आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला? स्विगी ईटचा जमाना आहे. पण, हैदराबादमधील एका गृहस्थाने चमत्कारच केला. त्यांनी एका वर्षात ८४२८ प्लेट इडली ऑर्डर करून विक्रम केला. होय, त्यांनी फक्त इडलीवर सहा लाख रुपये खर्च केले. नवीन कार विकत घेता येईल तितक्या पैशाच्या इडल्या त्याने पचवल्या. मला वाटले, सहा लाख खर्च करायचेच होते तर एक उच्च दर्जाचा स्वयंपाकी ठेवला असता, त्याने रात्रंदिवस गरमागरम इडल्या आणि सांबार बनवले असते. पण, कदाचित त्यांना तो त्रास नको असेल. बाजारातून रेशन आणा, गॅस संपला, बुक करा. नाही नाही, इतक्या क्षुल्लक कामासाठी काही आम्ही जन्म नाही घेतला! हसण्यावारी नेऊ नका, असे अनेक नमुने आहेत. खरे सांगायचे तर मीसुद्धा शिक्षणात इतकी मग्न होते की स्वयंपाकघरातील कामे शिकले नाही. लग्नानंतर हरभरा व तूर डाळीतील फरक कळत नव्हता. आईला फोन करून विचारत असे, प्रेशर कुकरच्या किती शिट्या द्यायच्या? असो, देवाने कृपा केली. देवदूताच्या रूपात एक मुलगी आली, तिने मला या जबाबदाऱ्यांमधून मुक्त केले. गेली वीस वर्षे ती माझ्या घराची काळजी घेत आहे, आज ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. पण, भावी पिढीला असा आनंद क्वचितच मिळेल. प्रत्येक गल्ली व गावातील प्रत्येक मूल शाळेत जात आहे. मजुराचा मुलगा व मोलकरणीच्या मुलीला भिन्न वाटेवरून चालायचे असते. हे चांगले आहे, पण त्याचा तुमच्या जीवनावर नक्कीच परिणाम होईल. भांडी, झाड-पूस इ.साठी माणसांचा नव्हे, यंत्रांचा वापर करावा लागेल. सध्या चॅटजीपीटीचा बोलबाला आहे - आदेश द्या आणि ते काम त्वरित करेल. असाच गुलाम आपल्याला घरीही हवा आहे. कारण यंत्रे आहेत, पण त्यातही आपली मेहनत लावावी लागते. कपडे घाला, बटण दाबा, नंतर धुतलेले कपडे वाळवा. आम्हाला वॉशजीपीटी, कुकजीपीटी, क्लीनजीपीटी हवे आहे. कदाचित तांत्रिक प्रतिभेद्वारे हेही शोधले जाईल, पण मला शंका आहे की, कदाचित संगणक आपल्याकडून मेंदूची सर्व कामे काढून घेईल. घरची कामेही सांभाळेल. मग माणूस काय करेल? तीन आठवडे काम केल्यावर आठवड्याची सुटी गोड वाटते. सूर्यप्रकाश नसेल तर सावलीचे महत्त्व काय राहील? मला वाटते, आपण काम तर करत राहू, फक्त त्याचे स्वरूप बदलेल. पण, जग खूप वेगाने बदलत आहे. शाळा-महाविद्यालयांत शिकवले जाणारे निरर्थक होईल. वेळेनुसार वारंवार आपले ज्ञान, व्यक्तिमत्त्व विकसित करावे लागेल. आणि बाहेरील सर्व काही बदलत असताना आपल्या आंतरिक तत्त्वांमध्ये स्थिरता मिळेल. पहिले तत्त्व म्हणजे काम ही एक साधना आहे. त्याला घाबरू नका, ते टाळू नका. एका कॉलेजमध्ये मी पाहिलं की डायनिंग हॉलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपले ताट स्वतः धुवायचे, असा नियम आहे. काही मुलांना राग आला, पण प्रिन्सिपाॅल म्हणाले, गांधीजींच्या आश्रमातही ही प्रथा होती. त्यामुळे त्यांचे पालकही गप्प झाले. दुसरे तत्त्व म्हणजे अगदी छोटंसं कामही मनापासून करावं लागेल. अमेरिकेतील एका प्रसिद्ध लष्करी अधिकाऱ्याने ‘मेक युवर ओन बेड’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे सार असे की, प्रशिक्षणादरम्यान प्रत्येक कॅडेटला सर्वप्रथम त्याचा बेड व्यवस्थित करावा लागत असे. त्याची तपासणी व्हायची. एकही सुरकुती दिसली तर शिक्षा होत असे. आता युद्धभूमीचा अंथरूण नीट करण्याशी काय संबंध? मुद्दा असा आहे की, कॅरेक्टर कसे बनते? तुम्ही जसे आहात तसे आहात. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ते प्रतिबिंबित होईल. त्याला ऑन-ऑफ बटण थोडेच असते? त्यामुळे प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने, योग्य वेळी करणे हे तुमचे तत्त्व असेल तर ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनते. आपण नेहमी मुलांना चांगल्या सवयी, चांगले गुण शिकवतो. नुसते बोलल्याने फायदा होत नाही. ते पालकांचे निरीक्षण करतात. तुम्ही आळशी असाल तर ते हुशार होतील का? तर तिसरे तत्त्व म्हणजे जे गुण तुम्हाला इतरांमध्ये पाहायचे आहेत ते आधी स्वतःत निर्माण करा. एआयची शक्ती वाढत आहे, तेव्हा आपल्याला आपली आत्मशक्ती वाढवावी लागेल. कारण हाच एक गुण आज संगणकात नाही. चॅटजीपीटी तर ठीक आहे, सेल्फजीपीटीकडे लक्ष द्या. एक चांगली व्यक्ती होण्याचा निर्धार करा. (ही लेखिकेची वैयक्तिक मते आहेत.)
रश्मी बन्सल लेखिका आणि वक्त्या mail@rashmibansal.in
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.