आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकामवाल्या मावशी दोन दिवस रजेवर असल्याने शुभदाचे कामाचे वेळापत्रक कोलमडले. ऑफिसमध्ये निघायची घाई असताना..
. शुभदा : अगं, तन्वी आज थोडी भांडी राहिलीत, जरा घासून ठेव. तन्वी : मम्मा, काल मी घासलेली, आज दादाचा टर्न आहे. आजी : अगं, तो मुलगा आहे. तो कशाला घासेल भांडी? हा संवाद आपण नीट वाचला तर त्यातून तीन पिढ्यांच्या स्त्रियांची मते लक्षात येतील. आजीच्या काळात पूर्णवेळ घरकाम करणाऱ्या स्त्रिया, तर बाहेरची सर्व कामे करणारा पुरूष वर्ग. त्यामुळे मुलाने भांडी घासण्याला तिचा विरोध. आईला सतत काम करताना बघत वाढलेली शुभदा. मनाचा कल कधी इकडे, तर कधी तिकडे. पण, सवयीने तिनेही तन्वीलाच हाक मारली. तन्वी मात्र स्वतःच्या विचारांवर ठाम. तर अशी वैचारिक दरी काही प्रमाणात सगळीकडेच दिसून येते. कसा सोडवायचा हा तिढा?
दुसरा प्रसंग : घाईत असताना रोजची ट्रेन चुकली आणि वैशाली आज भेटली. धापा टाकतच ट्रेन पकडल्याने तिला क्षणभर बोलताच येईना. शांत झाल्यावर, ‘कशी आहेस?’ विचारल्यानंतर मात्र तिचा बांध फुटला. डोळ्यातून झरझर पाणी वाहू लागलं. गेली पंधरा वर्षे रोज लवकर उठून घर, जेवण, ऑफिस अशा घरातील आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पेलताना तिचा जीव मेटाकुटीला आला होता. काही वेळा तर मुलांसाठी स्त्रिया आपले करिअर बाजूला ठेऊन घरातील जबाबदारीला वाहून घेतात. कालांतराने लक्षात येतं की आपलं जगणं राहूनच गेलं. बदलत्या काळात घरातील जबाबदाऱ्या, अर्थार्जन आणि मुलांचे पालकत्व अशा तिहेरी जबाबदाऱ्या स्त्रियांवर आल्या आणि मग ‘सुपर वुमन’ची दमछाक होऊ लागली. सुपर वुमन व्हायच्या नादात अनेक मैत्रिणी तणावपूर्ण जीवन जगत आहेत. किंबहुना त्या स्वतःचं जगणंच विसरून गेल्या आहेत. इतरांचं जगणं आनंदाने भारून टाकत असताना स्वतःचं जगणं झाकोळून जात असेल, तर कुटुंबातील समतोल साधला जाणार नाही. त्याहीपेक्षा घरात वाढणाऱ्या मुलांसमोर एक चुकीचं उदाहरण ठेवलं जाईल. आज आपण, उद्या आपल्या घरातील मुली.. हे वर्तुळ असेच चालत राहील. सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गरज आहे हा भार हलका करण्याची. सर्वांच्या सहकार्याची. घरातील आईला सतत काम करताना पाहून मुलांच्या मनावर ही ठराविक कामे आईचीच आहेत, हे बिंबले जाते आणि मग मुलेही तशीच वागू लागतात. बाहेरील कामे पुरुषांची आणि घरातील कामे महिलांची, ही कार्य विभागणी वर्षानुवर्षे आपण पाहात आलो आहोत, त्याहीपेक्षा ती निभावत आलो आहोत. ही चौकट मोडून नवीन चौकट घडवण्याचा प्रयत्न आपल्याला जाणीवपूर्वक करावा लागणार आहे. करिअर आणि घरातील जबाबदाऱ्या या दोहोंमुळे महिलांना खूपचं तणावाचा सामना करावा लागतो. हा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरातील मुलांच्या संगोपनातच याची बीजे आहेत. आपली मुले नेहमीच आपल्याला अनुभवत असतात, आपले निरीक्षण करीत असतात. साधारण तशीच वागत असतात. त्यामुळे सर्वप्रथम घरातील, बाहेरील जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. हे ठरवत असताना घरातील सर्व सदस्यांना या चर्चेत सहभागी करुन घ्यावे. त्यामुळे जबाबदाऱ्याचा विस्तृत आवाका सगळ्यांच्या लक्षात येईल. जबाबदारीचे विकेंद्रीकरण होईल. मुलांचे संगोपन ही केवळ एकट्या आईची जबाबदारी नसते, तर ती घरातील सर्वांचीच सामूहिक जबाबदारी असते. याबाबत आई-बाबांनी सतत बोलत राहील पाहिजे. परस्परांची मदत घेतली पाहिजे. आई जेवण बनवत असेल आणि बाबांनी ते वाढलं, सगळ्यांनी मिळून घर आवरलं, तर अशा छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर नकळत समानतेचे संस्कार होतात. आईवडिलांसोबत मुलांचे प्रेमाचे बंध अधिक मजबूत होतात. पालक, मुले आणि घरातील सदस्यांमधे लोकशाही तत्त्वांवर आधारित नाते विकसित व्हायला हवे. स्वातंत्र्य, समता, न्याय, सहकार्य याची जाण ठेवत; परस्परांची स्पेस मान्य केली पाहिजे. बरेचदा कुटुंबावरील प्रेमामुळे स्त्रिया सर्व कामे स्वतःच करू पहातात आणि मग तिला ताणतणावाला सामोरे जावे लागतेे. कुठेतरी हे आपण थांबवले पाहिजे. प्रेमाने सहकार्य मिळवले पाहिजे. आजची स्त्री ही आई, पत्नी, सून, गृहिणीची भूमिका, ऑफिसमधील काम अगदी लीलया पार पाडते. आपल्या मुलांना सर्व सुख-सोयी देताना त्यांची अतीव काळजी घेते. पण, हे सर्व करताना, नवी आव्हाने पेलताना तिने स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. स्वतःचे शारीरिक, मानसिक आरोग्य तर जपायचे आहेच; पण आपले छंद जोपासत, स्वप्ने पूर्ण करत खऱ्या अर्थाने जगायचे आहे. मुलांचे जीवन फुलवताना स्वतःला सुद्धा फुलवायचे आहे. मुले आपले अनुकरण करीत असतात तेंव्हा गरज आहे त्यांच्यासमोर सकारात्मक उदाहरणे ठेवण्याची. { संपर्क : ९६७३७३४५३१
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.