आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opinion
  • The Dollar Will Continue To Ring Around The World| Article By Andhuman Tiwari

अर्थात्:जगभरात वाजतच राहील डॉलरचा डंका

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या इतिहासात बायडेन यांना कोणते स्थान मिळेल, ते काळावर सोडूया. सध्या तरी पुतीन यांच्या युद्धखोरपणामुळे अमेरिकेला असे एकध्रुवीय जग निर्माण करण्याची संधी मिळाली आहे, ज्याच्या प्रयत्नात गेल्या ७५ वर्षांत अमेरिकेचे १३ अध्यक्ष इतिहास झाले आहेत. युद्धामुळे आलेल्या महागाईनंतर जागतिक चलन बाजारात अमेरिकन डॉलर आता अतुलनीय आहे. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद दाखवणारा डॉलर-निर्देशांक २० वर्षांच्या उच्चांकावर आहे. फिएट चलनाच्या (व्यापाराचे मूळ चलन) बळावर अमेरिकेने रशियाचा परकीय चलन साठा (६३० अब्ज डाॅलर) निकामी केला आहे. पुतीन यांचा देश जागतिक आर्थिक व्यवस्थेतून बाहेर गेला आहे. यानंतर चीनही डगमगला आहे. जागतिक बाजारपेठेत डॉलरची ताकद निर्दयी आणि चिंताजनक आहे.

अशी आली ताकद : अमेरिकन डॉलरचे वर्चस्व होते, तो इतिहास आता पुन्हा नवे वळण घेत आहे. दुसऱ्या महायुद्धात पर्ल हार्बरवर जपानी हल्ल्याने जगाची चलन व्यवस्था उलथून टाकली. याआधी दुसऱ्या मोठ्या युद्धात अमेरिका थेट हस्तक्षेपापासून दूर होती. जपानवर बॉम्बहल्ला केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल युद्धनौका घेऊन अमेरिकेत पोहोचले आणि तीन आठवड्यांतच अमेरिका युद्धात उतरली. हे झाले नसते तर कदाचित हिटलरने ब्रिटनलाही गिळंकृत केले असते. ब्रेटन वुड्स करार जुलै १९४४ मध्ये झाला. सोबत सोन्याचे मानक आले (अमेरिकन डॉलर व सोन्याचा विनिमय दर). जगातील देशांनी अमेरिकन डॉलरचा परकीय चलनाचा साठा करण्यास सुरुवात केली. १९४५ मध्ये हिटलरचा मृत्यू व दुसरे महायुद्ध संपण्यापूर्वीच डॉलरचा डंका वाजू लागला. अमेरिकेतील आर्थिक आव्हाने व फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांच्या राजनैतिक युद्धानंतर अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन यांनी १९७१ मध्ये सोन्याचे मानक रद्द केले, पण तोपर्यंत डॉलर ही जगाची गरज झाली होती.

डॉलर किती मजबूत आहे : अमेरिकन डॉलरची ताकद किती आहे? फेड रिझर्व्हच्या मते, जागतिक जीडीपीमध्ये अमेरिकेचा वाटा २० टक्के आहे. पण चलनाची ताकद बघा, जगातील परकीय चलनाच्या साठ्यात (२०२१) अमेरिकन डॉलरचा वाटा सुमारे ६० टक्के होता. डॉलर ही अमेरिकेची दुहेरी शक्ती आहे. व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे परकीय चलनाच्या साठ्यात जमा झालेले डॉलर अमेरिकन रोख्यांमध्ये गुंतवले जातात. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने जारी केलेल्या एकूण रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा ३३ टक्के आहे. युरो, पाउंड आणि येनच्या बाँडमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा बरेच काही. आर्थिक पत आणि शक्तीचे हे मजबूत चक्र मोडणे कठीण आहे. रोख म्हणूनही डॉलरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत जगात सुमारे ९५० अब्ज डाॅलर नोटा जमा झाल्या होत्या. जगातील सुमारे ८०% निर्यात चलन, ६०% विदेशी चलन रोखे आणि सुमारे ६०% जागतिक बँकिंग दायित्वेदेखील डॉलरमध्ये आहेत.

पर्याय काय आहे? : जगातील देश त्यांच्या चलनाची एकमेकांशी देवाणघेवाण का करत नाहीत? कारण जगातील कोणतेही चलन डॉलर होऊ शकत नाही. पहिली अट म्हणजे चलनाची पत. ही चलन स्टोअर व्हॅल्यू तयार करणारी चलनामागील मजबूत वित्तीय प्रणाली आहे. दशकभरापूर्वी युरो हा डॉलरचा प्रतिस्पर्धी मानला जात होता, परंतु अनेक छोट्या देशांच्या अर्थव्यवस्था युरोच्या मागे आहेत. कोणत्याही देशातील अशांततेमुळे युरोची घसरण होते. परकीय चलनाच्या साठ्यात युरोचा वाटा केवळ २१ टक्के आहे. ब्रिटिश पाउंड, जपानी येन, चिनी युआन यांचा वाटा आणखी कमी झाला आहे. दुसरी अट अशी आहे की, चलन मुक्तपणे व्यापार करण्यायोग्य असणे. त्यावरून चलनाची गती ठरते. युआन स्पर्धक होऊ शकला नाही. जगातील सर्वात मोठा निर्यातदार चीन आपले चलन कमकुवत ठेवतो, चलन व्यवहार स्वच्छ नाहीत. त्यामुळे परकीय चलनाच्या साठ्यात युआनला दोन टक्केही स्थान मिळालेले नाही. चलनाची स्थिरता ही सर्वात महत्त्वाची अट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापासून चलन स्थिरता निर्देशांकात डॉलर सुमारे ७०%वर स्थिर राहिला आहे, युरो २०%वर आहे. येन व युआनमध्ये लक्षणीय घट झाली. स्थिरता ही डॉलरची मोठी ताकद आहे. क्रिप्टोकरन्सीसह डॉलरच्या पर्यायाबद्दल काही वाद झाले. तथापि, कोविडनंतरचा क्रिप्टोकरन्सीचा फुगा फुटला व रशियावरील निर्बंधांमुळे डॉलरची निर्दयी धोरणात्मक शक्ती उघड झाली.

इतिहासाचे पुनरागमन : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन डॉलरचे वर्चस्व प्रस्थापित झाले. १९४८ मध्ये अमेरिकेने डॉलरच्या बळावर युरोपला मदत करण्यासाठी १३ अब्ज डाॅलरची मार्शल योजना (राज्य सचिव जॉर्ज सी. मार्शल यांच्या नावावर) लागू केली. युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या युरोपातील सुमारे १८ देशांना त्याचा मोठा फायदा झाला. मात्र, ही योजना शीतयुद्धाचीही सुरुवात होती. युरोप अमेरिका आणि सोव्हिएत छावण्यांमध्ये विभागले गेले (नाटो : १९४८-४९ आणि वॉर्सा करार : १९५५). आता पुन्हा एकदा महामारी आणि युद्धाचा फटका बसलेला युरोप ऊर्जा व संरक्षण गरजांसाठी अमेरिकेवर अवलंबून आहे. डॉलरच्या नव्या ताकदीच्या जोरावर बायडेन एकीकडे युरोपला रशियाचा हिटलरसारखा धोका टाळण्याची हमी देत ​​आहेत आणि दुसरीकडे चीनला घाबरलेल्या आशियातील देशांना नव्या छत्राखाली एकत्र करत आहेत. या परिस्थितीतून अमेरिकन डॉलरची राजवट निर्माण झाली. फॉरेक्स मार्केटर्स म्हणतात की, डॉलर हा अमेरिकेचा सर्वात मजबूत सैनिक आहे. तो कधीच हरत नाही. उलट दुसऱ्या चलनाला बंदी करून तो अमेरिकेकडे परततो. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

अंशुमन तिवारी मनी-९ चे संपादक anshuman.tiwari@tv9.com

बातम्या आणखी आहेत...