आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयुष्य हा खूप छान, भलामोठ्ठा आणि हवाहवासा वाटणारा प्रवास आहे नाही? या प्रवासाचा शीण, थकवा, त्रास, वेदना असल्या तरी त्याचं हवं असणं काही संपत नाही. आणि का संपावं? या प्रवासात किती छान अनुबंध, स्नेहबंध तयार होतात, वेगवेगळ्या नात्यांचे, मैत्रीचे...एरवी आपल्याला कल्पनाही नसते आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींची...त्यांना आपलं असणं, जगणं हे किती मोलाचं वाटतं याचं प्रत्यंतर एखाद्या मोठ्या संकटात किंवा आजारात असताना प्रकर्षाने जाणवतं.
कॅन्सर हा असाच एक आजार. एरवीही परकीयांशी लढण्यापेक्षा स्वकीयांशी लढणं आपल्याला कठीण जातं. कॅन्सरचा सेल आपल्या शरीरात राहणारा असूनही आपल्यावरच हल्ला करतो. पोषक द्रव्यांना खाऊन टाकतो. आणि सरळ मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जातो. म्हणजे टोटल हल्ला बोल नं...? पण खरं सांगू का, तिथपर्यंत जाऊन, नॉक करून आपण पुन्हा परत येऊ शकतो ते केवळ आपले नातेसंबंध, स्नेहबंध, अनुबंध मजबूत असतील तर. हे बंध रक्ताचे आणि ज्यांना रक्ताच्या नात्यात बांधायला विधाता विसरतो अशा मित्र-मैत्रिणींचे असतात. हे नाजूक नसतात बरं...तरल आणि मजबूत असतात. संकटाच्या वेळी आपल्या बाजूने लढायला तयार असतात. कॅन्सरसारख्या स्वकीयांशी लढा द्यायला तर ही कुमक फार साथ देते. आणि खरं सांगू का, ही कुमक असेल तरच आपण कॅन्सरविरुद्धचा लढा जिंकू शकतो. हो, फार मोठा लढा आहे हा..म्हणूनच मी स्वत:ला कॅन्सरचा रुग्ण म्हणत नाही तर कॅन्सर कॉन्कर म्हणते....अहो, एकदा नाही दोनदा जिंकलंय मी हे युद्ध....पण मी एकटीने नाही, मुलांच्या आणि मित्रांच्या भक्कम साथीने. मित्रांची साथ नसती ना तर दुसऱ्यांदा फार कठीण होतं....या आजारात मन आणि शरीर इतकं उसवलं जातं की कशाकशाला ठिगळ लावावं हेच कळत नाही. पण एक धागा असतो स्नेहाचा, अनुबंधाचा आणि तो हे उसवलेलं मन शिवायला खूप मदत करतो आणि मनाने एकदा साथ द्यायला सुरुवात केली की नं शरीर आपोआप त्याच्यापुढे झुकतं आणि तेही आजारावर मात करून जिंकायला लागतं. या युद्धात कुणी-कुणी मला साथ दिली, सोबत केली त्या सगळ्यांचा उल्लेख कदाचित मी इथे करू शकणार नाही. पण पहिल्यांदा झाला तेव्हा या शत्रूचा नायनाट पहिल्या पायरीवरच करता आला कारण आमचे मित्र डॉक्टर आनंद निकाळजे यांच्यामुळे. नुकतीच सुरुवात झाली आणि त्यांना शंका आली. बरं सिगारेट, तंबाखू, गुटखा, दारू इत्यादी कशाचीही सवय नसताना, किंबहुना ते चाखलंही नसताना ओरल कॅन्सर असू शकतो ही शंका असणंच खूप महत्त्वाचं. आपल्या शरीरातल्या सेलने ही फितुरी केल्यावर काय करणार? पती अजित आणि दोन्ही मुलं, सुना, मित्रपरिवाराची साथ असल्यामुळे हे युद्ध खूप लवकर संपुष्टात आलं. अगदी कॅन्सरला भोज्या करून आल्यासारखं...कारण तेव्हा किमो, रेडिएशन काहीच लागलं नाही. पुन्हा नोकरीत रुजू झाल्यामुळे सामान्य आयुष्य मी जगायला लागले. पण पहिल्या युद्धात काहीतरी राहतं म्हणा किंवा दुसऱ्या युद्धाची ती नांदी असते म्हणा, एवढं नक्की की दुसरं युद्ध माझ्यासमोर उभं राहिलं. मी कुठेतरी वाचलंय बरं का की आपलं शरीर सिग्नल्स देत राहतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर हे फितूर झालेले सेल पुन्हा तोंड वर करून तोंडातच जमा झाले आणि दुसऱ्या महायुद्धाला तोंड द्यायची माझ्यावर वेळ आली. प्राध्यापकी करताना बऱ्याच सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींशी संबंध असल्यामुळे खूप मित्र झालेत. खूप ओळखीही वाढल्या. बायोप्सीनंतर रिकरन्स आहे हे कळल्याबरोबर कुठे सर्जरी करायची यावर चर्चा सुरू झाली. यादरम्यान डॉ. शशी अहंकारी भेटले. त्यांनी बोलता बोलता मुंबईच्या टाटा रुग्णालयातील डॉ. कैलाशनाथ शर्मा यांचं नाव सांगितलं. लगेच अॅड. बोपशेट्टींनी त्यांना फोन लावून त्यांची भेट निश्चित केली. त्यांना भेटलो. त्यांनी सर्व प्रकारची मदत करण्याचं नुसतं आश्वासनच दिलं नाही तर लगेच टाटामधील हेड अँड नेकचे ऑन्कोसर्जन डॉ. देवेंद्र चौकारांना माझी केस दिली. डॉ. चौकार अतिशय हुशार तज्ज्ञ आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे डॉक्टर. खूप धीर द्यायचे. या सर्जरीत ऑन्कोबरोबर प्लास्टिक सर्जनचं तितकंच काम असतं. त्यासाठी टाटाच्याच तज्ज्ञ डॉ. प्रभा यादव यांना डॉ. शर्मांनी सांगितलं. टाटामध्ये कॅन्सरच्या रुग्णांचा महापूर बघता ११ मे २०१७ ला माझी सर्जरी झाली. त्यातही मोठा योगायोग म्हणजे भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. विजया पाटील त्या वेळी तिथे उपस्थित होत्या. त्यांना मी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादला भेटले होते. ओटीमध्ये शुद्धीवर असेपर्यंत एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा हात हातात असणं किती जीवनदायी असतं हे मी शब्दांत नाही सांगू शकणार...दहा-बारा तास सर्जरी चालली. शुद्धीवर आले तेव्हा प्रचंड वेदनांमुळे कळलं की मी जिवंत आहे म्हणून...त्या वेळी तीन-चार नळ्या, सलाइन असा साज होता शरीरारवर. संपूर्ण शरीरात वेदना होत्या. जगणं आणि मृत्यू याच्यातील एकमेव सत्य वेदनाच आहे हे पटलं. या काळात डॉ. क्रांती व डॉ.माधुरी रायमानेंची खूप मदत झाली. ते आणि माझी दोन मुलं तन्मय आणि तेजस वेदना कमी करण्यासाठी करता येईल ते करायचे. हळूहळू बाकीच्या नळ्या निघाल्या. फक्त नाकामधील फीडिंगसाठीची नळी होती. उसवलेलं शरीर अजून जुळलं नव्हतं. जखमा होत्या. पण मुलांच्या व मित्रमंडळींच्या प्रेमामुळे मन सांधण्याचा प्रयत्न करत होते. आत्ता कुठे एक अंक संपला होता. पुढचा मोठा अंक क्लायमॅक्ससह शिल्लक होता. तो म्हणजे रेडिएशन्सचा. त्याचा त्रास व साइड इफेक्ट्स तर अवर्णनीय होते. तेव्हा मात्र वाटलं की आता मी नाही जगत. पण या वेळेसही डॉ. वेदा पुरंदरेसारखी अतिशय हुशार व प्रेमळ डॉक्टर मिळाली. तिने खूप धीर दिला. रेडिएशनमुळे चेहरा काळा पडला होता. वाईट वाटायचं. एक डॉक्टर म्हणाले, मॅडम, हे एका स्वप्नासारखं समजा. तुमचे उपचार पूर्ण झाले की तुम्ही काही काळानंतर सामान्य आयुष्य जगायला लागाल. तुम्ही सकारात्मक विचार करणाऱ्या आहात. मी फॉलोअपला गेल्यावर माझ्या प्लास्टिक सर्जनही म्हणाल्या होत्या, तुमच्यासारखे पॉझिटिव्हिटी असणारे रुग्ण असले की आमच्या मेहनतीचं चीज होतं. आता तुम्ही पहिल्यासारख्या स्टेज अॅक्टिव्हिटी करा आणि व्हिडिओ आम्हाला पाठवा. मी म्हटलं, या फक्त उसवलेल्या शरीराचं रिकन्स्ट्रक्शन नाही करत तर मनाचंही करतात. मी विचार करू लागले, कुठून येते माणसामध्ये ही पॉझिटिव्हिटी? तर याचं उत्तर होतं, या काळात मुलांची, अजितची, नातलगांची साथ तर आहेच; पण या रक्ताच्या नात्यांपलीकडील इतर अनेक मित्र-मैत्रिणींची जी साथ मिळाली, त्यामुळे ती सकारात्मकता माझ्यात आली, हे वेदनावर्त संपलं आणि २०१८ च्या सुरुवातीलाच बालभारतीच्या हिंदी मॅडमनी नवीन कार्यकारिणीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याबद्दल कळवलं. तो भरला आणि ट्रेनिंगनंतर भाषा समितीची सदस्य म्हणून मी नियुक्त झाले. अकरावी-बारावीच्या हिंदी पुस्तकावर काम करताना सगळ्यांबरोबर तीन-चार वर्षे कशी निघून गेली हे कळलंच नाही. ऑफिसला गेले, सात-आठ तास काम केलं, खूप मित्रमैत्रिणी जमवल्या, छान पुस्तकं वाचली, कोरोनाकाळातही ऑनलाइन काम केलं. आजकाल पुण्यात अधिक वास्तव्य असतं. त्यामुळे बालभारतीमधून फोन आला की तिथे जाते. पुस्तकाची प्रक्रिया बारकाईने समजून घेतली. हे काम म्हणजे कॅन्सरनंतरचं फार मोठं टॉनिक ठरलं. मला असं वाटतं की प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. पण त्यावर वेळीच उपचार घेऊन सकारात्मक विचाराने पुढे गेलो तर मलाच का? हा प्रश्न न विचारता आहे त्या परिस्थितीशी लढण्याचं ठरवलं तर इतरही आपोआप मदत करतात. माझ्याभोवतीचे स्नेहबंधांचे हे जाळे इतके मजबूत होते की विधात्यालाही त्यातून बाहेर नाही काढता आलं. या ऋणानुबंधात श्वास आहे तोवर राहण्यात आनंद आहे. मंगेश पाडगावकारांनी म्हटल्याप्रमाणे, नाती जपण्यात मजा आहे, बंध आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे...
अनुया दळवी {संपर्क : 9822975585
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.