आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुटुंबाच्या विरोधानंतरचा प्रेमविवाह. पदरात तीन लहान मुलं. पतीच्या शिक्षकी पेशाव्यतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यातच पतीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्याचं निदान... मात्र राधा डगमगली नाही. स्वत:ची हिंमत आणि मित्रपरिवाराच्या मदतीने पतीला किडनीदान केलं. नियतीच्या या परीक्षेत राधा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली. त्याबद्दल सांगताहेत पती श्याम...
मी उस्मानाबादचा रहिवासी. २००० मध्ये घरच्यांचा विरोध पत्करून विवाह केला. २००२ मध्ये हिंगोली जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. आम्हाला अरुणा, अजिंक्य, अनिकेत अशी तीन अपत्ये झाली. औंढा नागनाथ इथं सुखाचा संसार सुरू असताना २००९ मध्ये एका संकटाने चाहूल दिली. म्हणतात ना, ‘सुख-दुख दोनो रहते जिसमें जीवन है वो गाव, कभी धूप कभी छांव.’ या ओळींप्रमाणे या अनामिक संकटाने सगळंच बदलून टाकलं. २००९ मध्ये उस्मानाबादला दिवाळीसाठी आम्ही गेलो होतो. तेव्हा अचानक अंग सुजणे, दम लागणे, उलटी होणे, झोप न येणे असे त्रास सुरू झाले. उस्मानाबादमध्येच डॉक्टरांना दाखवले. विविध प्रकारच्या चाचण्या केल्या. जन्मापासून उच्चरक्तदाब नियंत्रणात नसल्याने दोन्ही मूत्रपिंड ( किडनी) निकामी झाल्याचे निदान त्यांनी केले. त्या क्षणी आम्हा दोघांच्याही पायाखालची जमीन अक्षरश: सरकली.
इथून पुढे खरी माझ्या राधेची सत्त्वपरीक्षा होती. मी शिक्षक असलो तरी देवाने सेट केलेला हा पेपर तिला एकटीलाच सोडवायचा होता. पती मृत्युशय्येवर. पदरात तीन लहान मुलं. तिने सोलापूर गाठले. तिथे रघोजी किडनी सेंटरमध्ये मला दाखल केले. उपचारांसाठी पतीच्या सात वर्षांच्या नोकरीतील जमापुंजी, दागदागिने विकून ती लंकेची पार्वती झाली. त्या वेळी आजच्यासारखी व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशी समाजमाध्यमे नव्हती. जवळच्या काय, अगदी रक्तातल्या सर्वच नातेवाइकांनी राधेला दूर लोटले होते. एकच आधार होता, मित्रपरिवाराचा. संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात आमचा मित्रपरिवाराचा मोठा गोतावळा होता. राधेला त्याच मित्रपरिवाराने खूप मदत केली. पुढच्या उपचारांसाठी मला औरंगाबादला हलवणे आवश्यक होते. मात्र आर्थिक आव्हान मोठे होते. शेवटी राधेने निर्णय घेऊन उस्मानाबाद इथलं राहतं घर विकून कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये मला दाखल केलं. तिथे किडनीविकारतज्ज्ञ डॉ. सुहास बावीकर यांनी शारीरिकच नव्हे, तर मानसिक, भावनिक आधार दिला. उमेद दिली. डायलिसिस हा शब्द किडनी रुग्णांसाठी घाबरवणारा असतो. राधेने हॉस्पिटलजलळ दोन खोल्या भाड्याने घेऊन मला आजारातून बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू केली. दर दोन दिवसांनी असणाऱ्या माझ्या डायलिसिससाठी बीड बायपास ते समतानगर असा प्रवास सात महिन्यांच्या तान्हुल्याला घेऊन करू लागली. दर रविवारी माझे मित्र हिंगोली इथून शिक्षकांनी जमा केलेली देणगी घेऊन येत. राधेला धीर देत.
किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया तर फारच किचकट. विविध चाचण्या, प्रमाणपत्रे, संबंधितांची मंजुरी इत्यादींसाठी लागणारा वेळ अशा अनेक अडचणींना राधा सामोरी गेली. सतत सहा महिने एकीकडे माझे डायलिसिस आणि दुसरीकडे किडनी प्रत्यारोपणाची तयारी तिने केली. या सर्व धावपळीत जवळचा एकही नातेवाईक आमच्याकडे फिरकला नाही. तिच्यासोबत होते ते फक्त आणि फक्त आमचे मित्र. माझ्या किडनी आजाराचे निदान ते किडनी प्रत्यारोपण या सगळ्या प्रवासात आमच्या जिवाभावाच्या दोस्तांनी राधेची खूप मदत केली. सख्ख्या भावाप्रमाणे तिच्या पाठीशी उभे राहिले. राधेने मला किडनी दिली तेव्हा तिचे वय होते अवघे २८ वर्षांचे. त्या वर्ष-दीड वर्षाच्या काळात राधेने मला वाचवण्यासाठी जे जे केले त्याबद्दल मी या जन्मीच काय, पण पुढचे सात जन्म राधेचा ऋणी राहीन...
श्याम जाधव संपर्क : ९४२३७६०४९३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.