आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षी मी अमेरिका दौऱ्यावर होतो. अमेरिकेत सॅन फ्रॅन्सिस्कोमधील सनीवेल सिटी इथे ‘विष्णूजी की रसोई’ची शाखा सुरू करायची होती. इथे रेस्टाॅरंट टाकायचा विचार केला त्यावेळी बऱ्याच भागात फिरून इथली खाद्यसंस्कृती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आलं की भारतातील खवय्ये वर्गात मोडणाऱ्या मंडळींंसाठी इथे फार कमी जागा आहेत, जिथे ही मंडळी रसना तृप्ती करू शकतील. एक तर इथे भाजीपाला आणि किराणा स्वस्त असला तरी त्यापासून जो स्वयंपाक तयार होतो, त्याला जास्त किंमत मोजावी लागते, भारतीय दरानुसार जवळपास तीनपट. कारण इथे काम करण्यासाठी माणसं मिळत नाहीत. जी माणसे मिळतील त्यांच्याकडून काम करून घ्यावं लागतं. त्यांचा तासाचा दर बऱ्यापैकी महाग असतो. ९० टक्के रेस्टाॅरंंटचा मेनू आणि त्यांच्या चवी जवळपास सारख्याच असतात. रोटी आणि नान याकरिता बऱ्याच ठिकाणी एकच पीठ वापरतात. त्यामुळे कुठेही गेलं तरी तुम्हाला एकसारखी नान आणि पोळी मिळते. रेस्टॉरंंटचे मालक शक्यतो तीन किंवा चार असे असतात. प्रत्येकालाच रेस्टॉरंटबद्दल माहिती असते असं नाही. परिणामी अर्धवट शिकलेल्या शेफ लोकांची चलती असते. त्यामुळे भारतीय जेवणाच्या बाबतीत खूप खास असं काही सापडलं नाही.
तिथे अमेरिकनांशिवाय जगातील सर्वच देशातील मंडळी आली आहेत. जसजशी त्यांची लोकसंख्या वाढू लागली तशी त्यांना आवडणाऱ्या पदार्थांच्या रेस्टाॅरंंटची संख्याही वाढली. सगळ्या रेस्टॉरंंटमध्ये काम करायला पंजाबी, तमिळ, मेक्सिकन, हरियाणवी, नेपाळी, चायनीज, बांगलादेशी, पाकिस्तानी लोक दिसतात. अमेरिकेत ‘रेस्टाॅरंंट डेपो’ नावाचा एक अफलातून प्रकार पाहिला. या ठिकाणी रेस्टॉरंंट सुरू करायला जे काही लागतं त्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. इथे तयार छोले, वेगवेगळ्या ग्रेव्ही पाच-पाच किलोच्या बॅगमध्ये पॅक केलेल्या असतात. त्यामुळे सगळ्या रेस्टाॅरंंटमध्ये सारखीच चव असते. रेस्टाॅरंट इथे भरपूर प्रमाणात चालतात. याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या लोकांजवळ स्वयंपाक करायला वेळ नाही. अशा परिस्थितीत आम्ही रसोई काढण्याचं ठरवलं तेव्हा तिथल्या लोकांना महाराष्ट्रीयन पदार्थ शिकवण्यापासून ते वाढतात कसे, खातात कसे हे सांगायला बरेच कष्ट पडले. जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या सॅन फ्रान्सिस्को शहरामध्ये जिथेे आमची रसोई आहे, तिथे जवळपास २०० रेस्टाॅरंट आहेत. इथे मोठ्या प्रमाणात आयटी इंडस्ट्री आहेत, अनेक नामवंत कंपन्यांच्या कार्यालयांत बहुभाषी-बहुदेशी मंडळी काम करतात. इथे महाराष्ट्रीय पदार्थ म्हणजे वडा-पाव, साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, मिसळ यापुढे काही जास्त पाहायला मिळालं नाही. मुख्य मराठी जेवण आणि भाज्या मात्र फार कमी ठिकाणी दिसल्या. भारताच्या मानाने कमी जागेत, पण आपलं थोडं वेगळेपण जपत रसोईला सुरूवात केली. इथे एका जपानी रेस्टाॅरंटमध्ये गेलो असताना वेगळा अनुभव आला. आॅर्डर केलेल्या पदार्थात जे साहित्य लागतं, ते एका ट्राॅलीमध्ये भरून शेफ तुमच्या टेबलजवळ येतो आणि तुमच्यासमोर तो पदार्थ तयार करतो. एकमात्र खरं की इथे लोक मेनू कार्डमध्ये पैशाची बाजू न बघता सर्रास आॅर्डर करतात आणि चांगलं असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट हे सांगून मोकळे होतात. इथल्या शेफ लोकांना आपल्या पद्धतीने तयार करणे, हे काम सध्या माझ्या मागे आहे.
जाता जाता या काही इंडो-अमेरिकन रेसिपी, खास तुमच्यासाठी. नक्की करुन बघा... अमेरिकन दोसा { साहित्य : तांदूळ १ वाटी, उडदाची डाळ १ वाटी, मेथी दाणे १ चमचा, मेयॉनिज सॉस २ चमचे, स्वीट कॉर्न पाव वाटी. { कृती : सर्वप्रथम तांदूळ, डाळ, मेथीदाणा एकत्र भिजवून ४ तास ठेवा. नंतर त्याला बारीक वाटून ५ ते ६ तास फरमेंट करा. नंतर मिश्रण तव्यावर वाटीने पसरवून थोडे शिजू दया (कुक करा). नंतर त्यावर मेयाॅनीज साॅस व स्विटकाॅर्न पसरवा पुन्हा शिजवा. वर थोडे तेल सोडून कडक झाल्यावर रोल करून सर्व्ह करा.
काॅर्नफ्लेक्स कुकीज { साहित्य : मार्वो १५० ग्रॅम, पिठी साखर १५० ग्रॅम, जीएसएम पावडर १५० ग्रॅम, दूध १०० मिली, मैदा ४०० ग्रॅम, काॅर्नफ्लेक्स १०० ग्रॅम, बेकिंग पावडर ४ ग्रॅम, अमोनिया ४ ग्रॅम, इसेंस ५ मिली, मीठ ५ ग्रॅम. { कृती : मार्वो, जीएसएम पावडर, पिठी साखर हलके होईस्तोवर फेटून घ्या. मैदा, बेकिंग पावडर, अमोनिया, मीठ व इसेंस एकत्र करून चाळून घ्या. नंतर दोन्ही मिश्रण एकत्र करा. आवश्यकतेनुसार दूध घाला. दूध घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा. मैदा जाड असेल तर दूध जास्त लागेल. मैदा हलका असेल तर दूध कमी लागेल. एकत्र करून त्यावर काॅर्नफ्लेक्सचा चुरा लावा. प्रि-हीट ओव्हनमध्ये १८० डिग्रीवर बेक करा.
{ संपर्क : ९८९०५५५५५९
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.