आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार:‘प्री-वेडिंग फोटोशूट’चं खूळ

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ए का वर्तमानपत्रात एक बातमी वाचण्यात आली की, प्री-वेडिंग शूट झाल्यावर एका उच्चशिक्षित नवऱ्या मुलाने त्याच्या नियोजित वधूला “तू मला आवडत नाहीस’ म्हणून लग्नाला नकार दिला. प्री-वेंडिंग शूटसाठी हे दांपत्य गोव्याला गेले होते. तिथे त्यांनी एक रिसॉर्ट बुक केले. फोटोग्राफर, मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणींसाठी, नवऱ्या मुलासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. आदल्या दिवशी प्री-वेडिंग शूट झाल्यावर मुलाच्याच खोलीत मुलीचा मुक्काम होता. मात्र त्यानंतर “तू मला अजिबात आवडत नाहीस, मला हे लग्नच मान्य नाही’ असे नवऱ्या मुलाने जाहीर केले आणि मुलीच्या काळजाचा ठोका चुकला. मुलगी आपल्या मैत्रिणींसोबत गोव्याहून परत आली आणि घडला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीसह तिचे आईवडीलही चिंतेत पडले. मात्र पोलिसांत हे प्रकरण गेले नाही. त्यावर आता सामाजिक स्तरावर तोडगा काय निघतो हे लवकरच समजेल. घटना अधोरेखित करण्याचं कारण हे की नात्यांचा हा बाजार अलीकडच्या काही चंगळवादी प्रवृत्तींनी विवाह संस्थेत आणलाय. प्री-वेडिंग फोटोशूट हे त्याचेच अपत्य. अशा घटनांमधून चंगळवादी संस्कृतीला ऊत येतो आहे.

कारण झगमगाटी लग्नांतून केवळ उष्ट्या पत्रावळी दिसत नाहीत तर नातीही पत्रावळीसारखी सैरभैर झाली आहेत. प्रत्येकाच्या मागे लागलेली जीवघेणी स्पर्धा, रोजची धावपळ, दगदग यातून बाहेर पडून एक दिवस आप्तस्वकीयांना द्यावा अशी कुणाची इच्छा नसते? मात्र असे प्रकार घडत असतील तर नात्यांच्या या महान सोहळ्याला गालबोट नाही का लागणार? लग्न हे दोघा मुला-मुलींच्या जीवनातला खूप आनंदी आणि अविस्मरणीय क्षण असतो. पण विवाहोत्तर तो तितकाच खासगी पातळीवरचा असतो. असे असूनही लग्नानंतरच्या हनीमूनलाही पद्धतशीरपणे व्यावसायिक स्वरूप आलेलं कुणी नाकारून चालणार नाही. व्यवसाय हे या अर्थाने की अनेक खासगी ट्रॅव्हल तर हनीमून पॅकेज टूर जाहीर करतात. अर्थात हा जरी अनेकांच्या व्यावसायिकतेचा भाग असला तरी त्यातून लग्नसंस्था, त्यातील नाती, संस्कृती, घराणी अशा अनेक बाबी सोयीस्करपणे धाब्यावर बसवल्या जातात. एकट्या लग्नसंस्थेवर अनेक लोकांचा उदरनिर्वाह चालतो ही बाब नजरेआड करूनही चालणार नाही. पण, झगमगाटी लग्न सोहळे गरीब मुलीच्या बापाला कर्जाच्या खाईत ढकलून देणारे आहेत, हेही खरेच आहे. आज नवरा मुलगा डॉक्टर, इंजिनिअर, आयटी कंपनीत असणारा, लाखो-करोडोंचे पॅकेज असणारा मुलींनाही हवा असतो. अर्थात तशी अपेक्षा ठेवणंही गैर नाही. पण हा जो प्रकार घडला आहे तो काही आजचा नाही. आणखीही काही प्रकार लग्न लागल्यावर घडत असतात. आता तर प्री-वेंडिंग शूट लग्न मांडवात सर्वांसमोर दाखवण्याचा ट्रेंड आला आहे. त्यात मुलगा मुलीला उचलून घेतो, आणखीही बरंच काही. वेगवेगळ्या पोज देऊन फोटोसेशन करणं असो, हेही सर्व नव्या पिढीची क्रेझ म्हणून गृहीत धरूया. मात्र लग्नात असणाऱ्या नातेसंबंधांचे काय? त्या नववधूला किंवा नवऱ्या मुलालादेखील अनेकांना भेटायचे असते. मात्र फोटोसेशनवाली मंडळी या नवउभयतांचा एवढा ताबा घेते की त्यांना कुणाला भेटूच देत नाहीत. इकडे व्हा, तिकडे जा, बाजूला उभे राहा अशा सूचना तिऱ्हाईत माणसाकडून नातलगांना मिळत असतात. अशा वेळी नातलगच आपला सोयीचा मार्ग काढून निघून जातात. ज्येष्ठ माणसे खूप जवळची असतात. कधी मुलाचे आजोबा तर कधी आजी असते. कुणी आत्या असते तर कुणी बहीण असते. मात्र या नात्यांना या लग्नाच्या पेठेत जागा नसते.

लग्नात गर्दी कुणाची ? तर संबंध नसलेल्या व्यवसाय करणाऱ्यांची. दिवसेंदिवस लग्नसंस्था ज्या मोडकळीस येताना दिसत आहेत, त्यात लग्न समारंभाचे वाढणारे विकृत सिम्बॉल स्टेटस हेदेखील एक कारण आहे. लग्नातल्या अशा अनेक बाबी समोर येतात, ज्यांचा गांभीर्याने विचार करावा लागतो. जेवणाच्या पंगतीच्या बाबतीतही अनेकदा वाईट अनुभव येतो आणि तो आता किंबहुना सर्वांच्या अंगवळणी पडलाय, असे खेदाने म्हणावे लागेल, तो म्हणजे ताटात उष्टे पडलेले अन्न. काही ठिकाणी सेल्फ सर्व्हिस असल्याने आपल्याला पाहिजे तितकेच अन्न शहाणी मंडळी घेत असते. त्यातही बऱ्याचदा ताटात शिल्लक राहिलेले अन्न कचऱ्याच्या डब्यात गेलेले दिसते. पण यावर फारसं कुणी बोलत नाही. लग्नात जी वाढपी मंडळी असते त्यात बालकामगार दिसतात. त्यांच्याकडे कुणाचं लक्ष जात नाही आणि गेलं तर आपल्याला काय बुवा पडलंय ? ज्याचं असेल तो बघेल.

एकूणच शुभमंगल कार्यात चालणारे हे अमंगल प्रकार कुठेतरी थांबायला हवेत. नाही तर आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असलेला हा तमाशा विकृतीच्या कोणत्या टप्प्यावर थांबेल हे सांगता येणार नाही. प्रा. अमर ठोंबरे संपर्क : ८०८०५९००७०

बातम्या आणखी आहेत...