आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • Taking Medicines Without A Prescription Is An Invitation To Illness | Article By Team Madurima

आरोग्य:प्रीस्क्रिप्शनशिवाय औषधं घेणं म्हणजे आजाराला आमंत्रण

टीम मधुरिमा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सा मान्य लोकांमध्ये अँटिबायोटिक्सची एक अत्यंत प्रभावी औषधं म्हणून प्रतिमा आहे. त्यांचे गुणही आहेत. परंतु, अशी औषधं जेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जातात, तेव्हा त्यांचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. अँटिबायोटिक्स ही अशी औषधं आहेत, जी जीवाणूंशी (बॅक्टेरिया) लढतात, त्यांचा नाश करतात आणि आजारी व्यक्तीला जीवाणूजन्य आजारांपासून वाचवतात. मूत्रमार्गाचा संसर्ग, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, न्यूमोनिया आणि टायफॉइड यांसारख्या आजारांचे कारण जीवाणू असेल, तर ही औषधे प्रभावी ठरतात. याशिवाय, बुरशीजन्य संसर्गापासून वाचवण्यासाठीही ती मदत करतात. डॉक्टर ही औषधे देतात...

काही जीवाणूजन्य रोगांपासून अँटिबायोटिक्स न घेता रुग्ण मुक्त होऊ शकत नाही. जसे की टायफॉइड (विषमज्वर). या आजाराच्या रुग्णावर वेळेत उपचार न केल्यास तो इतर व्यक्तींनाही संक्रमित करू शकतो किंवा नजीकच्या भविष्यात त्याची स्वतःची स्थिती बिघडू शकते. अशा रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते किंवा विविध शारीरिक कारणांमुळे, त्याला संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तथापि, विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांंवर अँटिबायोटिक्स सामान्यतः प्रभावी ठरत नाहीत. फ्लू, स्वाइन फ्लू आणि विविध प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन जसे की नागीण, झोस्टर, सर्दी-खोकला आणि विषाणूजन्य ताप आदी वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. प्रिस्क्रिप्शन का गरजेचे आहे? अँटिबायोटिक्स योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. आपण ती औषधं किती प्रमाणात घ्यावीत आणि त्याच्या सेवानापूर्वी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या चाचण्यांची गरज आहे किंवा नाही, हेदेखील डॉक्टरच ठरवतात.

अँटिबायोटिक्स ओव्हर-द-काउंटर म्हणजे आपल्या इच्छेनुसार, थेट मेडिकल दुकानातूून घेऊन त्यांचे सेवन करू नये. कारण या औषधांचा एक कोर्स असतो, जो रुग्णाची स्थिती, त्याचे वय इत्यादी आणि तपासल्यानंतर डॉक्टर ठरवत असतात. आता एखादे औषध तीन दिवस द्यायचे, पाच दिवस, एक आठवडा द्याचे की १० दिवस, हे डॉक्टर ठरवतात आणि हे काम तेच करू शकतात. किंबहुना, योग्य डोस न घेतल्यास तो आजार पुन्हा उद‌्भवतो. दुसरीकडे, अँटिबायोटिक्स डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त काळ घेतल्यास, ते यकृत आणि मूत्रपिंडांवरदेखील प्रतिकूल परिणाम करू शकतात. जे लोक ही औषधं स्वैरपणे किंवा कुणाच्या तरी सल्ल्याने वा स्वत:जवळच्या जुन्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारे घेतात, त्यांना मळमळ, पोटदुखी, पेटके, अतिसार, अॅलर्जी किंवा इतर समस्या होऊ शकतात.

परिणाम न होण्याचा धोका अँटिबायोटिक्सच्या अतिसेवनामुळे रुग्णांमधील जीवाणू नष्ट करण्याची क्षमता नाहीशी होते. आणखी एक कारण म्हणजे, ही औषधे जास्त प्रमाणात घेतल्यास शरीराला त्यांची सवय लागते. या कारणास्तव, अशा औषधांचा जीवाणूंवर अपेक्षित परिणाम होत नाही आणि दुसरीकडे जीवाणू हळूहळू अशा औषधांचा परिणाम निष्फळ ठरवतात. या स्थितीला वैद्यकीय भाषेत अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स म्हणतात. यामुळे एक साधा संसर्गदेखील प्राणघातक ठरू शकतो. कारण नंतर औषधेदेखील काम करत नाहीत. रुग्णाने डॉक्टरांनी सांगितलेला अँटिबायोटिक कोर्स पूर्ण केला नाही आणि थोडा आराम मिळाल्यावर औषध अर्धवट सोडले, तर अँटिबायोटिक रेझिस्टंटचा धोका वाढतो.

तुम्हीच डॉक्टरांना सांगा काही अँटिबायोटिक्स गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी योग्य नसतात. म्हणूनच अशा महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटिबायोटिकचे सेवन करू नये, कारण त्यामुळे त्यांचे आणि बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याशिवाय, गर्भनिरोधक गोळ्या घेत असलेल्या महिलांनीही डॉक्टरांना याबद्दल सांगावे. अशी काही अँटिबायोटिक औषधं आहेत जी गैर-अँटिबायोटिक औषधांसह एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रिअॅक्शन निर्माण करू शकतात. म्हणून, आपण आधीच घेत असलेल्या औषधांबद्दल आपल्या डॉक्टरांना सांगा. जेव्हा औषधं घ्यायला

कधी कधी वेळेवर अँटिबायोटिक घ्यायचे लक्षात राहत नाही. डोस घेण्यास एक किंवा दोन तासांचा उशीर झाला असेल, तर आठवण येताच औषध घ्या. आणि दुसरा डोस जवळपास १० तासानंतरच घ्या. सामान्यत: डॉक्टर अँटिबायोटिकचा दुसरा डोस १० ते १२ तासांच्या अंतराने घेण्याचा सल्ला देतात.

अनेकदा लोक अँटिबायोटिक्सचा पहिला डोस घेणे विसरतात आणि जेव्हा दुसऱ्या डोसची वेळ येते तेव्हा ते नकळत दोन्ही एकाच वेळी घेतात. यामुळे शरीराला अनेक धोके निर्माण होऊ शकतात. जर एक डोस चुकला असेल, तर तो सोडून द्या आणि नियोजित वेळी दुसरा डोस घ्या. परंतु, एका वेळी दुप्पट डोस कधीही घेऊ नका.

बातम्या आणखी आहेत...