आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय शोधनिबंध, १३ पुस्तकांचं लेखन, प्राध्यापक म्हणून राबवलेले विविध उपक्रम, सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिव्यांगांसाठीची विविध कामं....खरं तर हे माझं रोजचं रुटीन...मात्र याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आणि माझ्या जिद्दीचं सार्थक झालं...
आ पण आपली रोजची कामं करताना त्याचे आपल्याला काहीतरी कुठूनतरी फळ मिळावे म्हणून कधीच करत नसतो, पण जेव्हा त्या कामांची कुठेतरी दखल घेतली जाते आणि तेही कुठेतरी नव्हे, तर आपल्या राष्ट्रातल्या अगदी सर्वोच्च स्तरावरून ती दखल घेतली जाते तेव्हा मात्र रोजच्या कामांमध्ये आपण आणलेला वेगळेपणा किती ठसठशीत आहे याची कोणाला तरी तर जाण आहे याचे एक समाधान मिळत असते. आणि या समाधानाची या वेगळ्या पद्धतीने केलेल्या कामांसाठीच्या ऊर्जेची, जिद्दीची गुढी उभारली गेली ती अगदी लहानपणापासूनच. ती उभारली माझ्या आई-बाबांनी. माझ्यावर प्रभाव असणाऱ्या माझ्या आजीने आणि वैवाहिक आयुष्यात माझ्यासोबत ठामपणे उभ्या राहिलेल्या माझ्या नवऱ्याने. कोणत्याही गोष्टीला ‘नाही’ म्हणायचं नाही आणि कोणत्याही कामातून ‘मला काय मिळणार?’ हा विचार न करता ते करत राहायचे ही जिद्द माझ्या आई-वडिलांनी माझ्यात रुजवली. पावलापावलावर या जिद्दीची मुळं पक्की होत गेली. आणि ही जिद्द मला थेट राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत घेऊन जाईल याची मी कधी कल्पना किंवा अपेक्षादेखील केली नव्हती. प्राध्यापक म्हणून काम करताना खरे तर संशोधन व विस्तार हा अध्यापनाचा एक भाग. शोधनिबंध लिहिणे व प्रकाशित करणे, शोधनिबंध सभा-संमेलनांमधून सादर करणे किंवा पुस्तके प्रकाशित करणे हा अध्यापकीय कामाचाच एक भाग. शोधनिबंध आणि संशोधन प्रकल्पांमध्ये मी महिला, दिव्यांग व्यक्ती यांच्याविषयीची किंवा अत्यंत वैविध्यपूर्ण विषयांची अनेक क्षेत्रे हाताळली. वृत्तपत्रीय, नियतकालिक किंवा संशोधन लेख या सगळ्याच साहित्य प्रकारांमध्येदेखील नेहमीच अत्यंत वेगवेगळे विषय हाताळण्याचा मी सतत प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून त्या विषयाचा प्रसार आणि विस्तार करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील सभा, संमेलन, परिषदामध्ये निबंधवाचन किंवा साधन व्यक्ती म्हणून काम करत असताना कॅलिफोर्निया, थायलंड, हाँगकाँग या राष्ट्रांमध्ये जाऊन निबंधवाचन करण्यापासून ते अगदी थेट संयुक्त राष्ट्राच्या मानवीय सेवा या शाखेपर्यंत माझी तज्ज्ञ मते नोंदवण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने देणे आणि कार्यक्रमांची निवेदने हा तर माझा छंदच. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, आकाशवाणी दूरदर्शन वरच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन, महिला सक्षमीकरण, दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण या विषयांबरोबरच क्षमता बांधणी, तणाव व्यवस्थापनापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर व्याख्याने देत असताना ती संपूर्ण साधार आणि अभ्यासपूर्ण देण्यावरच माझा नेहमी भर असतो.
मी माझ्या अध्यापकीय कारकीर्दीमध्ये ग्रामसभा जागरूकता अभियान यासारखे अनोखे प्रयोग यशस्वी केले. अध्यापनामध्ये संशोधन आणि विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून जी कामे करता येतील ती सगळीच मी केेली.
अध्यापनाचे क्षेत्र माणसाला सतत अभ्यासात ठेवणारे, प्रसन्न ठेवणारे असते. आजच्या तरुण पिढीमध्ये कौटुंबिक दरी, डिजिटलायझेशनमुळे भावनिक दुरावा आणि अक्षमता असे प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वावरताना त्यांच्या या प्रश्नांनी मला सामाजिक काम करण्याची प्रेरणा दिली. विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांग किंवा साधारण मुलींसाठी कळत-नकळतपणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केलेले कार्य किंवा सहकार्य मी तर तसे कधी नोंदवून ठेवले नाही, पण ते कुठेतरी नोंदले गेले हे या पुरस्काराने मला प्रकर्षाने लक्षात आले.
मी एका हाताने कधीच चारचाकी गाडी चालवू शकेन हा विचारही केला नव्हता, पण माझे पती दत्ता महाजन, मुलगा मल्हार आणि बहीण राजश्री पोहेकर यांच्या प्रोत्साहनाने प्रयत्न करून पाहिला आणि ते जमलेदेखील. वाहन परवाना मिळवताना बराच संघर्ष करावा लागला, पण मी चिकाटी सोडली नाही. शेवटी अधिकृतपणे चारचाकी हातात घेतली. हे सगळे करताना कौटुंबिक जबाबदाऱ्यादेखील यशस्वीपणे पार पाडल्या. घरातली रोजची छोटी-छोटी कामं करण्यापासून ते सणावाराची पुरणपोळी करण्यापर्यंत कोणत्याही कामांमध्ये मी मागे राहिले नाही. या सांसारिक जबाबदाऱ्या पेलण्याची जिद्द माझ्यात जागवली ती माझ्या आजीने.
या पुरस्काराने माझ्या जबाबदाऱ्या अधिक वाढल्यात हे नक्की. कारण त्यानंतर मला अनेक फोन आले किंवा अनेक व्यक्ती अशा भेटल्या की, ज्यांनी माझ्याकडून या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या अपेक्षांच्या कसोटीवरही पूर्णपणे खरी उतरण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
प्रीती पोहेकर संपर्क : ८३२९३३८७२५
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.