आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा विचार:भाजपकडून आपल्याला शिकता येतील सहा धडे ; सत्य स्वीकारा आणि त्यातून प्रेरणा घ्या

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा बाण चालवून भाजप इतक्या निवडणुका जिंकत नाही. तसेच त्याची विचारसरणी हेही त्याचे कारण नाही. त्रिपुरापासून गुजरातपर्यंत, सामान्य लोकांपासून व्यावसायिकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, अशा व्यापक समर्थनासाठी आणखी बरेच काही गरजेचे असते. हा आधार कायम ठेवण्यासाठी तो सतत मेहनत घेतो. आता ते स्वीकारण्याची आणि त्यातून काही शिकण्याची वेळ आली आहे!

सरकारवर खूप टीका केली जाते. चिंता कितीही खऱ्या असल्या तरी हे नाकारता येणार नाही की, सरकार चांगली कामगिरी करत आहे.

गेल्या आठवड्यात भाजपने गुजरातमध्ये विक्रमी विजय नोंदवला. हिमाचलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, पण राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून गुजरातचा विजय अधिक महत्त्वाचा आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६, तर हिमाचलमध्ये फक्त चार जागा आहेत. तसेच हिमाचलमध्ये भाजपचा पराभव केवळ १% मतांच्या फरकाने झाला. गुजरातमध्ये भाजपने काँग्रेसचा धुव्वा उडवला. भाजपला ५२% मते मिळाली, तर काँग्रेसला २७%. केंद्रात आठ वर्षे भाजपचे सरकार असताना हा प्रकार घडला. याउलट यूपीए सरकारने सत्तेचे आठवे वर्ष पूर्ण केले तेव्हा अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. पण, आज लोक सत्ताधारी पक्षाला निवडणुकांवर निवडणुका जिंकून देत आहेत. भाजप प्रत्येक निवडणूक जिंकत नाही. यावरून देशात लोकशाही जिवंत असल्याचे सिद्ध होते. भाजपला प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते, असाही त्याचा अर्थ आहे. आज जगातील मोठ्या लोकशाही देशांमध्ये भाजपइतकी लोकप्रियता असलेला आणि त्याच्याइतके यश मिळवलेला कोणताही राजकीय पक्ष नाही!

सत्तेचे केंद्रीकरण झाल्यावर उद्भवणाऱ्या समस्यांकडे आपण तत्परतेने लक्ष वेधतो. सध्याच्या सरकारवरही टीका होत आहे. या चिंता कितीही खऱ्या असल्या तरी आपण हे नाकारू शकत नाही की, ते चांगली कामगिरी करत आहे. वारे वेगाने बदलू शकते असा सोशल मीडियाच्या युगात भारतासारख्या बहुसंख्याक देशात भाजपचा अनेक लोकांवर प्रभाव कायम आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती भाजपला पाठिंबा देत नाही, परंतु ते निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसे ठरेल इतके नक्कीच करतात. भाजप चुकीचे करत असल्याचे अनेकदा सांगितले जाते, पण आपण हे विचारायला विसरतो की, भाजप असे काय चांगले करतो की इतक्या निवडणुका जिंकतोय? मला तुम्हाला सहा कारणे सांगायची आहेत. आणि यातून आपणही आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायला शिकू शकतो. आवेग : असे म्हणतात की, आपण एखादी गोष्ट उत्कटतेने करता तेव्हा त्याचे परिणाम बदलतात. निदान भाजपसाठी तरी ते खरे आहे. निवडणूक जिंकण्यासाठी एवढी धडपड करणारे राजकीय नेतृत्व तुम्हाला क्वचितच दिसेल. इतकी वर्षे सत्तेत राहूनही चैतन्य कमी झालेले नाही, तर अशा परिस्थितीत आपण सहसा उदासीन होतो. यातून आपण एक धडा शिकू शकतो की, जीवनात कधीही स्थिर होऊ नका किंवा आपल्या कम्फर्ट झोनशी तडजोड करू नका.

कठोर परिश्रम : भाजप प्रत्येक निवडणुकीत शेकडो रॅल्या काढतो आणि त्यासाठी संपूर्ण देश पिंजून काढतो. तुम्ही पक्षात जेवढे ज्येष्ठ आहात, तेवढे काम तुम्हाला करावे लागेल. यातून आपण शिकू शकतो तो धडा म्हणजे जीवनात कठोर परिश्रमाशिवाय काहीही साध्य होत नाही, मग तुम्ही कितीही प्रतिभावान असाल किंवा कितीही यशस्वी झाला असाल तरी. साधा संदेश, यशस्वी अंमलबजावणी : स्वच्छ भारत, उज्ज्वला, हर घर जल – ही काही उदाहरणे अशा योजनांची आहेत, जी सर्वसामान्यांना सहज समजू शकतात. एखाद्या व्यक्तीची कल्पना करा, जिला आयुष्यात पहिल्यांदा शौचालय, गॅस कनेक्शन किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळते. घोषणा करणे सोपे आहे, योजना राबवणे अवघड आहे. परंतु, आज वरील योजनांचे कोट्यवधी लाभार्थी असून त्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत आहे. सरकार आणि पंतप्रधानांच्या चाहत्यांची संख्या एवढी अधिक आहे, हे विनाकारण नाही. यातून आपण जीवनात साधी ध्येये ठेवायला आणि ती चांगल्या प्रकारे अमलात आणायला शिकू शकतो. भारतीय मानसशास्त्राची समज : भाजप ‘मतदार प्रथम’ या धोरणाचे पालन करतो. तो मतदाराच्या विचारसरणीला जज करत नाही. कोणत्याही कन्झ्युमर मार्केटिंग ब्रँड किंवा मीडिया हाऊसपेक्षा त्यांना सरासरी भारतीयाचे मानसशास्त्र चांगले माहीत आहे. राष्ट्रीय अभिमानाची भावना असो, हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन असो किंवा स्वदेशी वस्तूंची असलेली ओढ असो - हा पक्ष भारतीयांचे विचार आणि भावना चांगल्या प्रकारे जाणतो. यातून आपण धडा शिकू शकतो की, आपले प्रेक्षक, ग्राहक किंवा मतदारांना चांगले समजून घेतले तर आयुष्यात खूप पुढे जाता येईल.

उच्चभ्रूंना बाजूला ठेवणे : आपल्या सर्व भारतीयांमध्ये एक ग्रंथी आहे, ज्याची मुळे आपल्या वसाहतवादी भूतकाळात आहेत. यामुळे इंग्रजी, पाश्चिमात्य आणि उच्चभ्रू संस्कृतीचे आपण कौतुक करतो. भाजपमध्ये अशी कोणतीही अडचण नाही. हे खरे आहे की, तो कधी कधी पाश्चिमात्यांकडून त्याची झालेली प्रशंसा अधोरेखित करतो, परंतु तो इंग्रजाळलेल्या भारतीयांकडून मान्यता मिळण्याचा शोध घेत नाही. ते भाजपवर टीका करत राहतात, पण तो शांतपणे आपले काम करत असतो, म्हणजेच मतदारांचा विश्वास जिंकत असतो. धडा हा आहे की, उच्चभ्रूंकडून प्रमाणीकरण शोधू नका, आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. भारतासाठी व्हिजन : एखाद्या नेत्याकडे देशासाठी व्हिजन असेल तर त्यामुळे खूप मदत होते. जगाची महासत्ता आणि आर्थिक महासत्ता बनून भारताचे नाव समृद्ध देशांच्या पंक्तीत नेण्याचे सरकारचे ध्येय आहे. यातून धडा असा आहे की, जीवनात आपल्याकडे व्हिजन असेल तर ते साध्य करणे कितीही कठीण असले तरी व्हिजन नसण्यापेक्षा ते चांगले आहे. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

चेतन भगत इंग्रजीतील कादंबरीकार chetan.bhagat@gmail.com

बातम्या आणखी आहेत...