आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समकाल:सामाजिक चारित्र्याची अभिरुची

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओं जळभर पाण्यासाठी सागरात उतरावं, पण हाती थेंबही लागू नये. जगण्याच्या धबडग्यात मूल्ययुक्त काही हाती लागलं आहे, असं वाटतं तोवर ते निसटून जावं. ध्यास घेऊन जिवापाड काही जपावं आणि अचानक त्याचा कोळसा व्हावा, अशी आजच्या काळाची अवस्था आहे. याचा वेग माणसांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यातून त्याच्या जगण्यात गोंधळ निर्माण झाला आहे. जगण्याची रीत म्हणजे अभिरुची. ती व्यक्तिगत, सामाजिक अशी दोन प्रकारची असते. व्यक्तिगत अभिरुची माणसाच्या खासगी आयुष्याला घेरून टाकते. सामाजिक अभिरुची सार्वजनिक जीवन ढवळून काढते. कोणत्याही अभिरुचीला सामाजिक पर्यावरणासह स्थळ - काळाचा, संस्कृती आणि धर्माचा संदर्भ असतो. व्यक्तीच्या- समूहाच्या वर्तनातून समाजाची अभिरुची घडत असते. अभिरुची ही उघडपणे शरीराशी आणि प्रत्यक्ष दैनंदिन वर्तनाशी बांधलेली असल्याने तिच्याविषयीचे खूप टॅब्यूज तथाकथित संस्कृतिरक्षकांनी निर्माण केले आहेत. भारताला प्रत्यक्ष आचरणात सर्वधर्मभाव आणि कायद्यात धर्मनिरपेक्षता देणारं संविधान आहे, याचं भान अलीकडं हरवत चाललं आहे. नृत्यांगना गौतमी पाटीलचा चोरून व्हिडिओ तयार करून, ज्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला, त्या कृतीपेक्षा भयंकर विचित्र प्रतिक्रिया समाज माध्यमांत उमटल्या. एकीकडं खुलेआम उपलब्ध असलेलं उघडं-वाघडं जग मिटक्या मारत पाहिलं जात असताना दुसरीकडं गौतमी पाटीलनं अख्खा महाराष्ट्र रसातळाला नेला, अशी विकृत पातळी गाठणारी चर्चा माध्यमे आणि समाज माध्यमांत सुरू आहे. ती होण्याचं कारण आपल्या सार्वजनिक चारित्र्याच्या संकल्पनेत दडलं आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना स्नेहार्द्र आलिंगन देणाऱ्या स्त्रियांच्या बाबतही असेच प्रश्न विचारले होते. आजच्या तंत्रज्ञानानं, माहितीच्या स्फोटानं मानवाचा संकोच करीत, त्याचा विचार करण्याच्या, ‘विश्रांतीच्या काळा’ची जणू हत्या केली आहे. सामाजिक नीतिमत्ता नावाची वीट, जी सामान्य माणसाच्या जगण्याची प्रेरणाधार होती, तीच पायाखालून काढली आहे. त्यामुळं वारीच्या मेळासह विठ्ठल चंद्रभागेच्या वाळवंटात सैरभैर हिंडतो आहे. आपलं झाकून दुसऱ्याचं वाकून पाहायला शिकवलं जातंय. मेंदू आभासी धुंदीत राहील, यावर लक्ष दिलं जातंय. यातून ना धर्म सुटला ना राजकारण. पूर्वी राजकीय पक्ष आपल्या सामाजिक चारित्र्याची किमान काही काळजी घेत होते. नव्वदनंतर मात्र हे चित्र झपाट्यानं बदललं. सगळ्याच पक्षात, आम्हीच कसे धार्मिक आणि कट्टर आहोत, हे दर्शवण्याची एक स्पर्धा लागली आहे. त्यात फक्त डावं - उजवं करता येईल, इतकाच काय तो फरक राहिला आहे. सामान्यांचा आर्थिक, सामाजिक मागासलेपणाचा अभाव भरून काढण्याचं सामाजिक चारित्र्य नावाचं अभिरुचीचं हत्यारही या काळानं हातातून हिसकावून घेतल्यानं, आयुष्यातील समाधानाची बाब म्हणजे केवळ भौतिक समृद्धी, असंच त्याला वाटायला लावलं जात आहे. समाज माध्यम उपलब्ध करून दिलं, पण ते कसं हाताळावं हे न कळल्यानं आणि त्याची सामाजिक अभिरुची धोक्यात आल्यानं, तो हिंसक होतो आहे. नातं, नैतिकता, सामाजिकता यांच्याशी - उच्चभ्रू समाजासारखं - त्यालाही काही देणं-घेणं राहिलं नाही. ऑल्विन टॉफलर यांनी ‘फ्यूचर शॉक’ या पुस्तकात हीच संकल्पना समकालीन समाजाला लागू केली आहे. याविषयी, अवनीश पाटील यांनी ‘अक्षरनामा’त लिहिलं आहे. टॉफलर लिहितो, ‘आज परिवर्तन इतकं शक्तिशाली झालं आहे की, संस्था उलट्या-पालट्या झाल्या आहेत. मूल्यं घसरून त्याची मुळं खुंटली आहेत. भविष्यातही संस्कृती आणि तंत्रज्ञान यांच्यामध्ये टकराव होऊन नवं जग उद्ध्वस्त होईल. या फ्यूचर शॉकमधून उद्याची कुटुंबव्यवस्थाही सुटणार नाही. जेव्हा कौटुंबिक सलोख्याची वीट ढासळून जाते, तेव्हा समूह मुर्दाड, हिंसक बनतो. अशा दिशाहीन समूहावर कोणत्याही राजकीय पक्षाला आणि धर्माला ताबा मिळवणं सोपं जातं. जे आज वेगानं सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हैदोस घालताना त्याचीच प्रचंड मोठी गळचेपी धर्म आणि तथाकथित संस्कृतिरक्षक करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात चारा मिळावा म्हणून देवळांत कणसं बांधून, तिथल्या कुंडात पाणी भरून पाखरं जगवणारी आणि त्यांनी धान्य म्हणून टिपू नये, यासाठी सायंकाळी दारात नखं न काढू देणारी आपली सामाजिक अभिरुची सगळ्यांच्या जगण्याचा हक्क मान्य करणारी आहे. याच परंपरेतील आपण अधिकच विषमतावादी, जातीय, बनत चाललो आहोत. प्राण्यात देव शोधणारी ही अभिरुची माणसांना मात्र पशू बनवत चालली आहे. आणि हे अत्यंत धोकादायक आहे. महेंद्र कदम mahendrakadam27@gmail.com संपर्क : 9011207014