आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव:मातृत्वाचा झरा...

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळची अकरा वाजताची वेळ होती. ओपीडीतून आज लवकर घरी जायचा मी विचार करत असतानाच पेशंट समोर येऊन बसला. साडेचार महिन्यांची गरोदर पूजा ही माझी नेहमीची पेशंट नव्हती. आज ती पहिल्यांदा माझ्याकडे तपासणीसाठी आली होती. तिच्यासोबत पन्नाशीतील एक बाई होती. समोर खुर्चीत बसताच ती बाई म्हणाली, ‘मॅडम, तुमच्याकडं ट्रीटमेंट ठेवायची हाय. पहिली खेप हाय. सासरकडंन आणली इकडच.’

‘आतल्या टेबलवर झोप’. असं तिला सांगून मी तिची फाईल बघू लागले. तिच्या काकूंनी पोरीचे रिपोर्ट कसे आहेत त्याबद्दल चौकशी केली. आधीच्या डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित सांगितलं असून देखील माझ्याकडूनही खात्री करून घेण्यासाठी त्यांनी विचारले. ‘आतापर्यंतचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत’ म्हणत मी पूजाला तपासण्यासाठी आत गेले. चेकअप करुन पंधरा मिनिटांनी मी खुर्चीत येऊन बसणार तेवढ्यात, ‘नीट हाय ना सगळ?’ काकंूनी विचारले. ‘आता व्यवस्थित आहे सगळं. बाळाचे ठोके, तुझं ब्लड प्रेशर सगळं नॉर्मल आहे. एक मोठी सोनोग्राफी करावी लागेल. ती पुढच्या आठवड्यात करा.’ तपासणीची माहिती कागदावर भरत मी म्हणाले. ‘म्हणलं ते आणून देती मी. पण ही खातच नाय.’ तक्रारीच्या स्वरात काकू म्हणाली. ‘खायला पाहिजे पूजा. तूच उपाशी राहशील तर बाळाची वाढ कशी होणार? बाहेरुन वजन करुन ये.’ पूजा बाहेर जाताच काकू बोलू लागल्या, ‘घरच्या कोंबड्या हायत. गावरान अंडी हायती. दुभती म्हस हाय. सुध्द तूप हाय. काय नाय अस नाय बगा. पण ही पोरगी नगच म्हणती. तुम्ही जरा भ्या घाला. म्हंजी लेकरापायी ती खाईल.’ त्यांच्या बोलण्यावर मी गालात हसले. ‘पंचेचाळीस वजन’ पूजा आत येत म्हणाली. ‘चार महिन्यात फकस्त एक किलो वाढलय बगा.’ काकूच्या तक्रारीच्या स्वरावर पूजा म्हणाली, ‘नाही मॅडम दोन किलो वाढलंय. जेवढी भूक आहे तेवढंच खाऊ शकेन ना. हिला वाटतं की मी एक मिनिट पण तोंड बंद ठेऊ नये. सारखं हे खा, ते खा करते’ पूजाच्या तक्रारीचा सूर वाढला. ‘मॅडम, आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. अशीच वाद घालत बसते ही. माज काहीच ऐकत नाय.’ ‘पूजा, तुझं वजन वाढतंय म्हणजे तुझं खाणं व्यवस्थित आहे. पण काकूंना वाटतंय तू अंडी, चिकन, काजू, बदाम खायला हवं. मी तुला डाएट प्लॅन देते. ठीक आहे?’ पूजाने होकारार्थी मान डोलावली. काकूच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मी त्यांना विचारले, ‘तुम्ही पूजाच्या आज्जी का?’ ‘नाही, मी तिची मावशी. हिचा जन्म झाला तसं मी तिला माझ्याकडं आणलं. मला पोरगी पाहिजेल हुती पण झाली चार पोरंच. पोरगी नाय म्हणून मी बहिणीला मागितली.’

किती सहज बोलल्या त्या. खरं तर मला त्यांचं कौतुक वाटलं. त्यांच्या बोलण्यावरुन आदल्या रात्रीचा प्रसंग आठवला. आदल्या रात्री डिलिव्हरी झालेल्या बाईला आधीच्या दोन मुली होत्या आणि तिसरीही मुलगीच झाली म्हणून पेशंटसकट घरच्यांचे चेहरे उदास झाले होते. पुन्हा मुलगीच म्हणून पेशंटच्या डोळ्यात तरळलेले पाणी बघून मला त्या चिमुकलीची दया आली होती. मुलगा पाहिजेच म्हणून हट्ट धरणारे सुशिक्षित-अशिक्षित लोकं रोज आपल्या पाहण्यात येतात पण, पूजाच्या मावशीकडे बघून वाटलं या अडाणी बाईनं मुलगी दत्तक घेऊन समाजाला नकळत एक संदेश दिला. एकीकडे वंशाचा दिवा झाला नाही म्हणून उदास झालेली जन्मदाती आई आणि दुसरीकडे दत्तक घेतलेल्या मुलीला जीवापाड जपणारी आई. या परस्पर विरोधी गोष्टी बघून वाटलं की, आईपण मिरवण्यासाठी केवळ हृदयात नव्हे तर रोमारोमांत मातृत्वाचा झरा वाहत राहायला हवा.

डॉ. अश्विनी राऊत संपर्क : ८३२९९१२८०४

बातम्या आणखी आहेत...