आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त मातृदिनाचे:मुलगा खरंच ‘हाताशी’ आलाय...

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आ पण जाणिवपुर्वक केलेल्या संस्कारांची खरी ओळख संकट समयी होते. कोरोना काळ अत्यंत कठीण होता. घरकाम मदतनीस येत नव्हत्या सगळा कामाचा ताण महिलांवर होता. याच काळात माझे आई- वडिल दोघेही कोरोना पॉझेटिव्ह होते. आम्ही तिघी बहिणी. आई–वडिलांना सांभाळणे आमच्यासाठी प्राधान्यक्रमात असते. या काळात त्यांना माझी अधिक गरज असल्याने मी माहेरी राहण्याचा निर्णय घेतला . हा निर्णय मी निर्धास्तपणे घेऊ शकले ते फक्त माझ्या १६ वर्षाच्या मुलाच्या ओम च्या जीवावर...कारण त्याला उत्तम स्वयंपाक करता येतो. ६ वर्षांची लहान बहीण खुशी आणि वडीलांची जवाबदारी त्याने मोठ्या आनंदाने घेतली. माझा नवरा त्याला मदत करायचा परंतू स्वयंपाक मुलगाच करायचा. या महिनाभराच्या काळातल्या अनुभवांवरून मला मी मुलाल स्वयंपाक शिकवण्याच्या फार पुर्वी घेतलेल्या निर्णयाचे समाधान वाटले.

आम्ही दोघं नवराबायको कामानिमित्त घराबाहेर असतो. ओम पाच वर्षांचा असल्यापासून मी त्याला घरकामात, स्वयंपाकात मदत करण्याची सवय लावली. सुरवात सहजसोप्या कामांपासून केली. उकडलेला बटाटा सोलायची सवय लावली, नंतर मटार सोलताना त्याची मदत घेऊ लागले. हे करतांना त्याला काम करणं कंटाळवाणे होऊ दिलं नाही. भाज्या चिरणं,निवडणं शिकवलं. नंतर गॅस पेटवायला शिकवलं, दूध तापवायला आणि मग चहा बनवायला शिकवले. पदार्थ शिकताना त्याची स्वयंपाकाची आवड वाढू लागली. पदार्थ खाल्ल्यानंतर समोरच्या व्यक्तीला मिळणाऱ्या आनंदाने त्याचा उत्साह वाढू लागला. आज तो १८ वर्षांचा आहे. त्याला शाकाहारी–मांसाहारी स्वयंपाक, नाश्ता असे सगळे उत्तम जमते. मला दर रविवारी किचनमधून सुट्टी मिळू शकते ती केवळ त्याच्याचमुळे.

ओमला स्वयंपाक, घरकाम शिकवण्याला सुरूवातीला त्याच्या आत्याचा विरोध होता. मात्र माझे पती सुमेध ह्यांनी तिला समजावून सांगत मला साथ दिली. आता इंटरनेटमुळे पदार्थांचे प्रयोगही तो करून बघतो. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ओम त्याच्या लहान बहिणीलाही स्वयंपाक शिकवतो आहे. कामानिमित्त घराबाहेर जास्त वेळ राहण्याची वेळ आली, प्रवास करावा लागला तर माझ्याकडे ओमचा पर्याय असतो हे मला खूप मोठे सुख वाटते.

कुटुंबासाठी जेवण बनवायची जबाबदारी ही प्रत्येकाने घ्यायला हव, मग तो मुलगा असो की मुलगी. आता जग बदलतंय. ह्या बदलात स्त्री पुरुष समानता हवी असेल तर प्रत्येक स्तरातून ती दिसायला हवी. प्रत्येक मुलाला जेवण बनवणे आले पाहिजे. स्वतासाठी ही ते गरजेचे आहे. फक्त स्वयंपाक नाही तर घर सांभाळणे हेही कौशल्याचे काम आहे. त्यात सुद्धा मुलांचा सहभाग असलाच पाहिजे.

पल्लवी चौधरी संपर्क : ९०२८०५१०८४

बातम्या आणखी आहेत...