आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतवचने आणि वर्तमान:आत्मघात हा शिवद्रोहच!

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कारण कोणतेही असो, आत्महत्या शरणांनी धिक्कारली आहे. आत्महत्या घोर शिवद्रोह असल्याचे शरणांनी प्रतिपादले आहे. जन्मलेला प्रत्येक जीव हा ईश्वरीय अंश आहे. त्यामुळे मृत्यू येण्यापूर्वी स्वत:हून मरणास कवटाळणे त्याज्य मानले आहे.

मान-अपमान आणि कीर्ती-अपकीर्तीच्या पलीकडे समाजधुरिणांची दृष्टी असावी, असा आग्रह महात्मा बसवण्णा आणि शरणांनी धरला. तुम्हाला समाजाकडून केवळ गौरवच अपेक्षित आहे काय? तुमच्यावर केलेली टीका अथवा आरोपांना आत्मघाताच्या मार्गाने मिळणारे उत्तर शरणांच्या विचारांचा, वचन सिद्धांतांचा द्रोह आहे. याबाबत अक्कमहादेवी यांचे वचन समाजातील प्रत्येकाला आचारमार्ग दाखवणारे आहे.

का ही दिवसांपूर्वी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली शिक्षा भोगणाऱ्या आसारामबापूंची सुटका व्हावी या मागणीसाठी पुण्यात झालेल्या आंदोलनाची चर्चा होत असताना कर्नाटकातील चित्रदुर्गच्या महाराजास पोक्सो कायद्यांतर्गत अटकेच्या बातमीने कर्नाटक आणि महाराष्ट्रसह देशात खळबळ उडवली. आरोपी महाराज यांच्यासह इतर काही मठाधीशांबद्दल आक्षेपार्ह संवाद असलेली मोबाइल ऑडिओ व्हायरल झाल्याने त्यात नाव असलेल्या एका महाराजांनी मरण कवटाळले. महात्मा बसवण्णा आणि शरणांचा वारसा सांगणाऱ्या, धर्म प्रसारक म्हणून घेणाऱ्या महाराजांनी आत्मघाताचा मार्ग स्वीकारणे अधिक चिंताजनक आहे. कारण कोणतेही असो, आत्महत्येला शरणांनी धिक्कारले आहे. आत्महत्या घोर शिवद्रोह असल्याचे शरणांनी प्रतिपादले आहे. जन्मलेला प्रत्येक जीव हा ईश्वरीय अंश आहे. त्यामुळे मृत्यू आल्यानंतरच मरणे शरणांना मान्य आहे. स्वत:हून मरणास कवटाळणे त्याज्य मानले आहे. त्याचा निषेधच केलाय.

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ येथे मडिवाळेश्वर मठाचा इतिहास मोठा आहे. या मठावर चित्रदुर्ग मुरूघा मठात शिक्षण पूर्ण केलेल्या बसवसिद्धलिंग महाराजांची नियुक्ती झाली होती. भक्तांमध्ये मिसळणारे, शांत स्वभावाचे, संवेदनशील मनाचे महाराज म्हणून बसवसिद्ध लिंग स्वामींची ओळख होती. चित्रदुर्ग मुरूघा महाराजांवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे आरोप आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. त्यांनतर त्यांना अटकही झाली. या पार्श्वभूमीवर दोन महिलांमधील मोबाइल संवाद व्हायरल झाला. या संवादात अनेक मठाधिपती आणि महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे. यामध्ये बसवसिद्धलिंग महाराजांचेही नाव होते. व्हायरल ऑडिओनंतर आपल्या नावाला काळिमा लागल्याची खंत व्यक्त करत महाराजांनी आपल्या रूममध्ये गळफास घेऊन इहलोकाची यात्रा संपवली. त्यांच्या मृत्यूसोबतच त्यांचे निर्दोषत्वही मातीत मिसळून गेले.

धर्मप्रसार करणारी महाराज मंडळी खुद बदनामीचा धसका घेऊन आत्मघातासारखा टोकाचा मार्ग स्वीकारत असतील तर त्यांच्याकडून समाजप्रबोधनाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मान-अपमान आणि कीर्ती-अपकीर्तीच्या पलीकडे समाजधुरिणांची दृष्टी असावी असा आग्रह महात्मा बसवण्णा आणि शरणांनी धरला. तुम्हाला समाजाकडून केवळ गौरवच अपेक्षित आहे काय? तुमच्यावर केलेली टीका अथवा आरोपांना आत्मघाताच्या मार्गाने मिळणारे उत्तर शरणांच्या विचारांचा, वचन सिद्धांतांचा द्रोह आहे. याबाबत अक्क महादेवी यांचे वचन समाजातील प्रत्येकाला आचारमार्ग दाखवणारे आहे. त्या म्हणतात... घर केले जर डोंगरावरती, बाळगावी का पशूंची भीती ? घर केले जर सागरतटी, बाळगावी का लाटांची भीती ? घर केले जर भर मंडईत, कोलाहलाने का व्हावे लज्जित? ऐकावे चेन्नमल्लिकार्जुना

आपण या जगात आलोय म्हणजे कुणी निंदा करू दे वा स्तुती मनात राग धरू नये, चित्ती असो द्यावे समाधान. कोणी कौतुक करेल, सत्कार करेल, तर कोणी निंदानालस्ती करेल, आरोप करेल, प्रसंगी बदनाम करेल, त्यांचा राग न धरता चालत राहावे. दैनंदिन कामात स्वत:ला गुुंतवून ठेवावे. मान आणि अपमानाकडे पाठ वळवून चालत राहण्याचा संदेश अक्क महादेवी यांनी दिलाय. कौतुकाने हुरळून जाऊ नये. त्याच वेळी बदनामीमुळे नाउमेद होऊ नये. असा आग्रह संत-शरणांनी धरलाय. याबाबत एलेश्वर केतय्या आपल्या वचनांत, व्रत चुकले म्हणून शस्त्र, समाधी, पाणी, दोरी अथवा इतर विषारी औषधाने आत्महत्या करावी काय? व्रत चुकले म्हणून आपण नष्ट व्हावे काय, असा सवाल करतात. व्रतहीनतेचा आरोप झाल्यानंतर आपण नष्ट झाल्याने उलट आरोपांनाच बळकटी मिळत असल्याची भीती एलेश्वर केतय्या व्यक्त करतात. सर्वसामान्य माणसांचे जाऊ दे, धर्माचार्य -आध्यात्मिक गुरू म्हणून घेणाऱ्यांनी, समाजधुरीण म्हणून मिरवणाऱ्यांनी मान-अपमानाच्या पलीकडे स्थितप्रज्ञ असावे अशी अपेक्षा संतश्रेष्ठ नामदेवरायांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, निंदील हे जन सुखें निंदू द्यावें । सज्जनी क्षोभावें नये बापा ॥ जगाने कितीही निंदा केली तरी त्याला सुखाने निंदा करू द्यावी. सज्जनांनी मात्र रागावू नये. निंदा आणि स्तुती ज्याला समान झाली त्याची स्थिती ही समाधी अवस्थेप्रमाणे असते. शत्रू आणि मित्र ज्याला समान वाटले, त्या दोघांकडेही समानतेने ज्याने पाहिले तोच देवाला आवडतो. भक्त तोच, ज्याला निंदा केल्याने राग येत नाही किंवा कौतुक केल्याने आनंद होत नाही. भक्त तोच, जो सुखाने हुरळून जात नाही किंवा दुःखाने खचून जात नाही असे नामदेवराय सांगतात. हाच संदेश गीतेच्या चौदाव्या अध्यायात दिला आहे.

मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः । सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते ॥ जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो त्याला गुणातीत म्हणतात. मानवी जीवनशैली कशी असावी याबद्दल शरणांचे चिंतन स्पष्ट आहे. जमेल तितके चांगले वागावे, मनाला न पटणारे टाळावे, आजारी पडल्यास कण्वावे, दुखत- खुपत असल्यास ओरडावे, जीव गेल्यास मरावे, अशा स्वरूपात जीवनाचे सार लद्देय सोमण्णा या शरणांनी आपल्या एकमेव वचनांत सांगितले आहे. दुसरीकडे... भयभीत न होता रहा रे मना, माघार न घेता रहा रे मना, निर्धार न सोडता रहा रे मना. हिणविले अथवा भेदरविले म्हणून शस्त्र, समाधी, जल, दोर, विष, औषधी आदींद्वारे देहत्याग करणारे कर्मीजन सातही जन्मात डुकराच्या पोटी जन्मतील असा सज्जड इशारा श्रेष्ठ शरणी अमुगे रायम्मा यांनी दिला आहे. कोणत्याही कारणाने आत्महत्या करणाऱ्याला अमुगे रायम्मा यांनी अत्यंत कठोर शब्दांत सुनावले आहे. ईश्वराने दिलेला श्वास त्याच्या इच्छेनुसार तो परत घेईल. ते कुणालाच चुकलेलं नाही. तो त्याचे काम करेल आपण आपले काम करत राहावे. त्याचा निरोप आला की हातातील काम सोडून निघून जावे, असा मार्ग शरणांनी सांगितलाय. त्यासाठी आत्मघाताचा मार्ग निषेधार्हच मानलाय.

चन्नवीर भद्रेश्वरमठ संपर्क : channavir@gmail.com

बातम्या आणखी आहेत...