आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्थ डायमेन्शन:यह तो हद है...

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील जेएनयूमध्ये सेमिनार सुरू होता. स्वतःला षोडशवर्षीय दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत वक्ता बाई फ्री सेक्सवर बोलत होत्या. तेवढ्यात त्यांनी जिभेची धार अधिकच वाढवली - ‘आजही या देशात स्त्रियांवर किती अन्याय होतो. पाहा, आताच माझ्या मोबाइलवर अपडेट आली आहे की, मुंबईला तोकडे कपडे घातले म्हणून एका स्त्रीला विमानप्रवासास मज्जाव केला.’ पुरावा म्हणून त्यांनी लगेच ती व्हायरल झालेली क्लिप दाखवली, ज्यात जेमतेम बोटभर चिंध्या ल्यालेली एक बाई आपलं ‘दुःख’ सांगत होती की, या कपड्यामुळे विमान कंपनीने तिला कसं ‘टॉर्चर’ केलं. दुष्यंत कुमारचा शेर इथे अगदी चपखल बसतो,

जिस्म पहरावों में छुप जाते थे / पहरावों में जिस्म नंगे नज़र आने लगे / यह तो हद है...

न राहवून मी म्हणाले की, हा प्रसंग तसा चुकीचाच. पण माफ करा, मिनी घालणं हा स्त्रीमुक्तीचा मुद्दा होऊ शकत नाही, होऊही नये. नाक मुरडत त्या म्हणाल्या - ‘How old fashioned you are !’ दर दोन दिवसांनी ऐकायला येणारं वाक्य पुन्हा कानी आदळलं - “बाईनं काय घालावं हा तिचा ‘चॉइस’ आहे.’

मागे पुरुष मंडळी टाळ्या देत होती की टुचभर कपडे व फ्री सेक्सवर बोलणारी बाई आणि आपण श्रोते...अहा sss स्वर्गसुख की हो. या सर्व चर्चेपासून पूर्णतः अनभिज्ञ त्या बाई,‘माय बॉडी-माय चॉइस’च्या तोऱ्यात. शरीराचं प्रदर्शन हेच मुळी जगण्याचं साधन आणि भांडवल असणाऱ्या कोण्या नटीनं आणलेलं हे खूळ आज शहरी - निमशहरी भागातल्या अर्धवट डोक्याच्या पोरींमध्ये पुरतं भिनलं आहे. ‘I am Bold’ हे वाक्य तर अशा टेचात बोललं जातं की बस्स. (आता बोल्डनेस काय आणि कशाशी खातात हेही त्यांना माहिती नसतं हा भाग वेगळा. हे असले नमुने आम्ही रोज पाहतो म्हणून माझ्या या स्तंभातील पहिल्याच लेखात मी सांगितलं होतं की या ‘बोल्ड’ प्रकरणावर मी पुढेमागे लिहिणार आहे) तोकडे कपडे, भडक रंगवलेले ओठ, मध्येच पिवळ्या-लाल केलेल्या बटा, अवघी चाल बिघडवणाऱ्या उंच टाचेच्या चपला आणि इंग्रजीचा गंधही नसला तरी ओठाचा चंबू करत इंग्रजी शब्दांचा यथेच्च (आणि चुकीचा) भडिमार म्हणजे बोल्डनेस का? त्यांच्यापुढे तर मग शतकभरापूर्वी दणक्यात स्त्री-पुरुष तुलना करणारी ताराबाई ही गावंढळच म्हणायची...अशा वेळी मला जर्मेन ग्रीयर आठवते. ती म्हणते, ‘स्त्रीवादी चळवळींनी भारतीय स्त्रियांना तीन गोष्टी दिल्या - तंग-तोकडे कपडे, लिपस्टिक आणि उंच टाचेच्या सँडल.’ स्त्रीवादी चळवळीची ही उपलब्धी ? दुर्दैवानं आमचा तथाकथित बोल्डनेस जर्मेन ग्रीयरला खरं ठरवू लागला आहे. मोठ्या शहरांमधून तर बोल्डनेसच्या संकल्पना लय बक्कळ पुढे गेल्यात - मुक्त शरीरसंबंध, कपडे बदलावे तसे प्रेमी (याला बी.एफ. म्हणतात म्हणे) बदलणं, लिव्ह इन रिलेशनशिप वगैरे वगैरे आणि हे लोण आता छोट्या शहरांमधूनही पसरत चाललं आहे. छोटे कपडे म्हणा किंवा संबंधातील उन्मुक्तता म्हणा, खरोखर वाईट आहे का? भारतीय संदर्भामध्ये याचं उत्तर काहीसं वेगळं आहे. आपण जे घालतो आहोत किंवा फॅशनच्या नावाखाली जे चित्रविचित्र प्रकार करतो आहोत व शरीराचे (म्हणजे निव्वळ शरीराचे) संबंध जोडतो-तोडतो आहोत त्यामागे आपली काही निश्चित वैचारिक भूमिका असेल तर या गोष्टी खचितच विचारणीय ठराव्यात. (विजय आनंद त्यांच्या एका चित्रपटात ते खजुराहोमधील शिल्प ते कामसूत्रपर्यंत सर्व बाबींमध्ये असलेल्या आधुनिकतेचा अतिशय सुरेख आढावा घेतात) पण आपण डोळे बंद करून मायावी बोल्डनेसच्या मागे लागतो तेव्हा मात्र उलट तपासणी व्हायलाच हवी.

हे खूळ पसरवण्यामागील आणि त्या आडून मूळ प्रश्न व्यवस्थित बाजूला सारण्यामागील व्यवस्थेचे षड्यंत्र लक्षात येण्याएवढी अक्कल नसेल आणि जे करतोय ते निव्वळ अंधानुकरण असेल तर ते योग्य कसं म्हणावं? का म्हणावं? आधुनिक आणि पुरोगामी म्हणवून घेण्याची हौस भागावी म्हणून? दुर्दैवाने हे असले प्रश्न गंभीर होत चालले आहेत. आज स्त्रीची लढाई केवळ पुरुषसत्ताक व्यवस्थेशी नाही, बाजारही तिला हवं तसं नाचवतोय. कारण स्त्रिया जगातील अर्धा आणि हक्काचा ग्राहक वर्ग आहेत. हा बाजार स्त्रीला अशा मुक्तीचे धडे देत आहे, जी बाजाराचं हित बघेल, स्त्रीचं नाही. ही मुक्ती विचारांची, निर्णय घेण्याच्या क्षमतेची, आर्थिक स्वावलंबनाची नाही तर उपभोगासाठी स्त्रीची उपलब्धता वाढवणारी मुक्ती आहे. म्हणूनच तिच्या शरीराला, शरीराच्या मापाला, तिच्या दिसण्याला आणि एकूणच तिच्या ‘प्रेक्षणीय’ असण्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. मग तिला मिनी स्कर्ट घालू द्या म्हणून पुरुष (आणि बायकाही) भाषणबाजी करू लागतात. हेच लोक तिला तिचा निर्णय घेऊ द्या म्हणून भाषण ठोकतात का ? मुक्तीचा आभास निर्माण करणाऱ्या तोकड्या कपड्याचा देह स्वातंत्र्याचा कीस पाडला जातो. (आणि हो, हे आपल्या लेकीनं, बायकोनं, बहिणींनं स्वीकारलं तर आम्हाला चालत नाही बरं) शरीराच्या पुढे स्त्रीला सरकूच न देणाऱ्यांचा, स्त्रीमुक्तीच्या मूळ मुद्द्यांना अतिशय सफाईने बगल देत नको त्याच वायफळ गोष्टीत तिला अडकवून ठेवणाऱ्यांचा निषेध करणारी सविता सिंहची एक बोचरी कविता आहे -

सुना है, नारी मुक्ति हो रही है अच्छा है मुक्त हो रही हैं मिल सकेंगीं स्वच्छंद अब भोग के लिए...

तेव्हा केवळ ‘प्रेक्षणीय’ बनवणारा स्त्रीमुक्तीचा आभास हवा की आचार - विचार, ठाम निर्णय, शिक्षण, स्वावलंबन, राजकीय - सामाजिक- नागरिक - आर्थिक अधिकार, समान दर्जा, सन्मान, सुरक्षा या दृष्टीने सक्षम अस्मिता निर्माण करणारी मुक्ती हवी याचा विचार स्त्रियांनीच करायचा आहे. (पण हा विचार आणि त्यानुसार कृती करायची असेल तर बटा रंगवायला मात्र वेळ मिळणार नाही बरं..)

भारती गोरे संपर्क : drbharatigore@gmail.com

बातम्या आणखी आहेत...