आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचैत्री पौर्णिमेला शेतीची कामे उरकून घाम गाळून पिकवलेले धनधान्य सुरक्षितपणे घरी घेऊन जाण्याचा क्षण खूपच आनंदाचा असतो. कारण त्यानंतर गावच्या दैवतांच्या जत्रा सुरू होतात. आजपर्यंत मी खूप बाजार पाहिले. परंतु गावच्या जत्रेचा अनुभव घेतला नव्हता. योगायोगाने मैत्रिणीचं निमंत्रण आलं. गावची जत्रा आहे, तू आलं पाहिजे,असं म्हणाली. मग मीही तयार झाले. एक दिवस अगोदरच तिच्या घरी हजर झाले. जत्रेचं स्वरुप कसं असतं, असं मी तिच्या वडिलांना विचारलं. त्यांनी सांगितलं, की गावातील भाविकांनी कावडीनं आणलेल्या गंगेच्या पाण्याने देवाची आंघोळ होते. संध्याकाळी छबिन्यात शोभेच्या दारुची आतषबाजी होते. दुसऱ्या दिवशी आसपासच्या गावातील पहिलवानांच्या कुस्त्या रंगतात. नंतर मी प्रत्यक्ष जत्रेचा अनुभव घेत असतानाच, मंदिरासमोरील पायऱ्यांच्या दुतर्फा, पानं-फुलं-नारळ विक्रेत्यांची धांदल दिसत होती. ते विक्रीबरोबरच भाविकांच्या चपला ठेवण्याचीही सोय करुन देत होते. जत्रेत जास्त प्रमाणात हलवायाची दुकानं, त्याचबरोबर गरिबांना परवडणारा खास जत्रेत विकाला जाणारा, रेवडी, फुटाणे आणि मुरमुऱ्याचा खाऊ दिसत होता. लहान-मोठ्यांचे मनोरंजन करणारे रहाटपाळणे. लहान मुलांसाठीची विविध खेळण्यांची दुकानं सगळ्यांनाच आकर्षित करणारी होती. त्यातही माझं लक्ष वेधून घेणारी दुकानं म्हणजे जत्रेचं निमित्त करुन माहेरवाशिणींसाठी कमी किमतीत साज-शृंगाराच्या वस्तू असलेली छोटी-छोटी दुकानं. अशाच दागिन्याच्या एका दुकानासमोर मी उभी होते. एका दगडी भिंतीवर आरसा ठेवून, आपल्याला कोणता दागिना शोभतो हे सांगणारी, तर कोणत्या दागिन्याने आपण अधिक खुलून दिसतो, हे त्या छोट्याशा आरशात पाहणाऱ्या तरुणीने माझे लक्ष वेधले. खरेदी केल्यानंतर त्या तरुणींच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य मला नामांकित दागिन्यांच्या शो-रुममधून खरेदी करणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यापेक्षा अधिक समाधानी आणि आनंदी दिसलं. त्याच क्षणी मी तो फोटो क्लिक केला...
संपर्क : priyankasatpute45@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.