आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक:स्वमग्नता आणि ‘स्मार्ट’ सिटी

अदिती शार्दूल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वमग्न मुलं समाजाच्या दृष्टिकोनामुळे अधिक कम्फर्टेबल फील करतात. म्हणूनच शहरामध्ये अशा मुलांसाठी पूरक, सर्वसमावेशक व्यवस्था तयार करण्याला प्राधान्य द्यायला हवं. नुकतंच २ एप्रिलला झालेल्या ऑटिझम डे निमित्त स्वमग्न मुलांसाठीच्या पूरक व्यवस्थांवर भाष्य करणारा लेख.

स्व मग्नता अर्थात ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषधोपचार करता येत नाही. म्हणूनच गरज आहे ती अशा मुलांना समजून घेण्याची. त्यांच्यातल्या कलागुणांना पारखून ते विकसित करण्याची. प्रत्येक स्वमग्न मूल म्हणजे एक शाळाच आहे. स्वमग्नतेचे अर्थात ऑटिझमचे विशिष्ट असे कारण सांगता येणार नाही. त्यामुळेच तो आजार नाही, जो औषधांनी बरा होऊ शकेल. मुख्य म्हणजे स्वमग्नतेची लक्षणे जरी बाळ लहान असताना दिसून येत असली तरी वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत ते ठळकपणे जाणवू लागतात. मुलांमध्ये ऑटिझमचे निदान झाल्यानंतर पालकांनी खचून न जाता, परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे फार गरजेचे आहे व काही काळजी घेण्याची

गरज आहे. ऑटिस्टिक मुलांचा एकलकोंडेपणा दूर करण्यासाठी त्यांना इतर मुलांमध्ये खेळायला शिकवा. इतर मुलांमध्ये मिसळायला शिकवा. ऑटिस्टिक मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी, औषधांपेक्षा विविध थेरपीच अधिक प्रभावशाली ठरतात. अॅप्लाइड बिहेवियरल अ‍ॅनालिसिस (Applied Behavioural Analysis (ABA) व रिलेशनशिप डेव्हलपमेंट इंटरव्हेन्शन (Relationship Development Intervention (RDI) या दोन अत्यंत प्रभावी थेरपींचं प्रशिक्षण जर पालकांनी घेतलं तर उत्तम प्रकारे मुलांवर त्या थेरपींचा प्रत्यक्ष प्रयोग करू शकतील व उत्तम परिणाम दिसून येतील. या थेरपींशिवाय Aqua therapy हाही एक उत्तम उपाय आहे, स्वमग्न मुलांना शांत करण्यासाठी व त्यांना झोप चांगली लागण्यासाठी. कारण ह्या मुलांना पुष्कळदा झोप नीट लागत नाही. ह्या थेरपीमध्ये पाण्यात व्यायाम करून घेतात. त्यासाठी वेगळी आणि विशेष साधनं असतात. त्यामुळे जी चंचलता sensory overdose मुळे होते ती कमी करण्यास मदत होते.

समाजाने घडवावेत पूरक बदल : जर सर्वसमावेशक समाज घडवायचा असेल तर स्वमग्न मुलांसाठी काही खास गोष्टी समाजाने स्वीकारणे गरजेचे आहे. या मुलांना पूरक असे बदल समाजात, व्यवस्थेत करावे लागतील; जेणेकरून अशा मुलांना सार्वजनिक ठिकाणी वावरणे सोयीचे होऊ शकेल.

वेगळा-शांत पादचारी मार्ग : स्वमग्न मुलांना मोठ्या प्रमाणातील आवाज, लोकांची वर्दळ असलेली ठिकाणं आवडत नाही. त्याचा त्यांना त्रास होतो. त्यामुळे रस्त्याने चालताना जर एखादा शांत पादचारी मार्ग असेल तर त्यावर मूल शांतपणे चालत घरी जाऊ शकेल. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे अशा ठिकाणी शांत पादचारी मार्गाची तरतूद करायला हवी.

सायलेंट झोन : ऑटिझमग्रस्त मुलांना खूप माणसं असणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी जाणे आवडत नाही. तिथे या मुलांना अवघडल्यासारखे वाटते. आणि त्यामुळेच अशी मुले मॉल किंवा दुकानांच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. अशा ठिकाणच्या मॉल, दुकानांमध्ये जर सायलेंट झोन ठेवता आला तर मुले तिकडे जाऊन खरेदी करू शकतील. त्या परिसरात वावरू शकतील.

कम्युनिकेशन बोर्डाची सोय : कम्युनिकेशन बोर्ड अर्थात असा बोर्ड ज्यावर संबंधित ठिकाणाचे चित्र छापलेले असते. असे फलक शहरात ठिकठिकाणी असतील तर मुले स्वत: सगळीकडे स्वतंत्रपणे फिरू शकतील आणि त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होऊ शकेल. स्वमग्न मुलं visuals बघून गोष्ट समजून घेतात. त्यामुळे जर बस, रेल्वेमध्ये त्यांना कुठे जात आहोत ह्याचा रस्ता दिसला तर उत्तम प्रकारे ते जाऊ शकतील. शिवाय एखाद्या दुकानात जर खरेदीला ही मुले गेली तर तिथे असलेल्या विक्रीसाठीच्या गोष्टीचे चित्र असेल तर हे मूल त्यावर बोट ठेवून किंवा आय पॉइंटिंग करून दाखवू शकतील की त्यांना काय खरेदी करायचे आहे. स्वमग्न मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज म्हणून सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेेचे आहे. अशा मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सहानुभूतीच्या नव्हे तर सहकार्याच्या नजरेने बघा. अशा मुलांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करा. त्यांना तुमच्या जीवनात सहभागी करून घ्या. संपर्क : ७७९८८७३३६५

बातम्या आणखी आहेत...