आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअाम्हा दोघांनाही मुलीची खूप हौस होती. मात्र आम्हाला मुलगा झाला. मुलीच्या बाबतीतली सगळी हौसमौज मुलाच्या बाबतीत भागवून घेतली. मात्र माझ्या इतर मैत्रिणींना मुली आहेत. त्यांच्या बोलण्यात नेहमी ‘मुलगी म्हणजे मदतीचा हात’ अशा अर्थाचे संवाद कानावर यायचे.
मला मुलगी नसल्यामुळे माझ्याकडे मदतीचा हात नाही ही भावना सुरुवातीला माझ्या मनात होती. मग वाटले, मदतीचा हात म्हणून मुलीकडे का पाहायचं? मुलगासुद्धा मदतीचा हात होऊ शकतोच की? आम्हा दोघांच्याही आया नोकरी करणाऱ्या असल्यामुळे त्यांना पडेल ती मदत करण्यातच आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यातच माझ्या सासरी तिघंही मुलंच असल्यामुळे माझ्या नवऱ्याला कामाची सवय आहेच. घरातील माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये माझे पती मला शक्य ती सर्व मदत करतच असतात. त्या अर्थाने आमच्या दोघांच्याही मनात कामाची विभागणी वगैरे भाग नव्हताच. कारण घरकाम ही कुणा एकाचीच जबाबदारी असं आम्ही दोघंही समजत नाही. त्यामुळे मुलगी नाही म्हणून मदतीचा हात नाही ही नकारात्मकता मी माझ्या मनातून सर्वप्रथम काढून टाकली आणि वेदांगच्या व्रतबंधानंतर मी त्याला घरातल्या माझ्या दैनंदिन कामात सामील करू लागले. भाज्या स्वच्छ करणे, फर्निचरची साफसफाई करणे, रात्रीचे जेवण/नाश्त्यासाठी ताटवाटी घेणे, जेवणानंतर टेबल साफ करणे, वॉशिंग मशीनचे वेळापत्रक सेट करणे अशी कामे मी त्याला शिकवली. घरातली ही कामे कायम त्यानेच करायची हेही त्याला स्पष्ट सांगितले.
हळूहळू मी त्याला किराणा सामान, भाजीपाला आणायला घेऊन जाऊ लागले. तुला जी भाजी चांगली वाटेल ती तू घे, असे त्याला सांगून ठेवलेय. भाजी साफ करताना होणारा त्रास त्याच्या ओळखीचा झाल्यामुळे तो भाज्या चांगल्याच खरेदी करतो. वेदांगला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला सांगितले की, तुला जो पदार्थ आवडतो तो पदार्थ आधी करायला शीक. म्हणजे तो पदार्थ खाण्यासाठी तुला माझ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. पण तो पदार्थ करताना स्टार्ट टु एंड सगळं काही तूच करायचं. वेदांगलाही हे पटलं. लॉकडाऊनच्या काळात वेदांगला कणीक भिजवणे, पोळ्या लाटणे, भाजी फोडणीला टाकणे, वरणभाताचा कुकर लावणे, भांडी घासणे, स्वयंपाकाचा ओटा साफ करणे शिकवले. आता तर तो आरतीसाठी वाती करायला शिकलाय. आता तो १४ वर्षांचा आहे. अपार्टमेंटमध्ये तो रोज संध्याकाळी खेळायला जातो. मात्र खेळून घरी येण्यापूर्वी फोनवरून दुकानातून काही आणायचे आहे का, याची तो घरी चौकशी करतो आणि नंतर घरी येतो. आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरातलं वाणसामान किती शिल्लक आहे, काय संपायला आलंय हेसुद्धा बघण्याची सवय मी त्याला लावलीय.
मी एक करिअरिस्ट वर्कहोलिक आई आणि पत्नी आहे. मला माझ्या मुलाला-पतीला वेळ देत नाही याचा गिल्ट असतो. पण मग आम्ही कुटुंब म्हणून एकत्र राहण्याचा मार्ग शोधलाय. शक्य असेल तिथे आम्ही घरातली कामं मिळून करतो, जेणेकरून आमची एकमेकांना मदत होईल आणि आम्ही एकमेकांसोबत वेळही घालवू शकू. मुलांनाही आर्थिक, वैचारिक, व्यावहारिक स्वावलंबनाचे धडे कुटुंबातून दिले जायला हवे, असं माझं स्पष्ट मत आहे. ती भविष्यकाळाची गरज आहे.
क्षितिजा बिडवई संपर्क : ९८२२०२०८९९
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.