आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Still The Floor Looks Allured My Daughter | Article By Dr. Tushar Chandwadkar

‘ती’ची रूपे शोधताना..:अजुनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी

डॉ. तुषार चांदवडकर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गे ल्या महिन्यात शिरपूरला मराठी दिनाच्या निमित्ताने ‘महाकवी कुसुमाग्रज’ या विषयावर व्याख्यान देण्याच्या निमित्ताने गेलो होतो. व्याख्यान आटोपल्यानंतर कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेतील एका ओळीबद्दल एका विद्यार्थिनीने मला प्रश्न विचारला, “सर, या कवितेमध्ये कुसुमाग्रजांनी नदीबद्दल ‘माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली’ अशी उपमा का दिलीय?” तिचा प्रश्न खूप छान होता. कवीकडे येणाऱ्या विद्यार्थ्याच्या घरात नदी मुक्तपणे खेळते, अगदी हैदोस घालते. कुसुमाग्रज तिला माहेरवाशीण पोरीसारखी चपखल ही उपमा देतात‌. मी त्या विद्यार्थिनीला समजावून सांगितले की, “प्रत्येक मुलगी माहेरी अतिशय मुक्तपणे, निरागसपणे आणि स्वच्छंदीपणे वावरते. त्यांच्या या मुक्तपणे जगण्याला सासरी मात्र मर्यादा येतात. कवितेतील विद्यार्थ्याच्या घरात आलेली नदी, मुलगी ज्या पद्धतीने खळाळत वावरते तसेे मुक्तपणे वावरते आहे. म्हणूनच कवीने माहेरी बागडणाऱ्या मुलीची उपमा दिली आहे.’ त्या विद्यार्थिनीला हे एेकून आनंद झाला. माहेरी मुली अतिशय मुक्तपणे वावरत असल्या, तरी कवी शंकर बडे यांच्या शब्दांत बाप हा पोरीला चार समजुतीच्या गोष्टी सांगत असतो... पोरी तो हो रूप कसं जसा कांड्यावर ऊस पाखराच्या गेलं काणी आलं पोटरी कणूस कोणी नाही कोणाचं व जगण्याची गेली चव मुखोट्याचं जग सारं तुले बाई तू वाचावं...

आपली पोरगी वयात आल्यावर समाजाच्या वखवखणाऱ्या नजरा तिच्यावर रोखल्या जातात. तिच्यावर लक्ष ठेवले जाते आणि मग केव्हाही या काचेच्या भांड्याला तडा जाऊ शकतो. साऱ्या जगाने मुखवटा लावलेला असून मुखवट्याआतला चेहरा अतिशय विद्रूप आणि भयानक आहे, त्यामुळे पोरीने कुणावरही विश्वास न ठेवता स्वतःला जपले पाहिजे, असा मोलाचा सल्ला शंकर बडे देतात, तेव्हा वर्तमानकाळातील पोरींची काळजी घेणारा बाप जणू या कवितेतून व्यक्त होतो. आज प्रतिभाताई पाटील किंवा द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या श्रेष्ठ स्त्रिया राष्ट्रपती झाल्या असल्या, तरी आमच्या लेकी खूप सुरक्षित आहेत असं नाही. हुंड्याची प्रथा आज पूर्वीसारखी प्रबळपणे दिसत नसली तरीही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने पोरीचा छळ तिच्या सासरी होतो. आजही सोन्यासारख्या अनेक पोरी पैशांसाठी जिवानिशी मारल्या जातात. सदानंद देशमुख यांच्या कवितेत या सर्व परिस्थितीची दाहकता प्रभावीपणे व्यक्त होते...

लेक टाकली जाळून, बोंब जळाली म्हणून मह्या उदरात आग बाकी उरते जाळून अशी कशी बाई माया माणकाची माती झाली लेक परायाले दिली तिची राख हाती आली! ठरवून एखाद्या लेकीचा संसार उभा करून द्यावा, पण दुर्दैवाने सासरच्या विकृत लोकांमुळे तिचा जीव जावा, अशा घटना आज जशा समोर येत आहेत, तशाच प्रेमात फसलेल्या पोरीदेखील त्यांच्या आयुष्यात संकटांना सामोऱ्या जाताना दिसतात. अशा वेळी रडणाऱ्या मुलींच्या अश्रूंमुळे अस्वस्थ होणारा बाप कवी अशोक कोतवाल यांच्या कवितेतून व्यक्त होतो. हा बाप अतिशय हळवा होतो. माझ्या मुलीही मोठ्या होताना पाहून मन उगीचच अस्वस्थ होऊ लागते. पोरी भर्रकन् मोठ्या होतात, असं जुन्या-जाणत्या बाया म्हणायच्या ते खोटं नाही. अशा वेळी मला संजय चौधरींंची ‘समजूत’ कविता आठवते. या कवितेतील बाप लिहितो, “माझ्या सावलीतले तिचे माझे दिवस भुरुभुरु उडून चालल्याच्या जाणिवेची कसर काळीज कुरतडत राहते माझं. मग तिला झोपी घालताना मी सांगू लागतो एक गोष्ट सासर नसलेल्या जगाची.’ पोरीच्या आयुष्यात पुरुष पहिल्यांदा बापाच्या रूपात येतो. बापाकडून भरभरून प्रेम घेतल्यानंतर पोरींच्या पुरुषाकडे बघण्याच्या अपेक्षा खूप व्यापक आणि उदात्त होत जातात. मोठेपणी सासरी गेल्यावर पतिरूपातल्या पुरुषाने बापाचं प्रेम दिलं तर त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही. मुलगी म्हटली की माझ्या डोळ्यासमोर कवी प्रदीप निफाडकर यांची अल्लड मुलगी येते... गळ्यात माझ्या घास उतरण्या नाही म्हणतो अवतीभवती जेव्हा नसते माझी मुलगी। आठवते मज माझी आई अशीच होती जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी। तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू अजूनी मजला अल्लड दिसते माझी मुलगी...

{संपर्क : ९४२२९४३६५२

बातम्या आणखी आहेत...