आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण:शृंगारिक बाजाला संस्काराचा साज!

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सु लोचनाताई यांचा जन्म कोल्हापूर येथील कदम कुटुंबात १३ मार्च १९३३ रोजी झाला. दिसायला देखण्या असणाऱ्या माई लहानपणापासूनच चुणचुणीत आणि हुशार होत्या. घराण्यात गायकीची कुठलीही परंपरा नसताना त्यांनी गायन क्षेत्र निवडलं. माई सात वर्षाच्या असताना मुंबई येथील गिरगावच्या फणसवाडीमध्ये त्यांच्या कुटुंबाने आपलं बस्तान बसवलं. त्यांच्या आई भाजीपाल्याचा व्यवसाय करत. त्याचदरम्यान मेळ्यामध्ये माईंना अभिनय करण्याची संधी चालून आली. त्यावेळी श्रीकृष्ण बालमेळा खूप प्रसिद्ध होता. त्या बालमेळ्यात त्यांना नाटकांमध्ये अभिनय करण्याची आणि नंतर गायनाची संधीही चालून आली. १९४७ च्या दरम्यान त्यांना चित्रपटात पार्श्वगायन करण्यासाठी निमंत्रित केले गेले. लौकिक अर्थाने कुठेही गायनाचे प्रशिक्षण घेतलेलं नसताना सुद्धा सुलोचना चव्हाण यांना गोड गळ्याची देणगी मिळालेली होती. त्यांना कुठलाही गुरु नसला तरी त्यांचे पती श्यामराव चव्हाण हे सतत सुलोचनाबाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. गाणं कसं असावं? शब्द उच्चारण कसे असावेत? त्याचा स्वभाव कसा असावा? गाण्यातील हरकती कशा असाव्यात? या सगळ्या बारीकसारीक गोष्टी श्यामरावांनी त्यांना शिकवल्यामुळे आणि तेवढ्याच तत्परतेने सुलोचना यांनीसुद्धा श्यामरावांना प्रतिसाद दिल्यामुळेच सुलोचना चव्हाण हे नाव जगभर प्रसिद्ध झाले. ज्या काळात त्यांचं कलाक्षेत्रात पदार्पण झालं तेव्हापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत तमाशा, लावणीसारख्या कलाप्रकाराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. लावणीकडे नाक-डोळे मोडून पाहणाऱ्या पांढरपेशा समाजाला सुलोचनाताई यांनी या कलाप्रकाराकडे सकारात्मकतेने पाहण्यास आणि ऐकण्यास भाग पाडले. सुलोचना चव्हाण यांची लावणी घरंदाज आणि एेश्वर्यवान होती. त्यांनी फडावरची लावणी माजघरात पोहोचवली. लावणीचं सौंदर्यस्थळ ओळखून डोईवरचा पदर ढळू न देता लावणीला एक संस्कारक्षम बैठक दिली आणि लावणी जगभरात पोहोचवली. आपल्या गाण्यातल्या शब्दाचं वैभव त्यांनी आपल्या आवाजानं फुलवलं. त्यांचं गायन केवळ लावणीपुरतंच मर्यादित नव्हतं, तर हिंदी, गुजराती, पंजाबी, तमीळ अशा अनेक भाषांमध्ये त्यांचं मोलाच सांगितिक योगदान आहे. १९२० पासून सुरु झालेला हा संस्कारक्षम वारसा आज २०२२ मध्ये सुद्धा जिवंत आहे आणि पुढे सुद्धा त्यांच्या गाण्याने जिवंत राहील. दांगट मळ्याचा बाज, गोड गळ्याचा साज असा कृष्ण-कोयनेचे मिलन झालेला सुलोचना चव्हाण यांचा आवाज! “फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, “यो यो पाहुणा’, “कसं काय पाटील बरं हाय का’ यांसारख्या अजरामर लावण्या त्यांनी गायल्या. मुळामध्ये सुलोचना चव्हाण या नृत्यांगना नव्हत्या. त्या रंगमंचावर बसून गेय पद्धतीनं लावणी सादर करायच्या. कपाळावर ठसठशीत कुंकू, गव्हाळ वर्ण, डोईवरचा पदर ढळू न देता संस्कारक्षम लावणी त्यांनी समाजापुढे आणली. त्यांच्या गायकीची भुरळ ही फक्त भारतीयांनाच नव्हती, तर सिलोन रेडिओ, आकाशवाणी दिल्ली, आकाशवाणी पाकिस्तान यांनाही ती पडली होती. सुलोचना चव्हाण यांना “लावणीसम्राज्ञी’ हा किताब कधी प्राप्त झाला, याचेही कुतूहल सगळ्यांनाच असेल. पण, आचार्य अत्रे यांच्या चित्रपटात त्यांनी एक लावणी सादर केली. त्या लावणीच्या गायनाचा बाज इतर लावणी गायिकांपेक्षा आचार्य अत्रे यांना वेगळा वाटला आणि आपसूकच ‘लावणीसम्राज्ञी’ अशी उपाधी त्यांच्या मुखातून दिली गेली. तेव्हापासून सुलोचना चव्हाण यांना ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब बहाल करण्यात आला. माईंनी गायनातले सर्व प्रकार म्हणजे भाव संगीत, भक्ती संगीत, चित्रपट संगीत आणि लोक संगीत हे सर्व प्रकार हाताळले. मराठी, हिंदी, पंजाबी, गुजराती अशा शेकडो चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले. ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबूडकर, पी. सावळाराम, अशोकजी परांजपे, सी. रामचंद्र अशा ज्येष्ठ संगीतकारांच्या गीतांना आणि लावण्यांना सुलोचनाबाईंनी आवाज दिला. त्यांच्या लावण्या ठसकेबाज असल्या, तरी त्या शालीन होत्या. सुलोचना चव्हाण यांच्या गायकीचा बाज हा पूर्णपणे वेगळा होता. त्यांची ही गायकी भावनाप्रधान होती. त्यात आगळावेगळा ठसका होता. त्या शब्द आणि अर्थाला पूर्ण न्याय द्यायच्या. त्या कलावंत म्हणून तर मोठ्या होत्याच, पण एक दानशूर व्यक्ती म्हणून सुद्धा त्या खूप मोठ्या मनाच्या होत्या. गोर-गरीब, अंध-अपंग, अनाथ अशा मुलांना त्यांनी सढळ हाताने मदत केेली. खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशी चौफेर मुशाफिरी करून त्यांनी गायनाचे कार्यक्रम सादर केले. त्यातून मिळालेल्या बिदागीमधून देणग्या दिल्या. मंदिरे, शाळा उभारणीसाठी मोठ्या मनाने आणि सढळ हाताने मदतही केली. २०१९ मध्ये कोरोना येण्याच्या अगोदर लोणावळ्यात एका अनाथाश्रमाने विजय चव्हाण आणि आमचा एक सांस्कृतिक कार्यक्रम वृद्धाश्रमासाठी आयोजित केला होता. तेथील आयोजकांनी आमच्या हातामध्ये मानधनाची रक्कम दिली. तेव्हा सुलोचना चव्हाण यांनी त्या गोर-गरीब वृद्धांना ही मानधनाची रक्कम बक्षीस म्हणून द्या अशा सूचना आम्हाला केल्या. या महान कलावतीकडे दातृत्वाची आणि दानत्वाची श्रीमंती होती. त्या नेहमी म्हणायच्या की, “एक उत्तम कलावंत होण्यापेक्षा एक माणूस होणं खूप गरजेचं आहे.’ ही मानवतावादाची जाणीव सुलोचना चव्हाण यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. त्यांच्या गायिकीने लोकांचं मनोरंजन तर केलंच पण त्याबरोबर प्रबोधन, उद‌‌्बोधनही केलं. त्यामुळेच त्यांना भारत सरकारने व तमाम महाराष्ट्राच्या जनतेने शाही इतमामात पाच तोफांची सलामी देऊन सन्मानित केलं. सुलोचना चव्हाण या प्रचंड स्वाभिमानी होत्या. त्या स्वतःसाठी कधीच कुणाकडे काही मागण्यासाठी गेल्या नाहीत. त्यांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव केला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. गायकीच्या क्षेत्रात चौफेर मुसाफिर करणारी कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला. सुलोचनाताई शरीराने जरी आपल्यामध्ये नसल्या तरी गोड गळ्यातील सुरांच्या स्मृती कायम आपल्या सोबत राहतील.

संपर्क : ९८२०४५१७१६

प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे

बातम्या आणखी आहेत...