आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दखल:‘सोलोगॅमी’ इज नॉट समथिंग न्यू...

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाचा मेंदू हे रसायन जगातील सर्वाधिक अजब आणि तितकेच गुंतागुंतीचे आहे. आयुष्याचा पसारा नीटनेटका करण्यासाठी माणसाने काही लेबल्स शोधून काढली आहेत. आपल्या कृतीला जगासमोर व्यक्त करण्यासाठी काही शब्द या मेंदूने निर्माण केले. जगाशी संवाद साधल्याशिवाय आपले जीवन आणि त्याच्या गरजा भागू शकत नाहीत. समाजाची सहमती मिळवणे आपल्या जगण्याची पूर्वअट असल्याने आपल्याला सोशल अॅनिमल वगैरे म्हटले जाते. शिवाय समाजात नातेसंबंधांवरून दररोज उठून गोंधळ माजू नये म्हणूनही समाजमान्यता मिळवणे ही आपली गरजही झालेली आहे.

परवा अशीच एक बाला व्यक्त झाली. क्षमा बिंदू तिचं नाव. तिने सांगितले की, ती स्वत:शीच समारंभपूर्वक विवाह करणार आहे. याला सोलोगॅमी म्हणतात असेही तिने माध्यमांसमोर सांगितले. विवाह, लैंगिक संबंध, अफेअर, चुंबन, प्रेम प्रकरण या शब्दांनी नेहमीच आकर्षित होणे, शहारून जाणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे. त्यात एखादी महिला, मुलगी यावर मोकळेपणाने बोलते आहे म्हटल्यावर तर काही तासांत क्षमा बिंदू भारतभरात चर्चेचा विषय झाली. आघाडीच्या वृत्तवाहिन्यांनी सोलोगॅमी या शब्दाचा किस पाडला. पण स्वत:च्या मनाशी तुम्ही काही वेळ बोललात? लक्षात येते की शब्द जरी नवा असला, भारतात तो पहिल्यांदा चर्चेत आला असला तरीही दैनंदिन व्यवहारात आपण क्षमा बिंदूसारख्या व्यक्ती कित्येक पाहिलेल्या आहेत. प्रौढ वयातील कोणतीही व्यक्ती स्वत:च्या मनाचा त्रयस्थपणे विचार करू लागली तर तिला क्षमांनी उच्चारलेला सोलोगॅमी शब्द नवा वाटेल. पण ती कृती नवी नाहीये हेसुद्धा पटेल. तिने विधिवत स्वत:शीच विवाह करणेदेखील पारंपरिक भारतीय विवाह पद्धतीत बसत नाही. पण तिची प्रवृत्ती ही खूप परिचयाची वाटते. थोडे आसपास डोळस व सहृदयतेने पाहिले तर स्वत:शी विवाह केलेल्याच व्यक्ती अधिक दिसतात. लौकिक अर्थाने त्यांनी तशी कृती केलेली नसली तरीही...

भावनांच्या पसाऱ्याला गुलाबी-लाल रंग दिला की त्याचा बाजार होतो हे जगातील पिंक इकॉनॉमीला पुरते माहिती आहे. गुजरातमधील २४ वर्षीय क्षमाच्या कृतीची मोठी बातमी झाली. पण हे पहिल्यांदा घडलेे नाहीये. हे सतत व अनादी घडत असते. आपण स्वत:च्या प्रेमात असतोच की.. फक्त त्याचे सार्वजनिक सोहळे करत नाहीत म्हणून त्याची बातमीही होत नाही. १९९७ मध्ये एक चित्रपट खूप हिट झाला होता. दिल तो पागल हैं... त्यात व्हॅलेंटाइन डेला माधुरी दीक्षित स्वत:साठीच गिफ्ट खरेदी करून स्वत:च्या प्रेमभावनेला एकट्याने सेलिब्रेट करते. तोपर्यंत ती कोणाच्या प्रेमात नसते. आणि कोणीही तिला व्हॅलेंटाइन गिफ्ट आणून देणारे नसते हे तिलाही माहिती असते. मग कोणीच नाही म्हणून कोणालाही स्वीकारावे हेदेखील तिला पटत नाही. सो शी सेलिब्रेट व्हॅलेंटाइन विथ सेल्फ.नो प्रॉब्लेम. भावनेचा निचरा होणे ही त्या क्षणाची गरज असते. व्यक्त झालो नाही तर तुंबते. तुंबेल की सुरू होते समस्यांची श्रृंखला.

इक लफ़्ज़-ए-मोहब्बत का अदना ये फ़साना है सिमटे तो दिल-ए-आशिक़ फैले तो ज़माना है

असे जिगर मुरादाबादींनी लिहिले तेव्हा त्यांना काय वाटले असेल माहीत नाही. पण प्रेम ही सगळ्यात शक्तिशाली भावना माणसाच्या वाट्याला आली आहे. ती व्यक्त झाली नाही तर त्या व्यक्तीपुरतीच ती मर्यादित राहते. व्यक्त झाली तर जगाला त्या व्यक्तीची दखल घेण्यास भाग पाडते. क्षमा या कन्येने स्वत:वरचे प्रेम व्यक्त केले व त्याचा सोहळा करायचे ठरवले तरीही गहजबच झाला. किती चर्चा? किती अँगल? किती मीम्सचा पाऊस? ही क्षमा बिंदूची गोष्ट नाहीये. ही प्रेमाची गोष्ट आहे, ज्यावर माणूस मौन राहू शकत नाही. कधीही राहिलेला नाही. बरे स्वत: सोबत आयुष्य सेलिब्रेट करणारे समारंभच करतात असे कधीही भारतात घडलेले नाही म्हणूनदेखील ही कन्या चर्चेत आहे.

माझ्या लहानपणी मी आसपासच्या काकू, मावशा, शेजारीपाजारी, खेडूत अशा अनेक बायका पाहिल्या आहेत. इथं बायका पाहिल्या आहेत हे आवर्जून सांगते आहे. कारण मला लहानपणी पुरुषांची खूप ओपन अभिव्यक्ती पाहण्याची संधी कमी मिळालेली होती. मी मावशांच्या अंगाखांद्यांवर अधिक वाढल्याने तसे घडले असावे...

माझ्या गावी गेले की तिथल्या प्रतिष्ठित घरात आम्ही दुपारी पत्ते, चंफुल मांडत असू. मग सगळ्या आयाबाया पाच तास पत्ते कुटणे, गावगप्पात मस्तपैकी मग्न होत असत. कधी कधी विहिरीवर पोहण्यासाठी तासन््तास जात असू. तिथे मग गावातल्या बायकांच्या चर्चा कानी पडत. साहेबांच्या दोन्ही बहिणींना लग्न करायचे नाहीये म्हणे. मग दुसरी बाई विचारत, काय बाई, शिरमंतांचे थाटच वेगळे, त्यांनी लग्न केले काय, नाही केले काय? इतके तालेवार भाऊ आहेत. शेतीवाडी बक्कळ आहे. दोन्ही बहिणींनी लग्न केले नाही तरीही साहेब आयुष्यभर फुलासारखे लेकींना सांभाळतील. पण का ग त्यांना लग्न का नाही करायचे? लहानीला जितेंद्र फार आवडतो. तिचं म्हणणं आहे की जितेंद्रसारखा मिळाला एखादा तरच बोहल्यावर चढेल, नाहीतर नाही. तर खेड्यातील अनेक तालेवार, गर्भश्रीमंत घरातील महिला छकडे घेऊन वट के साथ तालुक्याला, शहरात जात. दिवसभर जितेंद्र किंवा त्या काळात जे जे हिट हीरोंचे चित्रपट असत ते पाहून मग रात्री गावी. अंगाखांद्याला सेवक होते. चित्रपट हेच वास्तव मानून जगणाऱ्या या बायका होत्या. मग कित्येक वर्षांनी कळले की, त्यांनी शेवटपर्यंत लग्न केलेच नाही. एकीने केले होते तर तिचा संसार काही सुरळीत झाला नाही. पुन्हा ती माहेरी आली व ऐशोआरामात जगत राहिली. आमच्या परिचयाचे स्नेही होते. काका ऑफिसला गेले की त्या काकू लगेच दुपारची तिकिटे काढून सिनेमाला धूम ठोकायच्या. सिनेमाहून येताना त्या सिनेमातल्या नटीप्रमाणे साडी, मॅचिंग बांगड्या इ. इ. आणून अगदी त्या नायिकेप्रमाणे राहत होत्या. काका ऑफिसमधून आले की त्यांनी कधीही काकूंचे नटणेथटणे अॅप्रिशिएट केलेले नव्हते. आता हे आम्हाला कसे कळले? त्या काकू माझ्या आईकडे येऊन हमसून हमसून रडून त्यांची कथा सांगायच्या. त्या कथेत त्या नेहमी चित्रपटातील नायकाशी काकांची तुलना करायच्या. काका बुद्धिमान होते. क्लास वन अधिकारी होते. त्यांना काही चॉकलेटी टाइप राहणे जमेल असे मला तरी त्या वेळी वाटले नव्हते. त्यांच्या शेजारी जितके दिवस राहिले तितके दिवस मी काकूंना कधीच उदास किंवा सारखे दु:खी पाहिले नाही. त्यांचा टाइम टेबल फिक्स होता. एकही चित्रपट सोडायचा नाही. स्वत:चे राहणे नेहमी टापटीप. अगदी पेंटिंगमधल्या बाईसारखे चाफा माळून वगैरे. बॉम्बे डाइंगच्या फुलाफुलांच्या साड्या आणून मस्त टकाटक राहत होत्या. त्या मस्त जगत होत्या. त्यांना अनेकदा काका कधी आले, कधी गेले, कुठे दौऱ्यावर गेलेत का याच्याशी काहीही देणे-घेणे नसायचे. फिल्मफेअर, चित्रपटाशी संबंधित हिंदीतील मासिके, त्यातील फोटोज पाहून त्यांचे आयुष्य मोहरून गेलेले होते. त्या फोटोंची नक्कल करत तसल्या केशरचना करण्यात त्यांचा अख्खा दिवसही जात होता. सारख्या स्वत:च्या दिसण्यात मश्गुल असायच्या. खुश असायच्या. त्यांचे रडणेदेखील चित्रपटातल्या हिरोइनप्रमाणे स्टायलिश असेल असे मला वाटायचे.

‘दिल तो पागल है’ मधल्या माधुरीसारख्या किंवा लग्न न करणाऱ्या सुखवस्तू कुटुंबातल्या दोन बहिणींसारख्या, स्वत:मध्येच रमणाऱ्या आमच्या शेजारच्या काकूंसारख्या किंवा मग क्षमा बिंदूसारख्या स्वत:वर प्रेम करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक काळात असतात. प्रत्येक प्रदेशात, शहरात, गावात, खेड्यात असतात. फक्त फरक इतकाच की स्वत:वरचं प्रेम व्यक्त करण्याची, ते ‘एन्कॅश’ करण्याची त्यांना मिळालेली संधी, त्यांनी स्वत:वर प्रेम करण्याला मिळालेली कौटुंबिक-सामाजिक मान्यता आणि या मान्यतेला मिळालेलं भौतिक-ऐहिक पाठबळ यावरून त्यांचे जगणे ठरत असते. ‘सोलोगॅमी’ हा शब्द नवा नाही. लौकिकार्थाने विवाह करूनही स्वत:मध्ये मग्न असणारी माणसे समाजात कमी नाहीत. त्याअर्थी ‘सोलोगामी’ हा मनुष्यस्वभाव आहे. मार्केट इकॉनॉमीने प्रत्येक गोष्टीचा बाजार केल्याने मग आता सोलोगॅमी इव्हेंट बनलाय इतकेच..

आपण आज सोशल मीडियाला खूप बोल लावतो. मात्र रेडिओ, चित्रपट, चित्रपट मासिके, वर्तमानपत्रे होती त्या काळातही माणूस माध्यमांनी खूप झपाटलेला होता. सोशल मीडियामुळे सोलोगॅमीची चर्चा होते आहे. ते थिल्लर आहे असे मुळीच नाही. ज्या वेळी सोशल मीडिया नव्हता त्या वेळी ‘दम मारो दम’ कल्चरने (हिप्पी कल्चर) संपूर्ण पिढीला झपाटलेले होते. ही संस्कृती स्वत:त मग्न असणारीच नव्हती काय? यात सगळ्या आर्थिक व बौद्धिक स्तरातील लोक होते. जिथे जिथे मानवी भावनांचा खुला व अतिमुक्त अाविष्कार होतो तिथे तिथे त्यावर प्रतिक्रिया उमटत असतात. मानवी भावना, माइंड इज ऑलवेज एव्हरीथिंग. त्यामुळेच सोलोगॅमी इज नॉट समथिंग न्यू...

तृप्ती डिग्गीकर संपर्क : truptidiggikar55@gmail.com

बातम्या आणखी आहेत...