आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:जीवन ध्येय निश्चित करा, भरकटावे लागणार नाही

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौकात आलेल्या एका व्यक्तीने आता कोणत्या वाटेने जावे, असा प्रश्न विचारला. प्रत्युत्तरात वाटसरूने एक साधा प्रश्न विचारला, महाशय, तुम्हाला कुठे जायचे आहे? प्रवासी म्हणाला, हे मला माहीत नाही. या वेळी एक हृदयस्पर्शी उत्तर मिळाले, मग कोणत्याही मार्गाने जा, काहीही फरक पडणार नाही.

जगात दोन प्रकारचे लोक दिसतात. एक म्हणजे ज्यांना वेळ, संगत आणि योगायोग त्यांच्या नशिबापर्यंत ओढून आणते. यांचा प्रवाहाबरोबर जाण्याकडे कल असतो; वारा-उतार जिकडे, तिकडे यांचा कल. तेथे कोणतेही चिन्ह नाही म्हणून निश्चित दिशादेखील नाही. जणू एखाद्या होडीचालकाला कोणत्या किनाऱ्यावर जायचे हेच माहीत नाही. काळ आणि प्रवाह जिकडे नेईल त्याच दिशेने जीवनप्रवास पूर्ण करण्याची मानसिकता. दुसरा वर्ग प्रवासाच्या सुरुवातीलाच जीवनप्रवासाच्या ध्येयाच्या आराखड्यासह गंतव्यस्थान आधीच निश्चित करणाऱ्या लोकांचा असतो. ते ठरवलेले ध्येय गाठण्याच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना तोंड देत मुक्कामाला पोहोचतात. अर्थात शून्यातून विश्व निर्मितीचा मार्ग तयार करणाऱ्या लोकांना या वर्गात स्थान मिळते.

एका जाहीर सभेत नेत्याच्या प्रभावी भाषणानंतर तिथे उपस्थित एका श्रोत्याने प्रश्न विचारला, ‘तुम्ही खरोखर महान आहात. मला हे जाणून घ्यायचे आहे की, आमच्यासारख्या सामान्य व्यक्ती आणि तुमच्यासारख्या महान व्यक्तीमध्ये काय फरक आहे?’ नेत्याने फार छान उत्तर दिले, ‘बंधू, आम्हीही तुमच्यासरखेच सामान्य आहोत. माझ्यात आणि तुमच्यात तसा काही दृश्यमान फरक नाही, पण हो, आम्हाला आणि तुम्हाला वेगळे करणारा एक पैलू आहे. ते म्हणजे सर्वोच्च आणि उदात्त ध्येय. मार्गात कितीही अडचणी आणि आव्हाने आली तरी आम्ही मार्ग सोडत नाही. ध्येयाच्या महानतेचा एक भाग आमच्या आत खोलवर जातो - कदाचित त्याच्या तेजामुळेच आमच्यासारख्यांमध्ये महानता दिसत असावी.

कल्पना करा की, तुमच्या मृत्यूनंतर एक श्रद्धांजली सभा होत आहे. तुम्हीदेखील तेथे दिव्य शरीराने उपस्थित आहात. नातेवाईक-कुटुंब-हितचिंतक, मित्र आणि सहकारी, कुटुंबीय तुमच्याबद्दल कोणत्या गोष्टी बोलतील? तुम्हाला तुमच्या आवडी-निवडी - सामर्थ्य आणि संपत्तीबद्दल बोललेले आवडेल की तुमची वचनबद्धता, मानवता, नम्रता आणि सेवा-समर्पण यांसारख्या मूल्यांचा उल्लेख केलेला आवडेल? ज्यात जीवनाचा अर्थ अधिक सापडतो ते जीवन ध्येय म्हणून निवडावे, हे सांगण्याचे तात्पर्य.

१३ ऑगस्ट २०१६ रोजी प्रमुख स्वामी महाराज अक्षरवासी झाले. त्यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी २१ लाख लोक आले होते, तेही गुजरातमधील सारंगपूरसारख्या (आता बोटाद जिल्ह्यात) दुर्गम छोट्या गावात. प्रमुख स्वामी महाराजांचे संपूर्ण जीवन एका महान ध्येयासाठी समर्पित होते - इतरांना आनंदी करण्यासह त्यांच्या उत्कर्षाचे चिरंतन ध्येय. त्यांच्या जीवनाचा मंत्र होता, ‘इतरांच्या सुखात आपले सुख आहे.’ त्यांचे अखंड प्रेम, प्रेरणा, आपुलकी, आश्वासन-मदतीच्या अखंड प्रवाहाने तृप्त लाखो लोकांना या तृप्ती-समाधानाच्या शक्तीनेच त्यांना शेवटच्या दर्शनाला खेचून आणले.

ध्येय न ठरवता आयुष्यभर धावत राहिल्यास शेवटी पश्चात्तापाने मनात प्रश्न निर्माण होईल की, एका अद्भुत आयुष्याचे मी हे काय केले? सार्थकता आणि निरर्थकता यातून निवडण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. चांगली आणि अर्थपूर्ण निवड करत राहा.

डॉ. ज्ञानवत्सल स्वामी प्रेरक वक्ते

बातम्या आणखी आहेत...