आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्षवेधी:जिद्दी जासिया

टीम मधुरिमा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरुष क्रिकेटचे सामने, विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा कायम चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांत तर कसोटी आणि वन डेपेक्षाही अधिक लोकप्रिय होताहेत ते टी-२० आणि प्रीमियर लीगचे सामने. सामन्यांशिवाय पुरुष क्रिकेटविश्वाच्या आणखी एका गोष्टीची कायम चर्चा होते आणि ती म्हणजे या खेळाडूंसाठी मोजली जाणारी रक्कम. मात्र, यंदापासून वुमेन्स प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) सुरुवात करण्यात आली आहे. ही महिला क्रिकेटविश्वासाठी आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल.

पहिलीवहिली वुमेन्स प्रीमियर लीग आणखी एका महत्त्वाच्या कारणासाठी चर्चेत आहे आणि ते म्हणजे काश्मिरी गर्ल जासिया अख्तर. दिल्ली कॅपिटल्स संघाने जासियाला वीस लाख रुपयांच्या आधार मूल्यावर संघात घेतले आहे. जम्मू-काश्मीरमधून वुमेन्स प्रीमियर लीग खेळणारी जासिया ही पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. समस्त महिला वर्गासाठी ही अभिमानाची बाब असली, तरी जासियाचा ‘डब्ल्यूपीएल’पर्यंतचा प्रवास खूप मेहनत, कष्ट आणि संघर्षाचा राहिलेला आहे.

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात असलेले बरारी पोरा हे जासियाचं मूळ गाव. या गावातच मुलांसोबत क्रिकेट खेळत खेळत तिने वयाच्या आठव्या वर्षी या खेळातील वाटचालीची सुरुवात केली. २००३ ते २००६ या काळात जम्मू-काश्मीर संघासाठी अंडर-१३, अंडर-१४, अंडर-१५ आणि अंडर-१६ अशा विविध गटांमध्ये ती क्रिकेट खेळली. या दरम्यानही तिला अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. २००७ ते २०११ या काळात वाईट आर्थिक परिस्थितीमुळे जासियाला क्रिकेटपासून दूर राहावे लागले. मात्र, २०१२ मध्ये कमबॅक केल्यानंतर वर्षभर ती जम्मू-काश्मीरसाठी खेळली. या दरम्यान अनेक गैरसोयींना तिला सामोरं जावं लागल्यामुळे जासिया पंजाब क्रिकेट असोसिएशन, राजस्थान संघाकडूनही खेळली आहे.

दक्षिण काश्मीरचा शोपियां हा भाग कायम दहशतवादी हल्ल्यांमुळेे चर्चेत असतो. २००६-२००७ मध्ये जासियाला दहशतवाद्यांनी घरात घुसून मारहाण केली. क्रिकेट न खेळण्याची धमकी दिली. पण, जिद्द, इच्छाशक्ती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे जासिया पुन्हा मैदानावर परतली आहे. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्टी ही आहे की, ज्या कुटुंबाने जासियाला हिंमत दिली, पाठिंबा दिला, त्या कुटुंबाला क्रिकेटची कुठलीही पार्श्वभूमी नाही. जासियाचे वडील सफरचंद विक्रेते आहेत, तर आई गृहिणी आहे. मैदानावर चांगली कामगिरी करून काश्मीरमधल्या मुलींसाठी क्रिकेट अकादमी सुरू करण्याचं जासियाचं स्वप्न आहे. ‘डब्ल्यूपीएल’मुळं तिच्या या स्वप्नाला पंख फुटतील, यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...