आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:आता तिसरा अंक बाकी...

छत्रपती संभाजीनगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत प्रश्न डोके वर काढत आहेत. ते एकाएकी संपणार नाहीत, उलट आणखी चिघळतील. पवारसाहेबांच्या राजीनाम्याने आणि तो मागे घेण्याच्या निर्णायक घोषणेसाठी बोलावल्या गेलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीने ही शक्यता गडद झाली आहे. आधी अजित पवारांचे नाराजीनाट्य आणि त्यानंतर शरद पवारांच्या राजीनामानाट्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अंक समोर आले आहेत. त्यामुळे प्रतीक्षा आहे ती पुढच्या अंकाची...

पंधरा-वीस दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे हादरे जाणवू लागले होते. त्यापाठोपाठ शरद पवार यांच्या राजीनामानाट्याने पुन्हा काही धक्के दिले. राजकीय वातावरण ढवळून निघाल्यानंतर शुक्रवारी, ‘आपण पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेत आहोत,’ असे पवारांनी जाहीर केले. या दोन्ही बहुचर्चित राजकीय घटनांचे अर्थ विविध पद्धतीने लावले जात आहेत. राजकारण प्रवाही असते आणि त्यामुळेच ते एका जागी थांबून राहत नाही. या दोन राजकीय घटनांच्या केंद्रस्थानी शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला व्यापून राहिलेले व्यक्तिमत्त्व असल्याने स्वाभाविकपणे त्याची चर्चा माध्यमांमधून तुलनेने अधिक झाली. राजकारणी लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने विचार करूनच निर्णय घेत असतात; पण मुख्य मुद्दा असतो, तो आपला निर्णय किंवा भूमिका आपल्या समर्थकांना, अनुयायांना आणि सर्वसामान्य लोकांनाही पटवून देण्याचा.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील बहुतांश राजकीय विश्लेषक या राजीनामानाट्याला ‘पवारांचा गुगली’, ‘पवारांचा मास्टरस्ट्रोक’ वगैरे म्हणत आहेत. पण, माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत. ग्लास अर्धा भरलेला की रिकामा, या कूटप्रश्नाच्या धर्तीवर, हा पवारांचा मास्टरस्ट्रोक आहे की अगतिकता? असा विचार माझ्या मनात येतो आहे. पवारांचा गुगली की अजित पवारांच्या वेगवान यॉर्करवर दांडी वाचवण्यासाठी पवारसाहेबांनी केलेली ही धडपड आहे, असाही प्रश्न उभा राहतो आहे. ग्लास अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामाही आहे, या प्रतीकाच्या पुष्टीसाठी मला थोडे इतिहासात डोकवावे वाटतेय...

राजीव गांधी यांच्या हत्येपश्चात १९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर नरसिंह राव २० जून १९९१ ला देशाचे पंतप्रधान झाले. त्या निवडणूक निकालानंतर शरद पवारांनी राव यांना आव्हान देत पंतप्रधानपदावर दावा सांगितला होता. पण, त्यांनी ऐनवेळी कच खाल्ली आणि संरक्षणमंत्रिपद स्वीकारलं होतं. पवारांनी कच खाल्ली, असं म्हणण्यापेक्षा नरसिंह राव हे पवारांच्या काही पटींनी जास्ती मुत्सद्दी राजकारणी होते, हेही त्यामागचे एक कारण आहे. रावांनी ही गोष्ट १९९१ ते १९९६ या पाच वर्षांत वेळोवेळी सिद्ध केली आणि अल्पमतातील सरकार असूनही ते वाचवले अन् चालवले. शरद पवार हे आजमितीला राज्यातीलच नव्हे, तर देशातील दीर्घकाळ लोकप्रतिनिधी राहिलेले नेते आहेत. प्रदीर्घ राजकीय अनुभव त्यांच्या गाठीशी आहेच, पण सार्वजनिक जीवनात, क्रीडा क्षेत्रातही त्यांनी अनेक निवडणुका बघितल्या आहेत. डावपेच स्वतः खेळले आहेत, आखले आहेत, पडद्यामागे राहून अनेक डावांची सूत्रे त्यांनी हातात ठेवली आहेत. मग, आज असं काय घडलं की, त्यांना स्वतःच्याच पक्षावरची पकड सिद्ध करण्यासाठी राजीनाम्याचे पाऊल उचलावे लागले? तेही आपल्याच पुतण्याला नामोहरम करण्यासाठी?

इथे एक रंजक योगायोग आहे. तीस-बत्तीस वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हणवल्या गेलेल्या नरसिंह रावांना आव्हान देणारे पवार आज स्वतःच्याच पक्षामध्ये ‘शेवटचा शब्द माझाच असतो’, हे सिद्ध करू बघत आहेत. हा प्रवास खचितच ऊर्ध्वगामी म्हणता येणार नाही. त्या वेळी, म्हणजे १९९१ ला पवारसाहेबांचे वय होते ५०-५१, तर नरसिंह राव ७० वर्षांचे होते. आज पवारसाहेब ८३ वर्षांचे, तर अजित पवार त्रेसष्ट-चौसष्ट वर्षांचे आहेत. म्हणजे राव हे पवारांपेक्षा साधारण १९ वर्षांनी मोठे होते, तर अजित पवार हे पवारसाहेबांपेक्षा साधारण साडेअठरा वर्षांनी लहान आहेत. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी. रावांसमोर पवार जिंकू शकले नाहीत, पण अजित पवारांशी जिंकले, असे त्यांच्या समर्थकांना किंवा पवारांना एका विशिष्ट स्थानावर ठेवून बघणाऱ्या विश्लेषकांनाही वाटते आहे. असे असले, तरी पवार हे राजीनामानाट्य जिंकूनही हरले आहेत. कारण एकेकाळी पंतप्रधानपदावर दावा सांगणाऱ्या या लढवय्या नेत्याला पुतण्याची नाही, तर माझीच पकड पक्षावर आहे, हे सांगण्यासाठी रणांगणात उतरावे लागले. बदललेली राजकीय परिस्थिती स्पष्ट करण्यास हे पुरेसे आहे.

शरद पवार हे धूर्त, मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जे बोलतात, ते करत नाहीत, हा लौकिकही त्यांनी गेल्या सहा दशकांच्या राजकीय जीवनात कमावला आहे. त्यामुळे २ मे रोजी पवारांनी राजीनामा देण्याची भाषा केली, तेव्हाच ते नुसती हूल देत आहेत, असं काही लोक सांगत होते. अगदी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही, पवारसाहेब राजीनामा मागे घेतील, हे भाकीत केलं होतं आणि ते प्रसिद्धही झालं होतं. त्यामुळे हे सारे आधीच व्यवस्थित तालीम केलेले नाटक होते का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींना पर्याय म्हणून आपले नाव पुढे आले, तर आधीच पाय खेचण्याचा कार्यक्रम केला जातो, हे नवी दिल्लीतल्या अनुभवातून पवारसाहेबांना पुरते कळून चुकले आहे. त्यामुळे आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे सांगून जणू काही मार्गदर्शकाच्या भूमिकेत जायचे आणि लोकसभेच्या निकालानंतर परिस्थिती बघून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून इतरांनी सुचवलेला पर्याय म्हणून पडद्यावर यायचे, याची तयारीही या राजीनामानाट्यातून केली गेली असावी, अशीही एक शक्यता आहे. ठाकरे आणि मुंडे घराण्यात झाले, तेच आपल्याही घरात होईल का? सुप्रिया सुळेंकडे सूत्रे सोपवण्याचा विचार अमलात आणल्यास अजित पवार नेमका कसा आणि किती प्रमाणात विरोध करतील? पक्षातील इतरांनाही हे रुचेल का? या आणि अशा शक्यतांचा अंदाज घेण्यासाठीच पवारसाहेबांनी राजीनामानाट्याचे कथानक उभारले का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि योग्य वेळ येईपर्यंत ते तसेच राहतील. कारण हे प्रश्न शरद पवारांबद्दल आहेत.

अलीकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत प्रश्न डोके वर काढत आहेत. ते एकाएकी संपणार नाहीत, उलट आणखी चिघळतील. पवारसाहेबांच्या राजीनाम्याने आणि तो मागे घेण्याच्या निर्णायक घोषणेसाठी बोलावल्या गेलेल्या पत्रकार परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीने ही शक्यता गडद झाली आहे. त्यातून पुढे आणखी काही, कदाचित बरेच काही घडू शकते. आधी अजित पवारांचे नाराजीनाट्य आणि त्यानंतर शरद पवारांच्या राजीनामानाट्यातून महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन अंक समोर आले आहेत. तिसरा अंक अजून बाकी आहे...

शैलेंद्र परांजपे
संपर्क : ९९७५७९२४६४
shailendra.paranjpe @gmail.com