आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Best Teacher In The World, Now Looking For Super 30| Positive Blog Of Divya Marathi

पॉझिटिव्ह ब्लॉग:जगातील सर्वोत्तम शिक्षक, आता शोधणार सुपर 30

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी सरकारी शाळेत शिक्षक आहे. दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षकांचा दर्जा खालच्या पातळीवर आहे. मीही इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता, पण काही कारणास्तव ते सोडले. मग बीए केले, पत्रकारितेत मास्टर्स, मग बीएड केले आणि मी शिक्षक झालो. तेव्हा मनात कोणताच उद्देश व ध्येय नव्हते. पहिली पोस्टिंग २००९ मध्ये सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाली. ती शाळा नव्हे, गुरांचा गोठा होता. ती अवस्था पाहून मन संतापाने भरून आले. सामान्य सुविधांची शाळा असती तर मीही सामान्य शिक्षकच राहिलो असतो. पण, शाळेची दुर्दशा पाहून प्रेरणा मिळाली. प्रतिकूल परिस्थिती आव्हान म्हणून स्वीकारली व नवे काही करू शकलो.
महाराष्ट्रातील हा भाग दुष्काळी आहे. मुलांना अभ्यासात रस नव्हता. शाळेत मुलींची उपस्थिती खूपच कमी होती. इथूनच आव्हानांना सुरुवात झाली आणि मी कामाचा आनंद घेऊ लागलो. आधी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांचे मन वळवले. मग मुलांना वर्गात कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना सहा महिने पुस्तके उघडू दिली नाहीत. मोबाइल-लॅपटॉपच्या मदतीने शिकवायला सुरुवात केली. भाषेचे आव्हानही होते. पुस्तकांचे मातृभाषेत भाषांतर करून त्यात क्यूआर कोड देण्यात आला, जेणेकरून विद्यार्थी व्हिडिओ लेक्चरला उपस्थित राहू शकतील. सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाला याच्याशी संपूर्ण अभ्यासक्रम जोडण्याचा प्रस्ताव दिला. पथदर्शी प्रकल्पानंतर राज्य सरकारने सर्व श्रेणींसाठी राज्यात क्यूआर कोड पुस्तके सुरू केली. एनसीईआरटीनेही देशभरातील पुस्तकांसाठी घोषणा केली.
२०२० मधील जागतिक शिक्षक पुरस्कारामुळे जगभरात प्रसिद्धी मिळाली. परंतु, मी म्हणतो की, मी शिक्षक म्हणून जे करायला हवे होते तेच केले. होय, मी त्यात तंत्रज्ञान जोडले. मी काही नवीन शोध लावला नाही, फक्त मुलांच्या हितासाठी तो उपक्रम राबवला. मुलांना अभ्यासाशी जोडून ठेवण्यासाठी असे प्रयोग व्हायला हवेत. आता आम्ही महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने ‘सुपर ३० टीचर्स स्कीम’ सुरू करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ३० शिक्षकांची निवड करून त्यांना व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून मला जो सन्मान आणि मान्यता मिळाली, ती इतर शिक्षकांनाही मिळावी. ऑगस्टमध्ये मी पीस इन एज्युकेशन या विषयावर संशोधनासाठी अमेरिकन विद्यापीठात जाईन. तिथून आल्यावर त्याचे अनुभव सांगेन.
- फोनवरील चर्चेवर आधारित.

बातम्या आणखी आहेत...