. २० व्या शतकात डॉ. इकबाल यांनी मन्सूर बीन हल्लाजचे समर्थन केले. इकबाल यांनी त्यांच्या जावेदनामा या महाकाव्यात ‘अनलहक’ च्या संकल्पनेवर कविता लिहीली. तेंव्हाही मोठे वादळ उठले. पण इकबाल त्या वादाला पुरुन उरले.

‘जावेदनामा’ हे इकबाल यांनी लिहीलेले काव्यनाटक (Poetic Drama) आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्या मेहराजच्या (पवित्र रात्रीतील स्वर्गसफर किंवा अल्लाहची भेट) धरतीवर इकबाल यांनी ही कल्पना उभी केली आहे. इकबाल यांच्या काव्यनाटकातील ‘जिंदारुद’ हा संवादक महान इतिहासपुरुषांच्या आत्म्यांना भेटण्यासाठी स्वर्गाकडे निघाला आहे. तो स्वर्गात पोहोचल्यानंतर त्याची हल्लाजशी गालीब आणि कुर्रतुलऐन ताहीरा या महान कलाकारांच्या आत्म्यासमवेत भेट होते. इश्वराने या तिघांच्या आत्म्यांना स्वर्गात स्थान दिले आहे, पण हे तिघे सत्याच्या शोधात स्वर्गाबाहेर पडले आहेत. सत्याच्या शोधासाठी नरकयातना भोगायची त्यांची तयारी आहे, अशी त्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. मन्सूरच्या आत्म्याला भेटल्यानंतर जिंदारुद त्याला काही प्रश्न विचारतो. त्यापैकी हल्लाजला त्याच्या भुमिकेचे समर्थन करुन जिंदारुद म्हणतो, ‘अदूरदर्शी व्यक्तींनी उपद्रव माजवून इश्वराच्या सच्च्या सेवकाला फासावर चढवले. तुझ्यावर अस्तित्वाचे रहस्य प्रकटले होते. मग सांग तुझा गुन्हा काय होता?’ त्यावर मन्सुर बीन हल्लाज म्हणतो, ‘स्वतःच्या सर्जनशक्तीवर विश्वास नसलेल्या मुडद्यांसारख्या जगणाऱ्या माणसांना मी माणसाच्या क्षमतांचा परिचय करुन दिला. आत्मविकासाला नकार देणाऱ्या या पाखंडी लोकांना ते सहन झाले नाही.’ इकबाल यांच्या मन्सूरवरील या कवितांनी त्याच्याविषयीच्या भारतातील चर्चेला एक नवे वळण दिले. मन्सुरचे समर्थन केल्याने इकबाल यांच्यावर टिका झाली. पण इकबाल यांचे टिकाकार काही राज्याच्या सत्तेतील अमीर, उमराव नव्हते. त्यामुळेच कदाचित त्यांना तितका त्रास झाला नाही. पण इकबाल यांच्याविरोधातला राग मात्र सातत्याने प्रकट होत राहिला.

इकबाल यांच्यानतंर फैज यांनी ‘अनल हक’ चे महत्व सिध्द करुन दाखवले. जानेवारी १९७९ मध्ये फैज अहमद फैज यांनी ‘मेरे दिल मेरे मुसाफीर’ या पुस्तकात ‘अनल् हक’ ही संकल्पना वापरुन ‘व यबका व जहू रब्बूका’ ही अजरामर कविता लिहीली. ज्यावेळेस ही कविता प्रकाशित झाली, तेंव्हा जनरल जिया उल हक यांनी पाकिस्तानात मार्शल लॉ ची घोषणा केली होती. तीन महिन्यांनी झुल्फीकार अली भुट्टोंना फाशी दिली जाणार होती. या पार्श्वभूमीवर फैज यांनी या कवितेतून जियाउल हक यांच्या सत्तेवर टिका केली. जालीम सत्तेच्याविरोधात गरीबांच्या समर्थनात सत्य पुन्हा उभारी घेईल, ‘उठेगा अनल हक का नारा’ असे त्यांनी म्हटले. त्यातील ‘अनल् हक’ मी देखील आहे आणि तुम्ही देखील आहात, या विधानावर धार्मिक विद्वांनाकडून आक्षेप घेतला गेला. पण फैज यांच्या शायरीच्या विरोधात ते उभे राहिले नाहीत. कारण उलेमांच्या एका गटाने त्याचा योग्य अन्वयार्थ लावून फैज यांची बाजू घेतली. आयुष्यभर फैज यांना विरोध करणारे अनेक उलेमा फैज यांच्या बाजूने उभे राहिले. पण जिया उल हक यांनी त्या पुर्ण कवितेवर बंदी घातली. फैजवर राजद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला. इकबाल बानो यांनी १९८५ मध्ये ही बंदी धुडकावली. त्यांनी लाहोर येथे फैज यांच्या जन्मदिनी ही कविता गाणार असल्याची घोषणा केली. तब्बल ५० हजार लोक ही कविता ऐकण्यासाठी जमा झाले. त्याकाळी पाकिस्तानात महिलांना सलवार कुर्ता घालण्याची ताकीद केली जात होती. पण इकबाल बानो काळी साडी घालून आल्या होत्या. इकबाल बानो कविता गात होत्या, त्यावेळी अल् हिमरा ॲडीटोरीयममधल्या लोकांनी मोठ्या आवेषात ‘अनल् हक’ चे नारे दिले. या विद्रोहातून ‘अनल् हक’ म्हणजे सत्य प्रकटत होते.

फैज यांनी कुरआनच्या ‘सुरह रहमान’ या अध्यायावर ही कविता लिहीली होती. गरीबांचे राज्यातील स्थान, राज्याची संकल्पना, इस्लामी प्रतिकांच्या चर्चेतून लोकशाही राज्याचे समर्थन हे फैज यांच्या कवितेचे वैशिष्ट्य होते. जालीम सत्ता संपुष्टात येईल. अंतिम सत्य पुन्हा प्रकट होईल. असे फैज यांनी म्हटले होते. मन्सूर बीन हल्लाजने मांडलेली ‘सन्मानित सत्याची’ अथवा ‘गवसलेल्या सत्याची’ ही संकल्पना सत्याला सन्मानीत करताना मरणयातना भोगतेय हे मात्र निश्चित आहे. अहंकाराने माखलेली सत्ता ‘अनल हक’ च्याविरोधात उभी राहते हा इतिहास आहे. नागरीकत्व दुरुस्ती कायद्याचे शिर्षगीत म्हणून ‘अनल हक’ ने स्थान मिळवल्यानंतर त्याचा पुन्हा प्रत्यय आला. भाजप आणि त्याच्या समर्थकांनी फैज यांच्या कवितेविरोधात मोठा आकांड-तांडव केला. या कवितेवर आक्षेप घेतला. पण ‘अनल् हक’ थांबली नाही. सत्याला सन्मानीत करण्याची त्याची आस अद्याप अबाधीत आहे. अखेरीस फैज यांच्याप्रमाणे आपणही एकेदिवशी असत्याचे तख्त कोसळून पडेल आणि सत्य सन्मानित होईल, ही अपेक्षा करुयात.

‘‘सब ताज उछाले जाएँगे सब तख़्त गिराए जाएँगे बस नाम रहेगा अल्लाह का जो ग़ायब भी है हाज़िर भी जो मंज़र भी है नाज़िर भी उट्ठेगा अनल-हक़ का नारा जो मैं भी हूँ और तुम भी हो और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा जो मैं भी हूँ और तुम भी हो’’ sarfraj.ars@gmail.com

बातम्या आणखी आहेत...