आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक-प्रशासन:साहेबांचा शिपाई... शिपायांचा साहेब!

शेखर गायकवाड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही साहेबांकडे एक साहेबी मनोवृत्तीचा शिपाई असतो. त्यामुळं अनेक वेळा कनिष्ठ कर्मचारी, अधिकारी आणि खुद्द साहेबांनाच मनस्ताप सहन करावा लागतो. पण, नशीब चांगलं असल्याशिवाय त्यातून कुणाचीही सुटका होत नाही. साहेबांचे शिपाई हे इतर शिपायांचे साहेब असतात! त्यांना साहेबांनी काहीही वस्तू आणायला सांगितली की, ते बाहेर जाऊन दुसऱ्या शिपायाला किंवा कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्याला फोन करून, अमुक काम साहेबांनी तुम्हाला करायला सांगितलंय, असं बिनदिक्कत सांगतात.

शासकीय नोकरीतील कोणतीही ठोस जबाबदारी नसलेला सर्वात पॉवरफुल कर्मचारी कोण असेल, तर तो म्हणजे शिपाई. साहेबांची सर्वात ‘आतली’ माहिती असणारा “बाहेरचा” कर्मचारी ही त्याची खरी ओळख! साहेब जास्त कडक असतील, तर त्या मुद्द्यावरून लोकांना घाबरून सोडून त्यांना लोक भेटणार नाहीत, याची दक्षता घेणारा हा माणूस असतो. साहेब फार मवाळ असतील, तर त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारा पण तोच असतो. एखाद्या शिपायाला समज अत्यंत कमी असते. एकच गोष्ट तीन-तीन वेळा सांगावी लागते. अशा शिपायाला एका वेळी दोन-तीन वस्तू दुकानातून आणायला सांगितल्यास एका तरी वस्तूचे नाव तो हमखास विसरतोच. शिवाय, दुकानात जाऊनसुद्धा परत फोन करून, वस्तू नक्की कोणती घ्यायची, अशी उलट विचारणा करतो. एक तर असा शिपाई पूर्ण ऐकून घेत नाही. घाईघाईत काम करण्याच्या नादात तो भलतेच काहीतरी करीत असतो.

एका साहेबांनी शिपायाला ऑफिसातून घरी जाऊन बाईसाहेबांकडून औषधे आणायला सांगितली. तो घरी गेला आणि साहेबांच्या बायकोला, ‘तुम्हाला औषधं घ्यायला साहेबांनी सांगितलं आहे..’ असा निरोप देऊन आला! एकाच वेळी अनेक गोष्टी सांगितल्या, तर असे शिपाई ते लिहून घेत नाहीत आणि धड समजूनही घेत नाहीत. एकदा एका साहेबांनी शिपायाला एकाच वेळी तीन गोष्टी सांगितल्या.. ‘हे बघ.. आता मोठे साहेब येतील. त्यांची गाडी आली की, मला सांग. तोपर्यंत रावसाहेबांकडून ते दोन महत्त्वाच्या फाईल देतील, त्या आण आणि साहेब आल्यावर चहा सांग!’ त्याने आधी चहा सांगितला, मग रावसाहेबांना थेट बोलावून आणलं आणि साहेब आल्यावर त्यांना सांगितलं, ‘जरा थांबा! साहेब चहा पिताहेत!’ अशी ही कोणत्याही साहेबांना अडचणीत आणू शकणारी वल्ली!

आपल्या कार्यालयात चांगले कर्मचारी द्यावेत, अशी मागणी करीत एकदा एक उपजिल्हाधिकारी कलेक्टरना भेटले. ते म्हणाले, ‘सर, माझ्या ऑफिसमध्ये एक लिपिक बहिरा आहे. दुसऱ्याला कमी दिसते. अव्वल कारकुनाला संगणक येत नाही. शिपाई बधिर आहे. मी काम कसं करायचं? मला एक तरी चांगला शिपाई द्या..’ त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बेल दाबून दारावरच्या शिपायाला बोलावले आणि त्याला वरचा पंखा बंद करून लाइट लावायला सांगितले. त्याबरोबर शिपाई चालत त्यांच्या दालनातील इलेक्ट्रिक पॅनलकडं गेला अन् पंखा मोठा केला. त्यानं सांगितल्याच्या नेमकं उलटं केलं होतं. त्यावर कलेक्टर उपजिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, ‘मी असे लोक सांभाळतो, तुम्हाला का अडचण येते?’ कलेक्टरच असे लोक सांभाळतात, हे पाहून उपजिल्हाधिकारी खजील झाले आणि निमूटपणे निघून गेले.

काही साहेबांकडे एक साहेबी मनोवृत्तीचा शिपाई असतो. त्यामुळं अनेक वेळा कनिष्ठ कर्मचारी, अधिकारी आणि खुद्द साहेबांनाच मनस्ताप सहन करावा लागतो. पण, नशीब चांगलं असल्याशिवाय त्यातून कुणाचीही सुटका होत नाही. साहेबांचे शिपाई हे इतर शिपायांचे साहेब असतात! त्यांना साहेबांनी काहीही वस्तू आणायला सांगितली की, ते बाहेर जाऊन दुसऱ्या शिपायाला किंवा कोणत्याही क्षेत्रीय अधिकाऱ्याला फोन करून, अमुक काम साहेबांनी तुम्हाला करायला सांगितलंय, असं बिनदिक्कत सांगतात. बरं, प्रत्येक वेळी कनिष्ठ कर्मचारी मुख्य साहेबांना विचारायच्या भानगडीत पडत नाहीत. आणि त्याचाच फायदा असे शिपाई घेत असतात.

मुंबईमध्ये एका शिपायाला साहेबांनी सफरचंद आणि केळी आणायला सांगितल्यावर चक्क अडीच तास बाहेर घालवून तो शहरातील सर्वात महागडी, इम्पोर्टेड सफरचंद, केळी घेऊन आला आणि वरून साहेबांसाठी बेस्ट क्वालिटीची फळं आणण्यासाठी मी कसा फिरलो, याचं वर्णन केलं. हातगाडीवर चांगली फळं मिळत नाहीत, म्हणून मी स्वत: टॅक्सीने मंडईमध्ये गेलो होतो, असं सांगत फळांच्या किमतीपेक्षा जास्त खर्च टॅक्सीला झाला म्हणून ते पैसे साहेबांकडून घेतले. त्यामुळे साहेबांनाच आपण शिपाई होऊन स्वत: बाजारात का गेलो नाही, असा प्रश्न बरेच दिवस पडत राहिला!

काही शिपाई तर प्रत्येक मिनिटाला साहेबांनाच न्यूनगंड कसा निर्माण होईल, याची जणू खात्रीच करीत असतात. एकदा एक साहेब शिपायाला गाडीत घेऊन बायकोसह देवदर्शनाला गेले. साहेबांनी मंदिराजवळ उतरताना त्याला प्रसाद म्हणून पेढे घ्यायला पैसे दिले. तिथे २०० रुपये किलोपासून पेढे असताना साहेबांसाठी त्याने ८०० रुपये किलोचे पेढे घेतले! वरून साहेबांना त्यानं आत्मविश्वासपूर्वक सांगितलं, “सर, तो दुकानदार फालतू पेढे देत होता. मी सांगितलं त्याला की, साहेब फार मोठ्या पदावर आहेत. शिवाय, कधी नाही ते बाईसाहेबांना पण बरोबर घेऊन आलेत! म्हणून मग एक नंबर धारवाडी पेढे घेतलेत!” मग काय? बायको बरोबर असताना, ‘हे पेढे फार महाग आहेत’, असं सांगायची साहेबांची काय हिंमत होणार? हाच शिपाई दुसऱ्या दिवशी, काल साहेबांना ६०० रुपयांना कसा फाळ लावला, हे इतर शिपायांना रंगवून सांगत होता!

shekharsatbara @gmail.com