आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाष्य:अनियंत्रित क्रोधाचे सामाजिक दुष्परिणाम

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी पुद्दुचेरी इथली बातमी वाचण्यात आली. बातमीचा सारांश असा होता : शाळेत जाणारी आपली मुलगी सतत दुसरी येते. याचे कारण तिच्या वर्गातला तो एक मुलगा, जो अभ्यासात तिच्यापेक्षा हुशार आहे याचा राग येऊन या मुलीच्या आईने त्या मुलास शीतपेयातून विष पाजले. परिणामी त्या मुलाचा मृत्यू झाला. भाजीत मीठ कमी पडलं म्हणून राग येऊन बायकोला मरेपर्यंत मारहाण करणारे अनेक नवरे अनेकदा बातमीचा विषय झालेले आहेत. त्यामुळे राग म्हणजे नेमके काय? राग कोणाला येतो? त्याची कारणे काय आहेत आणि त्यावर काही उपाय करता येतो का? त्यावर नियंत्रण मिळवता येतं कां? लोकांना अशा छोट्या छोट्या कारणावरून राग यायला लागला तर त्याचे समाजावर काय परिणाम होतात? अशासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले आणि याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न मन आणि बुद्धी दोन्ही करत राहिले.

मानसशास्त्राप्रमाणे राग ही एक भावना आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दलच्या नकारात्मक भावना व्यक्त केल्या जातात. राग येणे ही चांगली गोष्ट असू शकते. त्यामुळे व्यक्तीला तिच्या मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध होते.परंतु सातत्याने राग व्यक्त होत असेल तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. लेखाच्या सुरुवातीला ज्या बातम्यांचा उल्लेख केलाय त्या बातम्या म्हणजे अनियंत्रित रागामुळे माणसं किती चुकीच्या पद्धतीने वागतात याचे उदाहरण आहे.

राग नियंत्रण करण्याचे एक तंत्र आहे. भावना आणि रागामुळे होणारी शारीरिक उत्तेजना कमी करणे हे राग व्यवस्थापनाचे ध्येय असते. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो लोकांशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे कोणतीही व्यक्ती तिला राग आणणाऱ्या गोष्टींपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही.व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या परिस्थितीला बदलू शकत नाही. परंतु या बाबतीत व्यक्ती स्वतःच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवण्यास शिकू शकते. एखादी व्यक्ती राग येण्याच्या परिस्थितीत कसे वागते हे ठरवण्यासाठी रागाचे वर्गीकरण करणे आवश्यक असते. व्यक्तीच्या राग व्यक्त करण्याचे तीन प्रकार असतात.

१ ) निष्क्रिय आक्रमकता २ ) उघड आक्रमकता ३ ) आश्वासक राग काही वेळा कामाच्या ठिकाणी किंवा घरातील परिस्थितीमुळे नैराश्य येऊ शकते. यातूनही ही भावना निर्माण होते. परंतु नियंत्रित व्यक्तीच्या वैयक्तिक नातेसंबंधांसाठी आणि स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात समस्या निर्माण करू शकतात. सुदैवाने आज रागावर नियंत्रण मिळवण्याची किंवा येऊ शकणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्याची तंत्रे अभ्यासकांनी शोधून काढली आहेत. रागाचा कोणताही आकार असला तरी अनियंत्रित राग व्यक्तीच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. संशोधनातून सिद्ध झालेय की, रागामुळे निद्रानाश, पचनसंस्थेच्या समस्या, डोकेदुखी इ. ताणतणावासंबंधित समस्या निर्माण होतात. तसेच रागामुळे मादक पदार्थ आणि दारूच्या वापरासह हिंसक आणि धोकादायक वर्तन व्यक्तीकडून होऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियंत्रित रागामुळे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसोबतचे संबंध लक्षणीयरीत्या खराब होतात. लोकांना राग येण्यासाठी अंतर्गत किंवा बाह्य घटना कारणीभूत ठरतात.राग व्यवस्थापनाची साधारणपणे पाच तत्त्वे सांगितली जातात. या तत्त्वांचा किंवा तंत्रांचा वापर करून व्यक्ती रागाचे व्यवस्थापन करू शकते. स्वतःला ओळखा म्हणजेच स्वतःला नेमका कशाचा राग येतो याचा विचार करा. स्वतःला राग येऊ लागला आहे अशी जी लक्षणे आहे ती ओळखण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा ती लक्षणे दिसायला सुरुवात होईल तेव्हा त्या परिस्थितीतून दूर जा किंवा विश्रांतीचं तंत्र वापरून पाहा. साधारणपणे ज्या घटनेचा राग आलेला असतो ती पुन्हा पुन्हा सांगणे ही लोकांची प्रवृत्ती असते. त्यामुळे घडून गेलेल्या घटनांची उजळणी करत स्वतःला त्रास करून न घेता जेव्हा पहिल्यांदा राग आला आहे त्याच वेळी ज्यामुळे राग आलाय ते कारण किंवा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.ती घटना विसरून जाण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे आपल्याला आनंद वाटेल अशा घटना, व्यक्ती पुन्हा पुन्हा आठवा. तुमची विचार करण्याची पद्धती बदला. जेव्हा एखाद्या व्यक्ती,घटनेचा राग येतो तेव्हा ती व्यक्ती किंवा गोष्ट त्याहीपेक्षा वाईट आहे असे वाटणे सोपे असते. याउलट संज्ञानात्मक पुनर्रचना या तंत्राद्वारे व्यक्ती असहाय किंवा नकारात्मक विचारांची दिशा बदलवून सकारात्मक विचार करण्यास सुरुवात करू शकतात. त्यासाठी स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल बोलताना कधीच नाही किंवा नेहमीच यासारख्या शब्दांचा वापर करणे टाळून सकारात्मक शब्दांचा जाणीवपूर्वक वापर करणे सुरू करा. तर्कशास्त्राचा वापर करा. रागामुळे व्यक्तीची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे प्रत्येक वेळी तुमच्या आसपास तुमच्या आवडीप्रमाणे घटना घडणे आवश्यक नाही याची मनात सतत जाणीव ठेवा, ज्यामुळे तुमचे वर्तन अधिक संतुलित बनत जाईल. इतरांकडून तुमच्या असलेल्या अपेक्षांचे इच्छेमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा. रागावलेल्या व्यक्ती, त्यांना स्वतःला आवडेल त्या पद्धतीने गोष्टी व्हाव्यात अशी मागणी करतात. त्यामुळे इतर लोक या पद्धतीने वागले नाही तर त्यांना अधिक राग येतो. त्यामुळे व्यक्तीने स्वतःच्या मागण्या विनंतीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला तर विनंती अमान्य होऊ शकते अशा शक्यतेचा संदेश मनाला दिला जाऊ शकतो. त्यामुळे निराशा येत नाही. पर्यायाने राग येत नाही. जर एखाद्या वेळेस गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाही असे लक्षात आले तर निराशेचे रूपांतर रागात होऊ देऊ नका. यासाठी दीर्घ श्वसन, चांगल्या आठवणी आठवणे अशा सोप्या कृतीमुळे स्वतःच्या संतप्त भावनांना शांत करण्यासाठी मदत होऊ शकते.

तुमचे संवादकौशल्य सुधारा. रागाच्या भरात लोक सहसा निष्कर्षापर्यंत पोहोचतात. त्याऐवजी प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबण्याचा, ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर तुम्हाला कसे उत्तर द्यायचे आहे याचा काळजीपूर्वक विचार करा. नियमित शारीरिक व्यायामामुळे निर्माण होणारा अतिरिक्त तणाव दूर होण्यास आणि रागाचा उद्रेक जाणवू शकणारा ताण कमी करण्यास मदत होते. आपण आपल्या मनातून रागाची भावना पूर्णपणे काढून टाकू शकत नाही, परंतु राग आणणाऱ्या घटनांचा तुमच्यावर कसा परिणाम होतो आणि तुम्ही त्या घटनांना कशा प्रकारे प्रतिसाद देता त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता. तुम्ही रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही आणि तुमच्या जवळचे लोक दीर्घकाळासाठी आनंदी राहू शकतात. त्यामुळे एखाद्या घटनेला,व्यक्तीला रागाने उत्तर देण्यापेक्षा त्याला अधिक निरोगी उत्साहवर्धक पर्याय शोधा. माणसाला राग येणे हे नैसर्गिक आहे. पण राग का येतो याची कारणे जाणून घेऊन एकतर ती कारणे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रयत्न करणे हा एक मार्ग असतो किंवा परिस्थिती समजून घेऊन दिल्या जाणाऱ्या प्रतिसादांवर नियंत्रण ठेवणे हा दुसरा मार्ग उपलब्ध असतो. अर्थात,यासाठी कोणताही अभ्यासक्रम नसतो. पारंपरिक समाजव्यवस्थेत व्यक्ती एखाद्या परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा हे एक तर एकत्र कुटुंबातील व्यक्तींच्या वर्तनाचे निरीक्षण करून शिकत असे किंवा एकूणच समाजजीवनातल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून वेळोवेळी केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनातून शिकत असे. आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या समाजव्यवस्थेत व्यक्तिवर्तनाला दिशा देणारे किंवा मार्गदर्शन करणारे हे दोन्ही मार्ग आपले महत्त्व गमावून बसले आहेत आणि समाज यासाठी दुसरा सक्षम पर्याय उपलब्ध करून देऊ शकलेला नाही. अशा अवस्थेत क्षणिक रागातून होणाऱ्या हिंसेची वेगवेगळी रूपे आता दिसत आहेत. म्हणूनच समाजातल्या विविध गटातटांमध्ये अधिकाधिक सुसंवादाचे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करण्याची गरज आहे. परंतु याचे भान व्यक्तींना ना समाजातील धुरिणांना. एका अर्थाने हे आपल्या समाजव्यवस्थेचे अपयश आहे असे खेदाने म्हणावे लागेल. प्रा. डॉ. स्मिता अवचार संपर्क:smitaawachar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...