आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर (ते राष्ट्रीय जनता दलाचे आहेत) अलीकडे म्हणाले की, तुलसीदासांचे रामचरितमानस सामाजिक विभाजनाचा प्रचार करते आणि समाजात द्वेष पसरवते. माझ्या मते, आपण असे बोलतो तेव्हा रामचरितमानसच्या मूळ भावनेबाबत घोर अज्ञान दाखवतो. मानसवर टीका होत आहे ही माझी समस्या नाही, कारण हिंदू धर्म टीकाकारांचे स्वागत करतो. उदा. इसवी सनपूर्व सातव्या शतकात भौतिकवादी चार्वाक परंपरेची स्थापना करणाऱ्या बृहस्पतीने वेदांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, परंतु तो ईश्वरद्रोह मानला गेला नाही. याउलट चार्वाक परंपरेलाही हिंदू धर्माचा एक भाग म्हणून स्वीकारले गेले आहे. गरीब आणि दीनदलितांबद्दल अतीव सहानुभूती असलेले महात्मा गांधी रामचरितमानस ही भक्ती साहित्याची सर्वोत्तम कलाकृती मानत असत. तुलसीदासांचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम राम होते. त्यांच्यासाठी श्रीराम हे उपनिषद आणि अद्वैत तत्त्वज्ञानातील अदृष्ट, अचिंत्य, अखंड, सर्वव्यापी, पूर्ण आणि निराकार ब्रह्माचे मूर्त स्वरूप होते. त्यांनी लिहिले : राम ब्रह्म परमार्थ रूपा, अबिगत अलख अनादि अनूपा॥ म्हणजे श्रीराम स्वतः ब्रह्म आहेत. ते सर्वोच्च सत्ता, अज्ञात, अलक्ष्य, अनादि, अतुलनीय, अपरिवर्तनशील आणि सर्व भिन्नतेच्या पलीकडचे आहेत. श्रीराम निर्गुण अस्तित्वाचे सार असतील तर त्यांचा मानव अवतार हे त्याचे सगुण स्वरूप आहे. पण, दोघांमध्ये फरक आहे. तुलसीदास लिहितात : अगुण सगुण दुई ब्रह्म स्वरूपा, म्हणजे निर्गुण आणि सगुण ही एकाच ब्रह्माच्या दोन मिती आहेत. किंवा त्यांनी दुसऱ्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे : अगुण अरूप अलख अज जोई, भगत प्रेम बसा सगुण सो होई॥ म्हणजेच भक्ताच्या प्रेमामुळे निर्गुण ब्रह्मच सगुण बनतो. ज्या मनामध्ये राम हे निर्गुण चैतन्यरूपात चित्रित केले आहेत, जे सर्व जगाला व्यापून आहेत आणि आत्मस्वरूपात आपल्यामध्ये आहे, त्याला सामाजिक भेदभावात्मक कसे म्हणता येईल? मानवी भेदभाव हा मायेचा परिणाम आहे. लक्ष्मणाने श्रीरामाला माया समजावून सांगण्यास सांगितले तेव्हा तुलसीदासांच्या शब्दांत श्रीरामाने अभूतपूर्व काव्यात्मक उत्तर दिले : मैं अरु मोर तोर तैं माया। जेहिं बस कीन्हे जीव निकाया॥ म्हणजेच मी, माझी, तू, तुझी ही माया ही भ्रामक संकल्पना सर्व जीवांना संभ्रमात ठेवते. श्रीराम पुढे म्हणतात : ग्यान मान जहं एकउ नाहीं। देख ब्रह्म समान सब माहीं॥ म्हणजेच आध्यात्मिक बुद्धीला श्रेष्ठत्व किंवा अभिमानाची भावना नसते, ती सर्वांमध्ये परम चैतन्याला समानतेने पाहते. सगुण रूपातील श्रीराम हे करुणेचे प्रतीक आहेत. तुलसी त्यांच्या जन्माच्या संदर्भात लिहितात : भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी॥ म्हणजे गरिबांवर कृपा करणारे आणि कौशल्येचे हित करणारे श्रीराम प्रकट झाले आहेत. श्रीरामाने भरताला सांगितले : परहित सरिस धर्म नहिं भाई, परपीड़ा सम नहिं अधमाई॥ तुलसीदासांच्या भक्तीत भेदभावाला स्थान नाही. शबरीला भेटताना श्रीराम लक्ष्मणाला सांगतात : जाति पांति कुल धर्म बड़ाई। धन बल परिजन गुन चतुराई॥ भगति हीन नर सोहइ कैसा। बिनु जल बारिद देखिअ जैसा॥ म्हणजे जातपात, घराणे, धर्म, वैभव, संपत्ती, सामर्थ्य, कुटुंब, सद्गुण आणि हुशारी - हे सर्व असूनही भक्ती नसलेला माणूस जलहीन ढगासारखा असतो. रामचरितमानसमध्ये १२,८०० ओळी आहेत. ते १०७३ दोहे आणि सात खंडांमध्ये विभागलेले आहे. ते जागतिक साहित्यातील महान कलाकृतींत गणले जाते व बायबलचे ख्रिश्चनांसाठी जितके महत्त्व आहे तितकेच हिंदूंसाठी याचे महत्त्व आहे. अशा महाकाव्यातील एक-दोन ओळी उचलून - त्या मोडतोड केलेल्याही असू शकतात - आणि त्या आधारे संपूर्ण पुस्तकाबद्दल दुर्बुद्धी व्यक्त करणे अक्षम्य आहे. जात व लिंगाच्या आधारावर भेदभावाचा तेव्हाही तितकाच निषेध केला गेला जितका आज आहे. तुलसीदास हे त्यांच्या काळातील उत्पत्ती होते आणि ते समाजसुधारक नव्हते. त्यांचे काही पूर्वग्रह असतील, पण रामचरितमानस द्वेषाचा प्रसार करते, असे म्हणणे ही खूप मोठी चूक आहे. हे म्हणजे त्याच्या तात्त्विक स्वरूपाच्या अज्ञानाचा परिचय करून देणे आहे, ज्यात निर्गुण ब्रह्माचे प्रतीक श्रीराम सर्वांत समान रूपात आहेत. सार्वजनिक जीवनातील लोकांनी अशा सामान्यीकरणापासून दूर राहावे. असे का केले जाते हे तुलसीदासांना माहीत होते. म्हणूनच ते म्हणाले होते : नहिं कोउ अस जनमा जग माहीं। प्रभुता पाइ जाहि मद नाहीं॥ म्हणजेच ज्याला सत्तेची नशा चढली नाही असा जगात कोणीही जन्मला नाही. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
पवन के. वर्मा लेखक, मुत्सद्दी, माजी राज्यसभा खासदार pavankvarma1953@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.