आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:सजग राहा, आनंदी राहा, निरोगी राहा...

टीम मधुरिमा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म न:शक्ती चांगली असण्यासाठी व्यक्तीची सजगता आवश्यक आहे. विशिष्ट काम करत असताना तुम्ही त्या कामामध्ये पूर्ण एकाग्रता साधू शकत नसाल, त्या क्षणांमध्ये पूर्णपणे जगू शकत नसाल, त्या क्षणांचा आनंद घेऊ शकत नसाल तर ते अर्थहीन आहे. कारण जे काम करतोय त्या कामामध्ये त्या क्षणी व्यक्ती पूर्ण उपस्थित नसण्याचा परिणाम थेट तुमच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होत असतो. हा मुद्दा अधिक सविस्तर लक्षात येण्यासाठी व्हिएतनामी गुरू टिक नाथ हान यांचे दोन किस्से सांगितले जातात. समजा तुम्ही स्वयंपाकघरात काम करत आहात. पण, कधीतरी असे होते की, तुम्हाला समोर ठेवलेला मसाल्याचा डबा दिसत नाही किंवा नुकतीच धुऊन चिरलेली भाजी नेमकी कुठे ठेवलीय, हे तुम्हाला अजिबातच आठवत नाही. टिक हान नाथ एकदा आपल्या स्वयंपाकघरात काम करत असलेल्या मोबी नावाच्या शिष्याला भेटायला गेले. मोबी त्यावेळी काहीतरी शोधत असल्याचं टिक यांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला, तू काय शोधतोयस, असं विचारलं. मोबीने उत्तर दिलं की, मी भाजी परतण्यासाठी मोठा चमचा शोधतोय. तेव्हा हान मोबीला म्हणाले, ‘नाही मोबी. तू मोबी शोधतो आहेस..’ या बोधकथेमध्ये मनाच्या एकाग्रतेच्या कमतरतेकडे लक्ष वेधण्यात आलंय. एखादी व्यक्ती आपण करत असलेल्या कामामध्ये पूर्ण लक्ष देत नाही, त्यावेळी ती ते काम एकाग्रतेने करू शकत नाही आणि त्याच्याकडून काही चुका होण्याची किंवा त्याला विस्मरण होण्याची शक्यता अधिक वाढते. हान यांच्या मठात एकदा एक यात्रेकरू आला. त्या यात्रेकरूला हान यांनी भोजनानंतर चहा पिण्यास येण्याचे आमंत्रण दिले. त्या व्यक्तीने हान यांच्या या प्रस्तावाचा स्वीकार केला; पण तिने भोजनानंतरची भांडी स्वच्छ करण्यासाठी मदत करण्याची विनंती हान यांना केली. हान यांनी यात्रेकरूच्या या विनंतीचा स्वीकार करत भांडी धुण्यास मदत करायला होकार दिला. मात्र त्याचवेळी हान त्या यात्रेकरूला म्हणाले की, भांडी स्वच्छ करण्यासाठी भांडी धुणार आहेस की भांडी धुवायची आहेत म्हणून धुणार आहेस? स्वाभाविकपणे त्या यात्रेकरूला हान यांच्या बोलण्याचा काहीही संदर्भ लागला नाही. हान यांच्या लक्षात ही गोष्ट आली. ते त्या यात्रेकरूला म्हणाले, ‘भांडी धुवत असताना, ती धुऊन झाल्यानंतर चहा प्यायचा आहे, याचा विचार करशील तर तुझे मन आधी भांडी धुण्याचं काम संपवण्याकडे आणि नंतर चहा पिण्याकडे सारखं धावत राहील. आणि हेच जर तू भांडी धुण्याच्या कामामध्ये मन पूर्ण एकाग्र केलंस, तर तू त्या क्षणांचा आनंद घेऊ शकशील. भांडी धुण्याचं काम व्यवस्थित करू शकशील. आणि हीच गोष्ट चहा पिण्याच्या बाबतीतदेखील लागू होते. चहा पिताना पूर्ण एकाग्रतेने चहा पिण्याचा आनंद मिळव. पुढे काय करायचं आहे किंवा होणार आहे, याचा विचार करशील तर चहा पिण्याचा आनंद घेऊ शकणार नाहीस. आणि हीच गोष्ट प्रत्येक कामाच्या बाबतीत लागू होते...’ या दोन्ही बोधकथा काय सांगतात? तर त्यांंचे तात्पर्य इतकेच आहे की, कुठलेही काम करायचेच आहे म्हणून करू नका. हातात एक काम करत असाल, तर त्याचवेळी नंतर करावयाच्या कामांचा किंवा करून पूर्ण झालेल्या कामांचा विचार करू नका. म्हणजेच जे काम करत आहात त्या कामाचा, ते करत असतानाच्या प्रत्येक क्षणाचा पूर्ण आनंद घ्या. प्रत्येक क्षण सजग होऊन जगा. आयुष्यात जिवंतपणा, टवटवीतपणा हवा असेल, तर प्रत्येक काम मन लावून करा. मग ते स्वयंपाक करणं असो, घर आवरणं असो, ऑफिसमधले काम असो किंवा बागकाम... जे काम करता त्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता असू द्या. काम करताना त्याचा आनंद घेत ते पूर्ण करा. हान यांनी बोधकथांमधून सांगितलेली गोष्ट सर्वच ठिकाणी लागू होते. स्वत:बद्दल, नातेसंबंधांबद्दल, मित्रपरिवार आणि कामातल्या प्रामाणिकतेलाही हाच नियम लागू होतो. जेव्हा जेव्हा जिथे जिथे असाल, तिथे तिथे त्या भूमिकेला पूर्ण न्याय द्या. सजग राहा. सतर्क राहून वेळोवेळी आपल्या भूमिकेला न्याय द्या. असे केले तरच मानसिकदृष्ट्याही निरोगी आयुष्य जगू शकाल...