आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीला किडनी विकाराचे निदान झाले. पदरात चार लहान मुलं. नातेवाइकांचा आधार नाही. तरी जेमतेम दहावी शिकलेल्या, बाहेरच्या दुनियेची फारशी माहिती नसलेल्या शबानाने पतीला जणू पुनर्जन्म मिळवून दिला... इतरांच्या घरासाठी रंग पुरवण्याचा माझा व्यवसाय, पण शबानाने त्याग-समर्पणाचे रंग भरत मला आयुष्य दिलं, सांगताहेत मतीन पटेल...
मी २७ जानेवारी २०१८ ला सकाळी साडेनऊ वाजता मी दुकानात गेलो. घराला रंग देण्याच्या रंगांचे माझे दुकान आहे. नेहमीप्रमाणे साफसफाई केल्यानंतर पेपर वाचत बसलो. काही क्षणांतच मला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर मी बेशुद्ध पडलो. जाग आली तेव्हा एमजीएम रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये होतो. शेजारच्या दुकानदारांनी मला अॅडमिट केले होते. इथून माझे विश्वच बदलून गेले. पत्नी शबाना हिने माझा पुनर्जन्म खेचून आणला.
तीन दिवस मी एमजीएमच्या आयसीयूमध्ये अॅडमिट होतो. मला पॅरालासिसचा झटका आला होता. उपचार झाल्यानंतर पूर्ण बॉडी स्कॅनिंग करून विविध चाचण्या डॉक्टरांनी केल्या. त्यात माझ्या किडनीचा आकार लहान झाल्याचेे स्पष्ट झाले. यानंतर किडनीच्या उपचारांची धावपळ सुरू करावी लागणार होती. एमजीएममधून सुटी घेतल्यावर तीन दिवसांनी आम्ही धूत रुग्णालयात डॉ. शेखर शिराढोणकर यांना दाखवले. त्यांनीही किडनीचा आकार लहान झालाय, किडनी प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगितले.
‘थर्ड ओपिनियन घ्यावे’ म्हणून आम्ही कमलनयन बजाज रुग्णालयात डॉ. सुहास बावीकरांना दाखवले. डायलिसिसच्या साहाय्याने किडनी दोन वर्षे चालू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले. किडनी प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र बसलो. कोण किडनी देणार यावर चर्चा केली. मात्र रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली. अशा वेळी पत्नी शबाना म्हणाली, मी किडनी देईन. कारण, माझ्यासाठी तुम्ही सर्वकाही आहात. तुमच्यामुळेच माझे विश्व आहे. तुम्ही नसाल तर काहीच नाही. शबाना जेमतेम दहावी शिकलेली. बाहेरच्या जगाचा फारसा अनुभव तिला नव्हता. २००७ मध्ये आमचा विवाह झाला होता. चार मुलं पदरात होती. १६ सप्टेंबर २०१९ ला प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली. तेव्हा आमचा सर्वात लहान मुलगा अवघ्या ७ महिन्यांचा होता. हा दीड वर्षांचा काळ आमच्यासाठी, विशेषत: शबानासाठी कसोटीचा होता. सुदैवाने आर्थिक संकट आले नाही. कारण गेली अनेक वर्षे माझा व्यवसाय उत्तम सुरू होता. शबाना जिद्दीने माझ्या पाठीशी उभी राहिली. किडनी दान करण्याचा निर्णय तिने हिमतीने घेतला. त्या वेळी तिचे वय २७ वर्षे होते तर माझे ३२ वर्षे. संकट आमच्यासाठी हिमालयाएवढे मोठे होते. पण, शबानाने कमी वयातही या संकटावर मात करण्याचे धैर्य दाखवले. तिच्यामुळे मलाही बळ मिळाले. आज आमचा परिवार सुखी आहे याचे श्रेय शबानाला आहे. रक्ताच्या नात्याने जेव्हा माझ्यासाठी किडनी देण्यास टाळाटाळ केली, तेव्हा ती उभी राहिली. वास्तविक किडनी निकामी होणे ते प्रत्यारोपण असा प्रवास प्रचंड वेदनादायी आणि भावनांचा कल्लोळ असलेला होता. पण, शबाना डगमगली नाही.
शबाना आणि माझे नाते कायम सहज सुंदर राहिले आहे. तिने मला जीवनदान देऊन केलेले उपकार मी विसरूच शकत नाही. तिच्याबद्दलचा माझ्या मनातील सन्मान या घटनेनंतर अधिकाधिक वाढलाय. पतीला जीवनदान देणाऱ्या अशा सावित्री याच खऱ्या कुटुंबप्रमुख आहेत...{
मतीन पटेल संपर्क : ९७६७९९९८८०
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.